Sunday, 1 July 2018

(आड)नावात काय असतं !

   (आड ) नावात  काय असतं !

      ( आड )नावात काय असतं , असे म्हटले जाते . आडनावे ही मराठी संस्कृतीचे विशेष आहेत . पाटील , देशमुख , खोत , इनामदार, कुलकर्णी ही खास सरंजामी आडनावे . इतिहासकाळात यांची कामे ठरलेली असत . जातीचा उल्लेख असणारी आडनावे होती . कुंभार , लोहार , सुतार , परीट सारखी असंख्य आडनावे सरळ जातींचा उल्लेख असणारी होती . रामोशी , भिल ही त्याच परंपरेतली . त्यातून परंपरागत व्यवसायाचे सूचन होई .आता ती पुसट झाली आहेत . गायकवाड , शिंदे , भोसले ही राजघराण्यातली आडनावे . शिंदे हे नागवंशीय आडनाव . त्यांच्या देव्हा-यात नागदेवता असे . शिंद्यांनी नाग मारू नये असा संकेत . पण आता हीच आडनावे शूद्र जातीतही सापडतात . आजचे शूद्र ठरवलेली मंडळी इतिहासकाळात कदाचित राजवंशात असावेत असा तर्क करायला वाव आहे . आजचे शूद्र महार कालचे पराक्रमी असू शकतील . लोकमान्य टिळक म्हणत , जाती या अगंतूक  निर्माण झाल्या . आमचे एक मिञ म्हणतात , आम्ही कुलकर्णी म्हणजे वतनदार . आम्ही भिक्षूकी करत नाही . देशमुख हे मुसलमानातही असतात आणि पाटील हे आदिवासींमध्ये आढळतात . महार घरातही आता पाटीलकी आली आहे . आमच्याकडे उंबरखेड गावात महार पाटील आहे . १९५६ नंतर हे बौध्द झाले . नवबौध्द अशी ओळख निर्माण झाली . गावावरुनही आडनावे आली . नाशिककर , पुणेकर ही प्रसिध्द आडनावे . गावाच्या नावापुढे कर प्रत्यय लावून नावे तयार केली जातात . बडोद्यात पाळेकर कुटुंब रहाते . त्यांचे गाव कळवण तालुक्यातील पाळे . पाळेकर त्यातून आले . गोंदे गावचे गोंदकर . निफाडचे निफाडकर . विंचूरकर ,वडगावकर अशी मालिका आणखीही लांबवता येईल .भालचंद्र नेमाडेंच्या कोसला कादंबरीचा नायक पांडुरंग सांगवीकर हा सांगवीचा . काही गावे ठिकठिकाणी सापडतात .काही आडनावे गावाच्या नावावरुन आली . कोपर्डे , वाजे ही गावे आहेत आणि आडनावे .

           आपली आडनावे विविधतेतील एकता प्रकारातली आहेत . रंगांचा उल्लेख असणारी आडनावे कमी नाहीत . हिरवे , तांबडे , पांढरे , निळे , काळे , गोरे हे रंग . त्याची आडनावे झाली . पशू पक्षांची नावेही आडनावे झाली . डुक्कर हा सगळयात गचाळ प्राणी पण आणच्याकडे डुकरे हे आडनाव आहे . वाघ , कोल्हा , लांडगा या प्राण्यांवरुन वाघ , वाघे हे आडनाव झाले . कोल्हयावरुन कोल्हे तर लांडग्यावरून लांडगे हे आडनाव आले . दहिवडी काॅलेजमध्ये माझ्या एका  विद्यार्थी मिञाचे आडनाव होते . दीडवाघ . मला ते वेगळे वाटले . मिञाला म्सटले , दीडवाघ हे नाव कसे झाले ? तरुण मिञ जाहीर चर्चेत जरा चडफडला . पण दोन दिवसाने त्याने दीडवाघ नावाची आख्यायिकाच ऐकवली . त्याच्या पूर्वजांनी वाघीणीची शिकार केली होती . शिकार झालेली वाघीण गरोदर होती . गरोदर वाघीण त्यांच्या घरातील पराक्रमी माणसाने मारल्याने हे कुटुंब दीडवाघ आडनाव लावू लागले . आपल्याकडे वाघ जसे आहेत तसे वाघमारे आहेत आणि तितरमारेही आहेत . गाढव या प्राण्यावरुन गाढवे हे आडनाव आले . माझा एक वर्गमिञ किशोर गाढवे एक दिवस सकाळी सकाळी घरी आला . काय विशेष ? विचारल्यावर म्हणाला , उच्चभ्रू वर्गाच्या शाळेत नोकरी लागली आहे . मी त्याचे अभिनंदन केल्यावर म्हटला , मुलांना नाव काय सांगू . गाढवे फारच ओशाळवाणे आडनाव आहे . गाढवे  हे आडनाव त्या शाळेत कसे चालेल ? त्याला आडनावाचा प्राॅब्लेम आह हे मी ओळखले . मग त्याच्या गावाचे नाव विचारले . तो म्हणाला , आम्ही पेलखेडचे . त्याला म्हटले , पालखेडकर हे आडनाव सांग . ते राजपञात प्रसिध्द कर . जात बदलता येत नाही पण आडनाव बदलता येते . वीस वर्षांनी त्याने मला शाळेत पाहुणा म्हणून बोलावले . तो आता मुख्याध्यापक आहे आणि त्याचे सर्वच कुटुंबही पालखेडकर झाले आहे . कुरूंदकर , पाडगावकर, मुखेडकर , औरंगाबादकर , जातेगावकर अशी अनेकांची आडनावे ही ग्रामनामांशी संबधित आहेत . तर मांजरेकर , घारपुरे , घारे , गरूड ही नावे पशूपक्षांशी संबधित आहे . उंदरे , उंदीरवाडकर , उंदीरवाड ही मुशकनामे होत . गायधनी , गायकर अशीही गाईशी संबधित नावे आहेत .

            धातूपासून आणि व्यवसायापासूनही आडनावे आली आहेत . तांबे , लोखंडे , चांदे , चांदेकर , सोनार तर आहेतच त्याच्या जोडीला रत्नपारखीही आहेत . मसाल्याच्या पदार्थापासूनही आडनावे घेतलेली आहेत . आमचे एक शिक्षक होते जिरे आडनावाचे . आमच्या कवीमिञाचे आडनाव वेलदोडे आहे . हिंगमिरेही आहेत . आडनावे कशी आलीत हा प्रश्न पडतो . काही आडनावाच्या आख्यायिका , दंत कथा असू शकतात . उदाहरणार्थ अहिरीचे अहिरे हे ठीक पण नहिरेही आहेत . मला वाटतं नकारात्मक प्रवृत्ती त्या नावावरुन दिसत असावी . त्या कुटुंबातला एखादा नकारात्मक प्रवृत्तीचा आदिपुरुष असेलही पण पुढच्या पिढया नहिरे प्रवृत्तीच्या कशा असतील . आज आपल्याला सोयीची आडनावे घेता येवू शकतात पण आपण आडनावाची परंपरा पुढे चालवत रहातो . एखाद्याचे आडनाव बोंबले असते किंवा गोंधळी , गोंधळे असते . अगदी आकांत असेही असते . मला ही आडनावे फार सार्थ वाटत नाहीत . सतत आरडाओरड करणारे म्हणून आकांत किंवा बोंबले नाव आले असेल तर आजही ते तसेच आहेत का ? मग तरिही आपण  ही आडनावे मिरवतो . उशीर हे नाव काय सुचविते . खरोखर उशीर आडनावाची माणसे उशीरा येत असतील का ? कामात दिरंगाई करत असतील का ? टकले नावाचे आमचे मिञ आहेत पण सर्वांच्या डोक्यावर उत्तम केस आहेत . दाते सर हे आमचे सहकारी . त्यांचे दात शाबूत आहेत . कानकाटे आमच्या गाववाले . त्यांचे घरातील सर्वांचे कान चांगले आहेत . तरीही कानकाटे , कानफाटे आडनावे झाली . अगदी नकटे सुध्दा आडनाव सापडते . शारीर व्यंगावरून बोबडे , तोतरे अशी नावे पडली . डोकफोडे , डोईफोडे या माणसांनी कुणाचे डोके फोडल्याचे ऐकिवात नाही . ही आडनावे कशी आली असावी ? शं.ना. नवरे हे मराठी लेखक आमच्या महाविद्यालयात आले . प्रास्ताविक करणारे प्राध्यापक म्हणाले , नवरे आले ( हशा ) अशी आडनावे पहायला मिळतात . नवरे कुटटुंबातील एखादा आजन्म अविवाहीत असला तरी त्याचे नवरे आडनाव कायम असते . डोळे , डोळस ही सुध्दा आपल्या माहितीतली नावे आहेत .काही नावे वेतन , रक्कम दर्शक आढळतात . पगार आहेत आणि फुलपगारही आहेत . त्यातच पगारेही आहेत . पन्नासे आहेत ,  बावनकर आहेत ,शंभरकर आहेत , हजारे आहेत , लाखे आहेत आणि सव्वालाखेही आहेत . अगदी चिकटे आणि फुकटे ही आडनावेही सापडतात . फळभाज्यांवरुनही आडनावे आली आहेत . कार्ले आहे आणि कार्लेकरही आहेत . काकडी वरुन काकडे आले . आंबेकर , केळकर या नावांचा फळाशी संबध आहेच . मुळे , भेंडे ही तर महाराष्ट्रातील प्रसिध्द माणसे . फुले हे नाव फुलावरुन आले तर फुलमाळी ही उपजात ठरली . फुलमाळी परंपरेतच जिरेमाळी , हळदीमाळी ही उपजातींवरुन पडलेली आडनावे आढळतात . वालाच्या शेंगावरुन वाले , वालझाडे ही नावे आली तशीच या सर्व भाज्यांचा आस्वाद घेणारे भाजीखाये हे नावही आले . देठे , दुधे , बुधे ही नावेही शाखाहारी प्रवृत्तीची .

       मोकाट या आडनावाविषयी फारच रंजक हकीगत कळली . ब्रिटीशपूर्व काळापासून काही लोक जे मनाला येईल ते कितीतरी दिवस करत रहात . म्हणजे समजा टांगे हाकायला ही मंडळी बाहेर पडली तर दहापंधरा दिवस तेच काम करीत बसत . कुस्ती खेळायला लागले तर दिवस दिवस कुस्तीच करीत रहात .ही मंडळी मोकाटच होती . त्यावरुन त्यांचे नाव पडले . बेणी हे आडनाव व्यवसायांतरातून आले . शिंपी समाजाचे अहिररावांनी पारंपरिक व्यवसाय सोडून उसाचे बेणे विकायला सुरुवात केली . त्यातून बेणी हे आडनाव आले . अहिररावांचे  बेणी आबनावाची ही कथा . बेणी जसे आहे तसे बनेही आहेत . कधीतरी बनात रहाणा-यांनी ते धारण केले असावे . त्यातूनच बनकर असे उपनाम आले असेल . म्हाळसा ही कानडी संस्कृतीची देवता . पण ती महाराष्ट्राचे कुलदैवत झाली आहे . म्हालसा, माळवी , मालती , म्हालण ही समानार्थी विशेष नामे . पण महाराष्ट्रात माळवी हे आडनाव आहे . म्हाळसेच्या नावाचा खुलासा रा. चिं. ढेरे यांनी खंडोबा पुस्तकात केला आहे .

       माझ्या एका मिञाचे आडनाव भूतकर आहे . त्याची भिती वाटत नाही पण भूत या आडनावाची भिती वाटते . वडापाव  हे अजून आडनाव झाले नाही पण पुण्याकडे वडेवाले अशा पाटया वाचायला मिळतात . वडापाव हे आडनाव नसले तरी वडाभात माञ आडनाव सापडते . रागीट हे आडनाव धारण करणारे खरोखरच रागीट असतात का ? पोटदुखेंचे खरोखर पोट दुखत असेल का ? पोट या शब्दावरुन पोटे , पोटपुसे , पोटभरे अशीही नावे सापडतात . काही किळसवाणी आडनावे आली आहेत . पातळहगे हे नाव कोणी का धारण करावे हा प्रश्नच आहे . एखाद्याचे शोचे हे आडनाव का बरं पडलं असेल ? याचा मी विचार करतो .  मला तर ठाकूर , चौधरी ही आडनावे परप्रांतीय वाटतात आणि खोत , पाटील , देशमुख महाराष्ट्रीयन वाटतात . ठाकूर , चौधरी ही आडनावे पक्की महाराष्ट्रीयन आहे हे मला पटते पण शोलेमधला ठाकूर आणि विनोदी मसाला पटातील चौधरी पाहून मी त्यांना तिकडे ढकलण्याचा कट करतो . देशाचे नेते चौधरी चरणसिंगही अजून माझ्या डोळयासमोर आहेत . पण महाराष्ट्राचे भाषिक राजकारण करणारे ठाकरे मला मातोश्री , कृष्णकजुंवरच नाही तर गावागावात भेटतात .
     व्यापाराच्या निमित्ताने आलेले गुजराथी , मारवाडी महाराष्ट्रात स्थाईक झाले . महाराष्ट्र परंपरेशी इमान राखणा-या माहेश्री , सारडा , चांडक , अग्रवाल , बाफणा , पटेल मंडळींनी महाराष्ट्र संस्कृतीत भरच घातली आहे . खान , शेख , पठाण ही नावे महाराष्टाला अस्पृश्य नाही . बग्गा , बिर्दी ही पंजाबी संस्कृतीतली आडनावेही परकी नाही . महाराष्टाच्या सुपिक भूमीत हे सगळेच सामावले . माञ महाराष्ट्रीयन आडनावे मोठी रंजक आहेत . काही अर्थपूर्ण तर काही अर्थहीन आहेत . काही भयसूचक आहेत तर काही किळसवाणी आहेत . जातीचा ठळक निर्देश करणारी नावे गळून पडत असली तरी आडनावावरून जातीचा अंदाजही येतो . जातीचा निर्देश टाळण्यासाठी काहींनी आडनावेही

बदलून घेतली आहेत . आडनावाची ही दुनिया चारक्षण रंजनही करते .
डाॅ शंकर बो-हाडे

९२२६५७३७९१

No comments:

Post a Comment