त्यांना आपलं ऑनलाईन भले करायचे आहे
आधार जोडा ऑनलाईन व्हा
कर्ज माफी हवी ऑनलाईन या
त्यांना आपलं ऑनलाईन भलं करायचं आहे
शिक्षण हवे ऑनलाईन अर्ज करा
शिष्यवृत्ती हवी ऑनलाईन असा
निकालही ऑनलाईनच पहा
त्यांना आपलं ऑनलाईन भलं करायचं आहे
गॅसची मागणी , सबसिडी ऑनलाईनच मिळवा
टॅक्स , जीएसटी भरा
आपण कॅशलेस सोसायटीचे सभासद आहोत
आपण ऑनलाईन असणं ही कॅशलेस सोसायटीची पहिली अट आहे
म्हणा ,
जो जे वांछिल तो ते लाहो ऑनलाईनच
गाईवासरे गुरेढोरे ऑफलाईन आहे
झोपडया झोपडपट्टया ऑफलाईन आहे
मजूर मजूरांचा बाजार ऑफलाईन आहे
मोलकरीण रामागडी ऑफलाईन आहे
भूक आणि भूकबळी ऑफलाईन आहे
सहीची निशाणी डाव्या हाताचा आंगठावाले ऑफलाईन आहेत
ते ऑनलाईन कधी येतील ?
कॅशलेस सोसायटीचे सभासद कधी होतील ?
भूता परस्परे मैञ जीवांचे कधी जडेल ?
त्यांचं भलं कधी होईल ?
माझं हे प्रश्नोपनिषद संपत नाही
तोवर कॅशलेस सोसायटीत मला रस नाही
शंकर बो-हाडे
No comments:
Post a Comment