Sunday, 1 July 2018

आता तुम्ही ऑडीयन्स आहात

तुम्ही आता ऑडीयन्स आहात

मन की बात ऐका

जन गण मन की बात ऐका

तुम्हाला आता फक्त ऐकायचे आहे

प्राईम टाईमच्या चर्चा ऐका

तिथले औट डेटेड लोक सोयीने बोलतील

पक्षातून प्रवक्तेपण मिळालेले बोलतील

अॅकर मधेमधे बोलत राहतील

ते उगाच तावातावाने बोलत राहतील

तुम्ही फक्त ऐकायचे

तुम्ही ऑडीयन्स आहात

उद्या युध्दाचे ढग जमा होतील

युध्दाचे ढोल बडवले जातील

सीमेवरचा संघर्ष दाखवला जाईल

सैनिक शहीद होतील

ते यावर ऑनलाईन बोलतील

तुम्ही फक्त ऐकायचे

तुम्ही ऑडीयन्स आहात

त्यांच्या लाईव्ह शोसाठी ते तुम्हाला घेऊन जातील

त्यांच्या स्टॅन्ड अप काॅमेडीसाठी तुम्ही फक्त हसायचे

किंवा टाळया वाजवायच्या

अॅकर करील एखाद्या क्षणाला इमोशनल

कॅमेरा ते तुमच्यावर झुम करतील

तुम्ही डोळयाला पदर किंवा रुमाल लावायचा

तुम्ही ऑडीयन्स हे विसरायचे नाही

किंवा

ते तुमची एखाद्या प्रश्नावर बाईट घेतीलही

तुम्हाला ते फार बोलू देणार नाहीत

तेच बोलतील तुमच्या वतीने

तुमच्या प्रश्नाची ते नव्वद सेकंदाची बातमी करतील

स्टोरी रचतील

तुम्ही पहायचं , ऐकायचं

कारण तुम्ही ऑडीयन्स आहात

ते दाखवतील दगड फेकीची न्यूज

गाडयांच्या काचा फोडल्याची ऑनलाईन दृश्य

बंदच्या काळातला शुकशुकाट

ते मोजत बसतील बंद दुकानांची शटर्स

त्यांचा कॅमेरा काही क्षण रस्त्याने जाणा-या म्हातारा म्हतारीवर झुम होईल

तुम्ही फक्त पहायची ती दृश्य आणि ऐकायचे

तुम्ही ऑडीयन्स आहात

ते भारत बंदचा नारा देतील

तुम्ही घराबाहेर पडू नका

रेल्वे बंदचा नारा दिला जाईल

तुम्ही रेल्वेत बसू नका

मन की बात ऐका

जन गण मन की बात ऐका

तुम्हाला आता फक्त ऐकायचे आहे

कारण तुम्ही फक्त आणि फक्त ऑडीयन्स आहात

डाॅ शंकर बो-हाडे

No comments:

Post a Comment