आरसा समाजमनाचा
प्रवाह - रविवार काॅलम
नाशिक सायक्लिस्टची सायकल वारी
पंढरपूरला वारकरी पायी चालत जातात . एकवीस दिवसापासून तर महिनाभर वारकरी हरिनामाचा गजर करीत चालत असतात . वारीत अनेक दिंड्या सहभागी होतात . वृक्ष दिंडी काढून पर्यावरण रक्षणाचा संदेश दिला जातो . साहित्य संमेलनात ग्रंथदिंडी निघते . वारीची काही आधुनिक रुपे काळानुसार पाहायला मिळतात. नाशिकच्या सायक्लिस्ट मंडळींची सायकल वारी हा उपक्रम २०१२ पासून सुरु आहे . नाशिकचे तत्कालीन पोलिस उपायुक्त हरिष बैजल यांनी आपली आई लज्जावती बैजल यांना श्रद्धांजली म्हणून अवघ्या सात आठ मिञांसह पहिल्यांदाच नाशिक पंढरपूर असा प्रवास केला . पुढे ही संख्या वाढत गेली. आता चारशेच्या आसपास गेली आहे . सायक्लिस्ट या वारीत सहभागी होतात. आरोग्यासाठी सायकल वारी हा उपक्रम दिवसेंदिवस वाढत चालला आहे . प्रदुषण मुक्ती आणि आरोग्याचा मंञ देणारी ही वारी लोकांचा कुतुहलाचा विषय झाली आहे.
पुणे हे सायकलचे शहर अशी पुण्याची ओळख होती . स्कूटर, मोटारसायकल यांनी पुण्याचे रस्ते गजबजून गेले आणि प्रदूषणाचा विळख्यात पुणे सापडले . गावागावात सायकल चालवणारी मंडळी होती . सायकल हे प्रवासाचे साधन होते. कुणाला विश्वासही वाटणार नाही . तीस पस्तीस वर्षापूर्वी नव-या मुलाला हुंडा म्हणून सायकल दिली जात असायची . सायकल हुंडयात मिळाली असे गौरवाने सांगितले जायचे . काळ बदलला आणि सायकलची जागा मोटारसायकल, स्कूटर, स्कुटी यांनी घेतली . दुचाकीची जागा आता चारचाकी उंची गाडयांनी घेतली आहे. त्याचा परीणाम मेध , मधुमेह असे आजार वाढवण्यात झाला . त्यातून मग आहार विहाराविषयी माणूस सजग झाला. तो माॅर्निंग वाॅक करु लागला. कामासाठी, प्रवासासाठी असणारी सायकल हे व्यायामाचे सर्वोत्तम साधन झाले. डाॅक्टर आज डाएटचा सल्ला देतात पण त्याच बरोबर सायकल चालवण्याचा उपाय ही सुचवतात .
नाशिक सायक्लिस्ट ही हौशी लोकांची संस्था आहे . नाशिकचे तत्कालीन पोलिस उपायुक्त हरिष बैजल यांनी आपली आई लज्जावती बैजल यांना श्रद्धांजली म्हणून नाशिक पंढरपूर सायकल वारी केली. नियमितपणे सायकल चालविण्याने आरोग्य उत्तम रहाते हा मंञ मिळाला. आता नाशिकमध्ये सकाळी माॅर्निंग वाॅकला जाणारे भेटतात तसेच सायकल चालविणारेही भेटतात. आपली जुनी सायकल वजनदार होती . तिचा लुक जुनाट होता . रंगही अनाकर्षक होता. सायकलमध्ये काळानुरुप खूपच बदल झाला आहे. वजनाने हलकी, दिसायला सुंदर , गियर असणा-या सायकल विविध कंपन्यांनी बाजारात आणल्या आहेत. त्यांच्या किमतींनी गगन भरारी घेतली आहे . सात लक्ष रुपये किमतीची सायकल शोरुममध्ये आणि रस्त्यावरही आहे . त्याचा परिणाम सायकलची क्रेझ वाढवण्यात झाला आहे . माणूस आधुनिक होत जातो पण परंपरा त्याला सोडत नाही . नाशिक सायक्लिस्ट या संस्थेने अनेक स्पर्धात्मक उपक्रम राबविले . नाशिकचे स्पर्धक जागतिक पातळीवरील स्पर्धेत सहभागी झाले . महाजन बंधूनी अमेरिकेतील सायकल स्पर्धा जिंकून झेंडा रोवला . त्याची दखल थेट पंतप्रधानांनी घेतली. आता तर सायक्लिस्ट कुटुंब पहायला मिळतात . डाॅ नितिन रौंदळ , डाॅ मनिषा रौंदळ आणि त्यांची कन्या अपूर्वा हे याचे उदाहरण . नाशिकमध्ये बालसायक्लिस्टची संख्याही वाढते आहे . अजय राहूदे यांनी बाल सायक्लिस्टचा क्लब सुरु केला आहे . पंढरपूर सायकल वारीत अनेक लहान मुलेमुली पालकांसह सहभागी होतात . अगदी पतीपत्नीही सायकल वारीत भाग घेतात . सायकल वारीत डाॅक्टर, वकील, इंजिनियर, उद्योजकांपासून तर प्राचार्य, शिक्षकही सहभागी असतात . प्राचार्य डाॅ संपतराव काळे हे या वारीतले वारकरी. पंढरपूर सायकल वारी हा उपक्रम दिवसेंदिवस वाढत आहे. जसपालसिंग बिर्दी हा तरुण या उपक्रमात स्वतःला झोकून देत असे . जसपालसिंग हा नाशिक सायक्लिस्टचा अध्यक्ष असताना या उपक्रमाची क्रेझ वाजली. त्याला नाशिक हे सायकलची राजधानी व्हावी असे वाटत होते . त्यासाठी त्याने विविध उपक्रम राबविले. सायक्लिटच्या उपक्रमाला शहरातील उपक्रमांशी जोडले . पण सायकल चालवता चालवता जसपालसिंग बिर्दी अनंतात विलीन झाला . आता उद्योजक छाब्रीया अध्यक्ष आहेत .
तेरा जुलैला नाशिक मधून सायक्लिस्ट पंढरपूरकडे रवाना होतील . पहिला मुक्काम नगरला असेल . नाशिक नगर हा एकशे साठ किलोमीटरचा प्रवास सायक्लिस्ट सहज पार करतील . कारण या मार्गावर अवघड वळणे, चढउतार कमी आहेत . नगर ते टेंभुर्णी हे एकशे चाळीस किलोमीटरचे अंतर कापतांना सायक्लिस्टची कसोटी लागत असते . कारण हा रस्ता चढउताराचा आहे. अवजड वाहने येत जात असतात . मिरजगावपासून पंढरपूरकडे निघालेल्या दिंड्या भेटतात . पावसाची रिपरिप चालू असते. त्यात टेंभुर्णीत निवासाची व्यवस्था परीक्षा पहाणारी असते . आयोजकांची कसोटी टेंभुर्णीतच लागते . तिसरा दिवस आनंदाचा असतो . अवघे पन्नास किलोमीटरचे अंतर दोनअडीच तासात पार पडते . मागिलवर्षी सायकलचे रिंगण असा उपक्रम राबविला गेला. या वर्षी डाॅक्टर मनिषा रौंदळ दोन चाकाची टॅडम या प्रकाराची सायकल घेऊन वारी करणार आहे . मागच्या चाकावर दिव्यांग व्यक्तीला नेणार आहे. आपल्या बरोबर सायकल वारीचा आनंद दिव्यांगाना मिळावा हा त्यांचा उद्देश . सायकल वारीचे वैशिष्ट्य म्हणजे ही वारी भजन पुजन , कीर्तन यासाठी नसते . कर्मकांडे टाळून आरोग्याचा संदेश वारीतून दिला जातो . सायक्लिस्ट असोसिएशन ही हौशी लोकांची संस्था असली तरी कितीतरी सामाजिक उपक्रमात सहभागी होत असतात. रस्ता सुरक्षा , पर्यावरण रक्षण, आरोग्य या विषयी जागृती करणारी ही वारी फक्त नाशिकचीच नाही . नाशिकहून निघणा-या वारीत धुळे. मुंबई. नांदेड अशा दुरदूरुन लोक सहभागी होत असतात. त्यासाठी ऑनलाईन रजिस्ट्रेशन केले जाते . नाशिक सायक्लिस्टच्या संकेतस्थळावर ही माहिती उपलब्ध आहे.
वारी , दिंडी हे आपले सांस्कृतिक मापदंड . वारकरी विठ्ठलाचे भेटीसाठी वारी करतो . वृक्ष दिंडी काढून पर्यावरण रक्षणाचा संदेश दिला जातो आणि सायक्लिस्ट वारीतून आरोग्याचा संदेश वारीतून देत असतात . वारी एकच पण तिची विविध रुपे काळानुसार पाहायला मिळतात.
डाॅ शंकर बो-हाडे
९२२६५७३
No comments:
Post a Comment