काकस्पर्श आणि समृध्द जगणे
प्रसंग १
मालेगाव तालुक्यातील वडनेर खाकुर्डी जवळचे वळवाडी नावाचे गाव . मिञाचे वडीलांच्या अंत्य संस्कारासाठी पोहचलेलो . गावात पोहचताच फटाक्याचे आवाज येवू लागलेले . बॅडही वाजत होता . म्हटले , हे काय ? मिञ म्हणाले , ही अंत्ययाञा निघाली आहे . अंत्ययाञेत फटाके , बॅड म्हणजे भलतच काहीतरी . निधन तर दुःखद असते . नंतर या परंपरेविषयी माहिती मिळाली . ज्यांचे निधन झाले ते वृध्द होते . या आजोबांनी नातवंडे , पतवंडे पाहिली . वेल गगनाला गेला . अशा माणसाचा मृत्यू आनंददायी म्हणून हा अंतिम निरोप वाजत गाजत देण्याची प्रथा . नातवंडे पतवंडे नंतरची पिढी काळतोंडे समजली जाते . याचा अर्थ या पिढीपर्यंत माणसाने जगू नये . तत्पूर्वी म्हातारा गेलेला म्हणूनही आनंद व्यक्त करण्याची प्रथा पडली असावी .
अंत्ययाञा स्मशानात पोहचली . आजोबांना अग्निडाग देताच स्मशानात प्रत्येकाच्या हातावर वृत्तपञाच्या कागदाचे तुकडे देण्यात आले . पाठीमागून शेव मुरमु-याचे पोते आले . प्रत्येकाला कागदावर मुठ दोनमुठ शेवमुरमुरे दिले गेले . स्मशानात प्रेत जळत असताना इकडे लोक शेव मुरमुरे खात होते . त्याला सुकडा असे म्हणतात . मला ते काही खाता आले नाही . पण बाकीच्या मंडळींना त्यात काही न्यून दिसले नाही . गावात जेंव्हा मृत्यू होतो तेंव्हा सर्व गाव दुःखात सहभागी होते . चूल पेटत नाही . दूरदूरुन माणसे यायला वेळ लागतो . तसेच स्मशानभूमी गावाच्या बाहेर असते . जमलेली माणसे पायी चालत आलेली असतात . अंत्यसंस्कार होईपर्यंत बारा पंधरा तास उलटून गेलेले असतात . त्यावर उपाय म्हणून सुकडा हा प्रकार सुरु झालेला . प्रथा परंपरा समुहाच्या गरजेतून निर्माण होतात , त्याचा सुकडा हा आविष्कार !
प्रसंग २
मिञाची आई वारली म्हणून त्यांना भेटायला गेलो . त्याला दारावर जाणे असा वाक्प्रचार रुढ आहे. दुःखी कुटुंबाच्या मागे उभे रहाणे , असा या कृतीचा अर्थ आहे . विचारपूस , चौकशी करुन दुःखी कुटुंबाला आधार देण्याची पध्दत आहे . त्यातून मृत व्यक्तीचे स्मरणही होते आणि दुःख हलके होते असे म्हटले जाते . मिञाच्या आईची नव्वदी उलटली होती . नातवंडे , पतवंडेही पाहिली होती . तिच्या सर्व इच्छा पूर्ण झाल्याने अंत्यसंस्कार डीजे लावून करण्यात आले . आई गेली म्हणून रडणे कुढणे नाही . दशक्रिया विधीचे नियोजनाला सगळे लागले . दशक्रियेला भटजीला कपडे ,आंथरुण, पांघरुण , भांडे , छञी , काठी देण्याची पध्दत आहे . काळ बदलला . तरी घोंगडी आहे . पावसाळा नसला तरी छञी आहे . आंथरुण पांघरुणही आहेच . शिवाय काठी . त्या काळात भटजी दूरवरुन श्राध्दविधी करण्यासाठी येत असल्याने त्याची एवढी काळजी घेत असल्याचे हे प्रतिक आज गमतीचे वाटत असले तरी परंपरा पाळण्याची समुहाची वृत्ती त्यातून ध्वनीत होते .मृतात्म्यास चिरशांती लाभावी ही त्यामागची कल्पना .
बाबा आमटे गेले तेंव्हा त्यांच्या मागे आरती प्रभूंच्या कवितेतील शब्द होते , सप्रेम द्या निरोप बहरुन जात आहे ! अशी बहरुन जाणारी माणसं समृध्द आयुष्य जगलेली असतात .मधु दंडवते हे माजी केंद्रीय मंञी . दीर्घकाळ संसदेत असणा-या मधु दंडवते यांना कर्करोगाने गाठले तेंव्हा त्यांचे वय झालेले होते . मुलगा अमेरिकेत जावून उपचार करु म्हणत होता . दंडवते म्हणाले , मी सर्व अनुभवले . मला सर्व मिळाले . मला नैसर्गिक मृत्यू येवू दे . उपचाराची आता गरज नाही . दंडवते नानांनी हसत मृत्यला सामोरे जाणे स्वीकारले . त्यांनी देहदान केले . शहाणी माणसं किती समजदारपणे आपले मृत शरीरही अभ्यासाला देतात याचे हे बोलके उदाहरण .
जन्म शाश्वत नाही . गर्भपाताचा आधिकार आणि वंशाला दिवा हवा म्हणून अनेक जीव जन्माला येवू शकत नाही . पण मृत्यू माञ शाश्वत आहे . फार थोडे लोक मृत्यूला सामोरे जाण्याची तयारी करतात . स्व भगीरथीबाई निवृत्ती पवार वयाच्या ९३व्या वर्षी गेल्या . बाईंचे जगणे समृध्द होते . पवार कुटुंबाने या मातेलाही असाच सप्रेम निरोप दिला . जन्माचा सोहळा करता येत नाही . आपण वाढदिवस करत बसतो . पाश्चात्यांचे अनुकरणातून केक कापले जातात . औक्षण ही आपली देशी परंपरा . आपण दैशीविदेशीचे कोलॅबरोशन करुन जन्मदिवस साजरा करतो . मृत्यूचा माञ सोहळा होतो . चारचौघासोबत अखेरचा निरोप दिला जातो . कारण मृत्यूचे अस्तित्व आपण मान्य करतो . पण तो अवेळी आला तर त्याला अपघात म्हटले जाते . आज एकल कुटुंबाची पध्दत आहे . हम दो हमारा / री एक . अशा कुटुंबातला तरुण वयात ओढवलेला मृत्यू म्हणजे स्वप्न उजाड होणे . सुर्योदयापूर्वीच काळोख दाटणे . शोले सिनेमातल्या बापाच्या तोंडी उद्गार आहे , बाप के कंदोपर बेटे का जनाजा ! प्रगत दळणवळणाची साधने , आधुनिक तंञज्ञान , ताशी १००-१५० किलोमीटर वेगाने धावणा-या गाडया आणि पालकांच्या हाती खेळणारा पैसा यातून अपघाती मृत्यू ओढावल्याची उदाहरणे काही कमी नाही .त्या मृत्यूचा सोहळा कसा होईल . दुःखाचा डोंगर कोसळल्याचा अनुभव असे मृत्यू देतात .
मृतात्म्यास शांती लाभावी म्हणून आपल्याकडे क्रियाकर्म करण्याची पध्दत आहे . जैनधर्मीयात तीन दिवसाचा दुखवटा असतो . त्याला उठावणा म्हणतात . काही ठिकाणी पंचक्रिया करुन लोक कामाला लागतात . दशक्रिया करण्याचा प्रघात आहे . १९५६ मध्ये डाॅ बाबासाहेब आंबेडकरांबरोबर बौध्द धम्म स्वीकारलेला बौध्द समाज जलदान विधी करतो . त्यासाठी सुटीचा दिवस रविवार निवडला जातो . बुध्द वंदना घेवून मृत व्यक्तीचे गुणसंकीर्तन करण्याची पध्दत रुढ आहे . मुस्लीम समाज चाळीस दिवस दुखवटा पाळतो . हिंदू परंपरेत पिंडदान आणि काकस्पर्शाला महत्व आहे . आता कावळे कमी झाल्याने काकस्पर्श झाला नाही तर गाईला पान देण्याची पध्दत आहे . काकस्पर्शाशिवाय मृत आत्म्यास मुक्ती मिळत नाही असे मानले जाते . काकस्पर्श होण्यासाठी सकाळी लवकर पूजा करुन पिंडदान करण्याचा प्रयत्न अनेकांचा असतो . यावर काकस्पर्श नावाचा मराठी चिञपटही येवून गेला . मध्यंतरी काकस्पर्शासाठी कावळा पाळावा अशी कल्पना एकाने मांडली होती . परंपरेतले न्यूनत्व दाखविण्याची ही कल्पना हास्यास्पद असली तरी पर्यावरणाच्या -हासाचे सूचन त्यातून होते . काही माणसे आपली इच्छापञे लिहून ठेवतात . कोणतेच धार्मिक संस्कार आपल्या अपरोक्ष करु नये असे अनेकांनी लिहून ठेवलेले असते . कवी कुसुमाग्रज तथा वि. वा. शिरवाडकर हे या परंपरेतले . भाई वैद्य हे त्याच परंपरेतले . तरी काकस्पर्श महत्वाचा मानणारे लाखो लोक आहेत आणि या परंपरेतले न्यूनच दाखवून देणारेही आहेत . गाडगेबाबांनी हेच सांगण्याचा प्रयत्नही केला .
प्रसंग ३
निरा या गावात एकाने जीवंतपणी दशक्रिया घातली . निरा नदीच्या किनारी सकाळी यथासांग पूजेची नक्कल करून पिंडदान केले गेले . जीवंतपणी पिंड ठेवले आणि तेथे पिंडाला कावळयाने स्पर्शही केला . हा सोहळा पहायला अनेक लोक हजर होते . हेतू अंधश्रध्देविषयी प्रबोधन करण्याचा होता .
माणसाला समृध्द जीवन मिळावे . त्याच्या इच्छा पूर्ण व्हाव्या . त्यानंतर आलेल्या मृत्यूला त्याने हसत हसत सामोरे जावे हेच खरे जगणे असते . तरी परंपरेचे पाईक आपण असतोच .
डाॅ शंकर बो-हाडे
९२२६५७३७९१
No comments:
Post a Comment