मामाचे गाव आणि खेळाची मज्जा
झुकझुक झुकझुक आगीन गाडी
धुरांच्या रेषा हवेत सोडी
पळती झाडे पाहू या
मामाच्या गावाला जावू या
ही बालकविता आठवण्याचे कारण म्हणजे मुलांची उन्हाळयाची सुट्टी सुरु आहे . उन्हाची काहिली होत असताना बाजारात कलिंगड , आंबे , अननस विकायला आली आहेत . उसाचा रस रस्त्यारस्त्यावर विकणारे दिसत आहेत . मैदानावर , गल्लीत पोरांनी क्रिकेटचा डाव मांडला आहे . एकल कुटुंब व्यवस्थेतील मुलांची काळजी घेणारे पालक विकेंडला मुलांना सोबत फिरायला घेवून जात आहे . मामा मोठा तालेवार राहिला नाही . तो ही टू बी एचके
संस्कृतीचा सभासद झाला आहे . मामाची बायको सुगरण म्हणण्याचा काळ शहरात संपला . आता ती पुरणपोळी किंवा मांडे शाॅपमधूनच घेऊन येते . मामाच्या गावाला जावू या असा काही मामाचा गाव राहिला नाही . मामाच्या शेतीचे तुकडे झाले . नापिकीने मामा दारिद्रयात लोटला . मामाच्या गावातही शेतकरी आत्महत्या सुरु झाल्या . बांधावरुन मामा मामाचे भांडणही सुरु झाले . समृध्दीच्या पैशाचे वाटपात नात्यातील ताणतणाव वाढला . कवितेतील मामा तालेवार होता . त्याचे गाव समृध्द होते . नद्यानाले वहात असायचे . आंब्याफणसाच्या बागा होत्या पण तो कवितेतला गाव उजाड झाला . राहिले दूर घर माझे अशी मामाची अवस्था झाली .
उन्हाळयाची सुटी म्हटली की मज्जाच मज्जा . कितीतरी गोष्टींचे शिक्षण या सुटीत व्हायचे . पोहायला जाणे हे शिक्षणच असायचे . समुह संस्कार , सहकार आणि समाजशीलतेचे शिक्षण देणारी ही सुटी होती . श्यामची आई मध्ये लपून बसलेल्या भिञ्या श्यामला मुले पोहायला घेऊन जातात आणि पाण्यात सरळ ढकलून देतात . गटांगळया खात हातपाय हालवत शाम बाहेर येतो . हातपाय हलवल्याशिवाय संकटातून मार्ग निघत नाही हे लहानग्या श्यामला प्रात्यक्षिकातून कळते . श्यामची आई जा रे त्याला घेवून म्हणते . आजची मम्मी तसे करणार नाही . कारण छोट्या कुटुंबात अशी रिस्क कोणती मम्मी घेईल ? शिवाय मोठमोठी धरणे बांधल्यावर पाण्याच्या आवर्तनाची शेतक-यालाच वाट पहावी लागते तर पोहायला पाणी कुठून असणार ? शहरात मुलांची पोहायची ही भूक जलतरण तलाव भागवतात . तिथे प्रशिक्षकही असतो . त्याचे वेळापञकही आखीव रेखीव असते .
उन्हाळयाच्या सुट्टीत खेळ कितीतरी प्रकारचे असायचे . मुलींच्या सागर गोट्या , ठिक-या , चल्लस हे कमी श्रमाचे खेळ .लंगडी हा मुलींचा खेळ मूलही खेळायची . लगोरी तथा लिंगुरच्या हा खेळही रंगायचा .लपलेल्या खेळाडूला शोधून काढायचा खेळ म्हणजे इस्टाॅप . ( स्टाॅप हा शब्द कळायला शाळेत जावे लागले ) एकमेकाला चेंडू फेकून मारून गडी बाद करण्याचा खेळ म्हणजे आबाधोबी . या खेळात पळण्याचे , लपण्याचे कौशल्य असायचे .पत्यांचा डावही रंगायचा . लहान मुलांचे तीन दोन पाच , बदाम सात हे खेळ ठरलेले . मुलं थोडी मोठी असतील तर जोडपत्ता . कोट कोट हा उनाड पोरांचा लेख . रमी हा प्रतिष्ठीत खेळ समजला जायचा . रंजनासाठीचा हा पत्याचा खेळ काहींचे व्यसनच होऊन जायचा . मुलांचा विडी दांडू हा खास देशी खेळ . या खेळात चुरस असायची आणि उजळणी आपोआप पाठ व्हायची . दांडू मोजतानाचे कौशल्यही महत्वाचे ठरायचे . बालपण सरल्यावर आम्ही मिञांनी विटूदांडूचा डाव मांडला . वय वाढलेले . विटी मारताना ताकद पणाला लावून दांडू मारला आणि रस्त्याने चाललेल्या पादचा-याचे कपाळाचा ठाव आमच्या विटीने घेतला . रक्त येवू लागले . बिचारा उदार होता पण शिव्यांची लाखोली वहातच गेला . बालपणातच हे खेळ खेळण्यात मजा असते . सुर पारंब्या हा खास झाडावर चढून खेळण्या खेळ . आम्ही तो खेळण्यापेक्षा पहाण्यातच धन्यता मानायचो . पण आटया पाटया खेळायला कौशल्य लागायचे . तास दोन तास खेळ रंगायचा . देशी खेळात कबड्डी हा महत्वाचा खेळ . खेळाडूला शक्तीबरोबरच युक्तीने बचाव करावा लागायचा . संध्याकाळी मैदानावर जमून वेगवेगळे संघ तयार करुन हा खेळ खेळला जायचा . संघशक्तीचे धडे या खेळातून मिळायचे आणि अपयश येवू नये यासाठी प्रयत्न करा हे शिक्षणही आपोआप व्हायचे . कबड्डी हा खेळ आता प्रतिष्ठा पावतो आहे . आंतरराष्ट्रीय स्तरावर त्याचे ब्रॅडींग होत आहे . देशी खेळापैकी खोखो हा कौशल्याचा खेळ . वेग आणि युक्तीने हा खेळ रंगत असे . कमी वेळात होणारा हा खेळ चुरशीत रंगतदार होत असे . मुलांच्या शरीराला आणि बुध्दीलाही खाद्य देणारे हे खेळ म्हणजे सुटीची मजा असायची . काही विद्वान मुलांनी बुध्दीबळाचा पट मांडलेला असायचा आणि तासंतास हा खेळ चालत असे . बुध्दीबळात बुध्दीचे वैभव होते पण शारीर व्यायामाला संधी नव्हती . खेळ हे आपले सांस्कृतिक वैशिष्टय आहे . कुस्ती हा बलोपासनेचा खेळ . व्यायामाने शरीर कमावणारी काही मुले असत . गावागावात तालमीही असत . तिथे दंड बैठकापासून तर गदा ( लाकडी ) फिरवणे , जोर काढणे असे प्रकार चालत . उन्हाळयाच्या सुटीत ही बलोपासना मुलांना शिकविली जाई .
देशी खेळांचा क्षय होत असल्याची भिती आहे . घराचे होम थिएटर झाल्याने खेळ खेळण्यापेक्षा पहाण्याकडे आपला अधिक कल असतो . क्रिकेट पहाण्यात जाणा-या वेळेचा विचार केला तरी कितीतरी मानवी तास आपण वाया घालवतो . मुलं हे सामने बघत बसतात . त्यापेक्षा मला गल्लीतला सचिन तेंडुलकर महत्वाचा वाटतो . सचिन षटकार मारतो , सचिन रण काढतो , सचिन ऑऊट होतो हे प्रात्यक्षिक गल्लीतल्या क्रिकेटमधून मिळते . मी गल्लोगल्लीच्या सचिनचा फॅन आहे . कारण सुटीतल्या क्रिकेटमध्ये सचिन आऊट होतो किंवा नाॅटाऊट रहातो . गल्लीतला सचिन व्हीकीट किपरही असतो आणि रणरही असतो . उन्हाळयाची सुटी या सचिनची जहागिर असते .
काळ बदलला . सुटीची संकल्पना बदलली . सुटीत मुलांना क्लासेसला पाठविणारे पप्पा मम्मी असतात . अर्थात हे स्काॅलर मुलांचे पप्पा मम्मी . आता सुटीत छंद वर्गही घेतले जातात . मुलांना या बंदिस्त छंद वर्गातून काय मिळत असेत हा प्रश्नच आहे . या सुटीत तरुण दिग्दर्शक सचिन शिंदे याने नाटय प्रशिक्षण शिबीर घेतले . मुलांकडून नाटकातील प्रवेश , एकांक , दीर्घांक बसवून घेतले आणि त्याचे सादरीकरणही केले . असे प्रयोग सुटीची मौज वाढविणारे असतात . मुलांची क्षमता आजमावता येते . बाकीचे उपक्रम सुटी घालवणारेच असतात .
उन्हाळयाची सुटी आहे मग मुलांना मुक्त खेळू द्यावे . खेळात कौशल्य असते . ऊर्जा असते . बुध्दीचे उपयोजनही करावे लागते . चांगल्या पहिलवानाशी बोललात तरी लक्षात येईल फक्त मांड्या ठोकून पहिलवान होता येत नाही तर कुस्ती बुध्दीचातुर्यानेच निकाली काढता येते . मुलाला सायकल चालवत शाळेत जायचे असेल तर सुटीतच सायकलवर टांग कशी मारायची हे शिकता येते . त्यासाठी पडणे झडणे, खर्चटणे ही पूर्व अट असते . त्याशिवाय सायकलचे प्रशिक्षण पूर्ण होतच नाही . उन्हाळयाच्या सुटीत सायंकाळी मुलं मैदानावर एकञ येत . गोल रिंगण करुन “ मामाचे हरवलेले पञ “ शोधण्याचा खेळ घेतला जायचा . ते पञ शोधताना मजा यायची . मामाची रंगीत गाडी गेली , आगीनगाडी झुकझुक न रहाता फास्ट ट्रेन झाली आणि मामाचे पञ व्यस्त वेळापञकात आणि व्हाॅटस अॅप , एसएमएसच्या जमान्यात कायमचे हरवले .
डाॅ शंकर बो-हाडे
९२२६५७३७९१
No comments:
Post a Comment