सीते पुढे ओढली लक्ष्मण रेषा
हे विधान मला स्वातंञ्याचा संकोच केल्यासारखे वाटते
सीतेला अग्नि परीक्षेच्या दारी ढकलणारा वाल्मिकी
मला वाल्याकोळी वाटतो
धोब्याला बदनाम करणारा वाल्मिकी ऋषी कसा असेल
तो वाल्यापण विसरला असेल कशावरुन ?
आज सीता ऑफीसला जाताना रोज दरवाजा ओलांडते
तिचा राम तीला वनवासाला पाठवत नाही
ऑफीसला जा असेच सांगतो
घराचे हप्ते , पोरांचं शिक्षण , महागाई सांभाळायची असते तिला
ती बसते वेतन आयोगाची आकडेमोड करत
हिशोब न जुळल्याची सल असते तिच्या मनात
ती धक्के खात खात ऑफीसला जाते आणि येते
तीला कोणत्याच रावणाची भिती वाटत नाही
पे स्लिप पाहिल्यावर रामही रावणाविषयी विचारीत नाही
कपडे आणायला वरचेवर राम धोब्याकडे जातो
सीतेच्या कपड्यावरच्या डागाविषयी ते चर्चाही करत नाही
दमलेला राम कपडे पाहूनच फ्रेश होतो
रामायणात सीतेला न्याय मिळाला नसेल
दामायणात तरी न्यायाचा तराजू तिच्या बाजूने कुठे आहे ?
ती कमावते आणि कमावत रहाते
ती दमते , भागते आणि अग्निपरीक्षा देत रहाते
रावणाचे भय आणि रामाचे अभय ती विसरते
ऑफीसच्या द्वारकेची सम्राज्ञी बनून ती घर चालवते
सीतेपुढे लक्ष्मण रेषा ओढायला रामाला तरी कुठे वेळ आहे ?
No comments:
Post a Comment