Sunday, 1 July 2018

लोकसंस्कृतीतले लोकभ्रम

   लोकसंस्कृतीतले लोकभ्रम

     लहान बाळाला टीक का लावतात ? कुणाची दृष्ट लागू नये म्हणून . खुदूखुदू हसणारे बाळ किरकिर करायला लागले की आयाबाया म्हणतात , “ दृष्ट काढ “ . मग एखादी आज्जी बाळावरुन मिठ मोह-या उतरवून टाकते . एखादी आज्जी बाळावरुन तुटलेली चामडयाची चप्पल उतरवून जोरात आपटते .एखादी आज्जी बाळावरुन हंडा उतरवून पाणी असलेल्या परातीत उलटा ठेवते . हंड्यात विस्तव असल्याने पाणी चर्रर्र करते . बाळाची दृष्ट उतरते . काही बायका बाळाला दृष्ट झाल्यावर करंडयातील कुंकू उतरुन त्याची तीन , पाच किंवा सात बोटे भिंतीवर ओढतात . काही स्ञिया केरसुणी ( लोकभाषेत शिराई , लक्ष्मी असेही म्हणतात ) बाळावरुन तीन वेळा उतरवतात . मातीचे बोळके लाल होई पर्यंत तापवून  तीन वेळा बाळावरुन उतरवतात आणि पाण्याने भरलेल्या परातीत पालथे घालतात . त्यातून बाळाची दृष्ट उतरते असा लोकभ्रम आहे . दृष्ट काही बाळालाच होते असे नाही . इमारतीला दृष्ट लागू नये म्हणून दरवाज्याला काळया बाहुल्या , त्याला लिंबू , बिबवे टोचून बांधतात . काही लोक घराला घोडयाची नाल ठोकतात . दूर प्रवासाला निघालेला चालकही आता आपल्या चारचाकी वाहनात काळया बाहुल्या अडकवतात . गाडीचा प्रवास अपघाताविना व्हावा याची ही काळजी .आपल्याकडे असे अनेक लोकभ्रम जन्मापासून मृत्यूपर्यंत जपले जातात . राञी अपराञी कुञे विव्हळते , भुंकण्यापेक्षा त्याचा सूर रडल्यासारखा असला तर तो एखाद्याच्या मृत्यूचे सूचन समजला जातो . दोनतीन वर्षापूर्वी माझे वडील गेले . शेजारच्या ताई म्हणाल्या , दोन दिवसापासून राञी , मध्यराञी तुमच्या घराजवळ कुञे विव्हळत होते . तेंव्हाच मला बाबा जातील याची चाहुल लागली होती . मी विज्ञाननिष्ठ असल्याने दुर्लक्ष केले पण कधीतरी राञी अपराञी कुञे विव्हळू लागते . बायको एवढ्याराञीही कुञ्याला हाडहाड करते . आपला लोकभ्रम कायम रहातो . कधी कधी वृध्दापकाळाने एखादा वृध्द अखेरचा श्वास घेतो . कुणीतरी म्हणते , राञी कुञे खूप वेळ विव्हळत होते .

     संत ज्ञानेश्वरांची एक विराणी आहे ,

पैल तो गे काऊ कोकताहे

शकुन गे माये सांगताहे

लहानपणी कावळा ओरडला की आज पाहुणे नक्की येतील हा शकून मानला जायचा . तेंव्हा प्रवासाला आपली लालपरी ( एस टी ) होती . ग्रामीण भागात दिवसभरात एखादी एसटी येई . मुक्कामी गाडीतून चारदोन पाहुणेही येत . कावळयाचे ओरडणे हा वयात आलेल्या मुलींसाठी खास संदेश मानला जायचा . कावळा शिवला असाही एक शब्दप्रयोग होता . घरातील स्ञिया कावळा शिवला म्हणून चार दिवस कशालाही स्पर्श करत नसत . बालपणात हे संकेत काही कळत नसत . कुणी सांगतही नसत . मला आठवते , शाळेतून घरी येताना माझ्या डोक्यावर कावळयाने चोच मारली . मी घरी आलो . सरळ कोप-यात बसलो . आई म्हणाली , का रे कोप-यात बसला ? मी , म्हणालो , कावळा शिवला . मग पाठीत जोराचा रपाटा बसला आणि शिवलेल्या कावळयाचा मला राग आला .

    बालमनावर लोकभ्रमाचे गारुड असते . तीन तिघाडा काम बिघाडा हा लोकसंकेत मानला जातो . तीन व्यक्तींनी एखाद्या चांगल्या कामाला जावू नये . तीन माणसे एखादे काम करायला गेली की ते काम होणार नाही , अडेल , बिघडेल हे मनावर ठसलेले . यावर तोडगाही होताच . तीन जण एकञ चालले तर चौथा व्यक्ती म्हणून एखादा दगड ( खरे तर खडाच ) खिशात घेऊन जायचा . दगड माणसाचे प्रतिनिधित्व करायचा . आजकाल माणसे दगडांचे प्रतिनिधित्व करतात , त्याचे कारण आपण त्या चौथ्याचे प्रतिनिधी असल्याचे मान्य असावे . आपल्याकडे मांजर आडवे जाणे हा अशुभ संकेत आहे . आम्ही तर मांजर आडवे गेल्यावर दुस-या रस्त्याने जात असू किंवा थांबून घेत असू  किंवा मागून येणारा पुढे गेल्यावर जात असू . मांजर मारणे हे पाप समजले जाते . मांजर मारली तर त्या पातकाचे क्षालन करायला काशीला जावे लागत असे . मांजराची शिकार करणारी आणि मांजराचे मटणाचा आहारात समावेश करणारी जमात आजही भटक्या विमुक्तांमद्ये आहे . टीटवीचे ओरडणे अपशकून मानले जाते . घुबडाचे तोंड पाहू नये हा आपला लोकभ्रम . एकदा राञी एक घुबड एका इमारतीला अडकले . चांदीचा वर्ख असणारे ते घुबड , त्याचा स्पर्श आम्ही अनुभवला . पक्षीमिञाला फोन करुन बोलवले आणि त्याची व्यवस्था केली . मी घुबडाचे तोंड पाहिले म्हटल्यावर मिञाची प्रतिक्रीया होती , ‘ यडा हे ‘ एकदा एका घुबडाचा सुंदर फोटो एका वृत्तपञ छायाचिञकाराला मिळाला , ते सुंदर घुबड चंदेरी वर्ख असणारेच होते . खूप लोकांना ते आवडले . लोकांनी फोटो घेतले . बातमीदाराने फोटो कॅप्शनसह बातमी पाठवली . संपादक म्हणाले , सकाळी सकाळी आपल्या वाचकांना घुबडाचे तोंड पहाणे आवडणार नाही . बिच्चारा गप्प बसून राहीला . लोकभ्रम विविध व्यवसायातही असतात . पहिली विक्री म्हणजे भवानी . पहिल्या ग्राहकाने उधार मागू नये हे व्यवसायाचे सूञ व्यापारी पाळतात . माझे केस कापणारा नाभिक सकाळी सकाळी दुकान पाण्याने धुवत होता . मला जरा आश्चर्य वाटले . नाभिक म्हणाला , भवानी पूर्वी कुणी ग्राहक केस विंचरुन गेला की दिवसभर धंदा होत नाही . पहिल्या ग्राहकापूर्वी एखाद्याने नाभिकाच्या सलून मध्ये केस विंचरणे अशुभ हा लोकभ्रम त्याला दुकान स्वच्छ करायला लावतो . कुञा , मांजर , कावळा हे पशूपक्षी पण माणसांच्या कृती , दर्शन हे लोकभ्रम ठरते . मी एक फ्लॅट खरेदी केला . छान फ्लॅट होता पण विकला जात नव्हता .  बिल्डर म्हणाला , आप ले लो . डिस्काऊंट देता हू ! मला आश्चर्य वाटले , नंतर सोसायटीचा सभासद म्हणाला , सकाळी उठल्यावर मांगाचं तोड कोण पहाणार ? तुम्हाला ते कळणार नाही . मी रोज सकाळी या सख्ख्या शेजा-याशी गप्पा मारायचो . माझा शेजारी मला लकी होता . मातंग स्ञीशी आमवस्येला संबध केला तर लक्ष्मी पावते . घरात समृध्दी येते हा लोकभ्रम प्रमाण मानून एका महाशयाने मातंगस्ञीला वश करण्याचा चंग बांधला . या कामी यश न आल्याने आपण श्रीमंत होवू शकलो नाही असे म्हणून त्याने आपले कर्तृत्व लोकभ्रमाकडे गहाण ठेवले . आम्ही जातीवरुन लोकभ्रम जन्माला घालतो आणि लोकभ्रमापाई स्ञीचं आणि उपेक्षित जातीचं शोषणही करतो . या लोकभ्रमाला काही आधारही नसतो .

स्ञियांच्या हातातली बांगडे फोडताना जर बांगडीच्या तुकडयाबरोबर काचेचा चुरा झाला तर समजायचे नव-याचे बायकोवर प्रेम आहे.  चुरा झाला नाही तर…. तुमचं माझ्यावर प्रेम नाही म्हणून बाईसाहेब रुसून बसणार . एखाद्याने केस कोवळे असतील तर तो माणूस प्रेमळ समजला जातो अन् राठ केसांचा माणूस मायाळू नसतो . मग त्याच्या वाट्याला उपेक्षा ठरलेली .

      स्मशानाला देवताही मानतात . अमावस्येला भूते निघतात . भूत उलट्यापायाचे असते हा आपला लोकभ्रम . आमच्याकडे स्मशानसेवा करणा-या सुनिता पाटील या भगिनी आहे . त्या प्रेताचा अंतिम संस्कार अतिशय मनोभावे करतात . त्यांचे आई वडीलही अंतिम संस्कारासाठी लाकडे आणि इतर साहित्य पुरवित . हे कुटुंब स्मशानातच रहाते . त्यांची भावंडेही इथेच वाढली . त्यांचे संसारही फुलले . स्मशानात रहाताना तुम्हाला भूताखेताची भिती नाही वाटतं ? असा मी सरळच प्रश्न सुनिता पाटील यांना विचारला . त्या म्हणाल्या , भूतखेत माणसाच्या मनात असते . राञी उशीरा अंतिम संस्कारासाठी लोक प्रेत घेवून येतात . आम्ही यथासांग अग्निडाग देतो . कधी कधी राञी बाॅडी  व्यवस्थित अनंतात विलीन झाली का पहावी लागते . लाकडे कमी पडली तर टाकावी लागतात . पण मला कधीच भूताखेताची भिती वाटली नाही . आपल्याकडे एखाद्या स्ञीला भूतबाधा झाली असा संशय आला तरी तिला दत्ताच्या मंदिरात टाकतात किंवा एखाद्या देवॠषाकडे नेतात . तो वेताच्या काठीने त्या झाडाला ( स्ञीला ) बडवतो आणि भूत उतरविल्याचे सांगतो . भूतबाधा हा आपला लोकभ्रम आजही ग्रामीण भागात कायम आहे . भूतबाधा स्ञीलाच का होते ? पुरुषांना का होत नाही ? असे प्रश्न न विचारता आपण आपले लोकभ्रम जपत बसतो .

      जून पासून पावसाला सुरुवात होईल . मे महिन्यात आकाशात चांदणे लखलखत राहील . आकाशातले तारे पहाण्यात मौज असते . त्यात एखादा तारा तुटताना आपण पाहिला तर …. अशुभाने मन चिंतीत होते . पाऊस पडू लागल्यावर आपल्याला आनंद होतो . मेघ गर्जना होवू लागली , विजा चमकू लागल्या तर आपण विजेपासून संरक्षण व्हावे म्हणून दरवाज्यात लोखंडाची वस्तू टाकतो . विजेपासून संरक्षण करणारा हा लोकभ्रम . काही माणसे पायाळू असतात . त्यांना विजेचे फार भय असते . शंकर पाटलांची वळीव ही कथा पायाळू म्हाता-याच्या लोकभ्रमावरच बेतलेली आहे . पाठीत चमक निघाली तर या पायाळू माणसाचे पाय पाठीवरुन उतरवतात किंवा लहान बाळाचे कोवळे पाय पाठीवरुन  उतरवल्याने पाठीतली चमक जाते . लोकभ्रमाची अशी कितीतरी उदाहरणे आपण पहात असतो .संत गाडगेबाबांपासून तर डाॅ नरेंद्र दाभोळकरांपर्यंत अनेकांनी हे लोकभ्रम मिथ्या असल्याचे सांगितले पण लोकसंस्कृतीतले हे भाग आपण त्याज्य मानले नाही .

डाॅ शंकर बो-हाडे

९२२६५७३७९१

No comments:

Post a Comment