Sunday, 1 July 2018

ढगोमेघो

 नागवंशीयांचे गुरु ढेगो मेघो

         कादंबरीकार राकेश वानखेडे यांची “ मसनद “ कादंबरी प्रकाशनपूर्व समीक्षेसाठी आली . तत्पूर्वी त्यांची “ पुरोगामी “ ही कादंबरी चर्चेत होती . मार्क्सवादी आणि आंबेडकरवादी चळवळीचे ताणेबाणे टिपणा-या या कादंबरीवर बरीच उलटसुलट चर्चा झाली . आता तर मार्क्स , गांधी , आंबेडकर विचारधारांवर एकञित चर्चा सुरु झाली आहे . वानखेडे यांनी आधीच आंबेडकरी व मार्क्सवादी विचारधारांचा गोफ विणला असल्याने लेखकाला पुढचे बरेच आधी दिसत असल्याचे स्पष्ट होते . मसनद या नव्या कादंबरीत नागवंशीय महार समाजाच्या संस्कृती व इतिहासावर लेखकाने प्रकाश टाकला आहे .  कादंबरीत वास्तवावर कलेचे कातडे चढविलेले असते . कादंबरीला गारुडयाची थैली असेही म्हणतात . मसनदची नायिका नभाचे कुटुंब विदेशात स्थिरस्थावर आहे . नभासमोर करियरचे अनेक आधुनिक पर्याय वडील ठेवतात . पण नभा इतिहास हा अभ्यास विषय निवडते आणि सीमा कोरेगावचे शौर्य हा विषय तिच्या मनात डोकावतो . ती गुगलअंकलची मदत घेते पण तिथे तिच्या वाटयाला निराशात येते . सहकारी मंडळींकडूनही उपेक्षेशिवाय काही मिळत नाही . नभा या विषयावर संशोधनासाठी वेळ मागावून घेते आणि थेट भारतात पोहचते . पुण्यात भांडारकर संस्थेतही तिच्या हाताला काही लागत नाही . ती थेट भिमा कोरेगावला पोहचते . तिथे असतो एक शौर्य स्तंभ . त्याविषयी तिच्याशी कोणी फारसं बोलत नाही . नभाजवळ संशोधकाला लागणारा संयम , चिकाटी असते . ती आपला प्रयत्न सोडत नाही . पुन्हा ती भीमा कोरेगावला पोहचते . चारदोन म्हाता-यांशी बोलताना त्यातला एक म्हातारा तिला थेट घरीच घेऊन जातो . तिथून पुढे नागवंशीय महार समाजाचा इतिहास व संस्कृतीचा परिचय सात ढेगो मेघो यांचेकडून होतो . महार समाज पराक्रमी , लढवय्या होता . तो इथला भूमीपूञ ( मूळ निवासी ) होता हे लेखकाने विविध घटना प्रसंगातून सिध्द केले आहे .

        ढेगो मेघो हे महार समाजाचे गुरु मानले जातात . डाॅ रा.चिं. ढेरे यांनी लज्जागौरी या आपल्या ग्रंथात ढेगोजी मेघोजी हे नाव महार समाजाच्या गुरु घराण्याचे असल्याचे म्हटले आहे . तेराव्या शतकापासूनच ढेगो मेघो हे महार समाजाचे सर्व विधी करीत असत .  लीळा चरीञातही नागवंशी महार समाजाचे आद्य गुरु सोमाजीबाबा यांची आणि चक्रधरांची भेट झाल्याची लिळा सापडते . ( लीळा चरीञ : उत्तरार्ध लीळा क्र २३८ ) चक्रधर आणि सोमाजीबाबा हे समकालीन असल्याचे दिसून येते . ढेगो मेघो हे सोमाजी बाबाचे भक्त . त्यांनी नागपूर पासून तर    कोल्हापूर पर्यंत प्रवास करुन महार समाजाचे विविध धार्मिक विधी पार पाडल्याचे दिसते . पेशवाईतही ढेगो मेघोंचे अस्तित्व दिसून येते . पेशवाईत महारांनी त्यांची लग्ने लावण्याबाबत भटांना विनंती केली तेंव्हा भटांनी महारांची लग्ने लावण्यास नकार दिला . महारांची सर्व कामे त्यांचे गुरु ढेगो मेघो हेच करतात असा निर्वाळा दिल्याची नोंद पेशवे दप्तरात सापडते . ढेगो मेघो हे महारांचे सर्व प्रकारचे पौरोहित्य करीत . त्यासाठी त्यांना दोन रुपये मिळत . कोल्हापूरला असताना  ही रक्कम महालक्ष्मी मंदिरात मोठया हौदात ठेवलेली होती . ती इंग्रजांनी लुटून नेली याचे ऐतिहासिक उल्लेख सापडतात .

     ढेगो-मेघो हे दोघे बंधू धोडी आई आणि कोडाजी बाबा यांचे पोटी जन्माला आले .  ते सोमाजी बाबांचे लढवय्ये शिष्य होते . स्वतः सोमाजी बाबा सन्यस्त असूनही वीर पुरुष होते .  ते जटवाडा जि औरंगाबाद येथील लढाईत बोधल्यांविरुध्द लढले . ढेगो मेघों यांच्या मदतीसाठी सोमाजीबाबा निवडक शिष्यांसह चढाई करुन गेले . या लढाईत ढेगो मेघो शहीद झाले .  औरंगाबादच्या सुभेदाराने ढेगो मेघोंच्या समाधीसाठी चाळीस एकर जमीन दिली . जटवाडा येथे ढेगो मेघोंची समाधी आहे . ढेगो मेघोंच्या नंतर गुरु परंपरा चालविणाराला ढेगो मेघोच म्हटले जाते . सात पिढ्यांची कल्पना मसनद या कादंबरीत कल्पिलेली आहे . महार हे शूद्र नव्हते तर लढवय्ये , पराक्रमी  होते हे महारांचे गुरुंवरुन लक्षात घेता येते .

    डाॅ तुषार मोरे यांनी ढेगो मेघो यांचा धरणीमाता पाणीपिता संप्रदाय असल्याचे संशोधनातून सिध्द केले आहे . ढग आणि मेघ या पदातून पाण्याशी असणारा संबध स्पष्ट होतो . ढग म्हणजे ढग पांढरा व त्याचे रुपांतर मेघ ( काळा ढग )  पाणी देणारा म्हणून त्याला मेघो म्हटले गेले व हे मेघपूजन अनादी काळापासून आजतागायत महार समाजात सुरु असल्याचे स्पष्टीकरण डाॅ तुषार मोरे यांनी दिले आहे .तसेच मर म्हणजे माती . महारांची कुलदेवता मरीआई मानले जाते . प्रत्येक गावात मरीआईचे मंदिर असायचे . गावावर संकट आल्यास मरीआईचा गाडा गावाबाहेर काढत .  पूर्वी पटकी सारखे रोग आल्यास त्याची झळ आख्ख्या गावाला बसत असे . अशावेळी महारांची कुलदेवता असणा-या मरीआईला सगळे गाव साकडे घालीत . तिची खणानारळाने ओटी भरीत . मरीआईची याञा सारे गाव एकञ येवून करे . ढेगो मेघो हे पाण्याशी संबधित आहे तर मरीआई मातीशी संबधित आहे . नागवंशीय महारांची लोकदैवते व लोकसंस्कृती अशी भूमी व पाण्याशी संबधित असल्याचे डाॅ तुषार मोरे यांचे पुस्तक वाचताना लक्षात येते . मानवी संस्कृतीत निसर्ग देवता , निसर्गपूजा यांना महत्व आहे . वैदिकांनी पंचमहाभूते मानली तर अवैदिक , द्रविडी परंपरेत माती ,जल यांना महत्व आले . त्यातून धरणीमाता , पाणीपिता संप्रदायच निर्माण झाला . ढेगो मेघो यांच्या आरत्या मौखिक परंपरेत प्रसिध्द आहेत . महार पुराण नावाची पोथी महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांना हस्तलिखित स्वरुपात मिळाली होती . तिच्यातही म्हार महात्म्य गाईलेले आहे . पोथी वाड़़मयाची रचना अध्यायानुसार असते . रचना काळ आणि फलश्रुतीही सांगितलेली असते . महार महात्म्याचा कर्तो म्हणतो ,

आद्यन्त तुमच्या ववस्याचे म्हैमा | सेस न वर्णावी झाली सीमा |

वेदा न कळे आगमा | मोमववसे अप्रंपार ||२||

हे म्हार महात्म्य कथा आगळी | जो का धरील हृदयकमळी |

तयाचे द्वीतभावाची होळी | करील रुषी मार्कंडी ||२||

अनंत योगापासून | कितीक राजांचे ढळले जन |

परी हा म्हार जुनाट पुरातन | न ढळेची कल्पान्ती ||६||

देव झाले उदंड | परी हा म्हार अक्षय्त कालदंड |

यांच्या हाती नवखंड | केले मुळीच ऋत्यांनी ||७||

महर्षींना मिळालेली ही पोथी हस्तलिखित स्वरुपातील आहे . तिच्यात सोमाजीबाबांचा उल्लेखही सापडतो . खरे तर अशा पोथ्या शोधून त्याचे संशोधन केले पाहीजे . भारतीय परंपरेतील महार समाजाचे स्थान महात्म्य आणि लोकसंस्कृतीवर त्यामुळे प्रकाश पडू शकतो . ढेगो मेघोंचा एक संप्रदाय मानून डाॅ मोरे हा अभ्यास करतात . सोमाजीबाबा नंतर आलेले ढेगो मेघो या गुरुंनी आपली परंपरा निर्माण केलेली दिसते . राकेश वानखेडे ढेगो मेघोंचे तोंडून महारांचा इतिहास कथन करताना महार हे लढवय्ये होते आणि भिमा कोरेगावच्या लढाईत महार पलटणीने पराक्रम गाजविल्याचे कथन करतात .

       १९५६ ला डाॅ बाबासाहेबांनी बुध्द धम्माचा स्वीकार करुन नवपरिवर्तन घडविले . तत्पूर्वीचा महार समाज समजावून घ्यायचा असेल , नागवंशीय महार समाजाची लोकसंस्कृती समजावून घ्यायची असेल तर डाॅ तुषार मोरे यांचे धरणीमाता पाणीपिता संप्रदाय ( ढगो मेघो ) हे पुस्तक उपयोगी ठरते . कवी अॅड अशोक बनसोडे यांनी ही लोकपरंपरा आदिम असल्याचे मान्य केले .सतनामाचा जयघोष करणारी ही परंपरा विदर्भ , मराठवाडा , कोल्हापूर पर्यंत होती . ढेगो मघोच्या आरत्या गायल्या जात होत्या . आखाजीला याञाही भरत होत्या . या संदर्भात मसनद ही कादंबरीही महत्वपूर्ण ठरु शकते . कादंबरीकार काही मिथकांचा वापर करुन आपले कथन करीत असतो . वानखेडे ढेगो मेघोला पराक्रमी पूर्वज म्हणून पेश करीत आहेत आणि ते सार्थ वाटते .

डाॅ शंकर बो-हाडे

९२२६५७३७९१

No comments:

Post a Comment