१
मुलींना कुठून येत एवढं शहाणपण
बाप दमून भागून आल्यावर एकदम गळयाला मिठी मारतात
मोत्याचा हार गळयात पडलेला पाहून बापाचा शिनभाग घालवतात
उशीरा घरी येणा-या बापासाठी मुली जागत रहातात
टी व्ही पहात असल्याचं नाटक करत
किंवा परीक्षा जवळ आल्याचा बहाणा करत
मुली मोठ्या होतात
चिवचिव चिवणारी चिमणी
अंगाखांदयावरुन दूर जाते
हे कोणतं शहाणपण येतं तिच्यात
मुलगी न्हातीधुती झाल्यावर आईची मैञीण होते
भावासाठी राखी होते
सख्यांची सहेली असते
राजहंसाची वाट बघते
तिला माडांयचा असतो राजा राणीचा संसार
राजा काही येत नाही
डोली काही सजत नाही
बापाच्या डोक्यावरचा कर्जाचा डोंगर पाहून
मुली सरळ सरळ सुसाइड नोट लिहून
कवटाळतात मृत्यूला
मुलींना कुठून येतं एवढं शहाणपण !
२
रस्त्याने चालताना वडीलांचे बोट धरुन चालणारी मुलगी
बोट सोडून कधी चालायला लागते कळतही नाही
कधी वाट चुकते , भरकटते, विस्कटतेही
ती चालत रहाते
दुःखाचे डोंगर चढते,उतरते
ती चालत रहाते
उतारावरुन वेगात वहाणा-या पाण्यासारखी
ती चालत रहाते
ऊन वारा पाऊस गारा
ती चालतच रहाते
बापाचे बोट सुटले तरी बापासाठी झुरते झिजते
मुलींना कुठून येतं एवढं शहाणपण !
३
नवरा टाकलेल्या आईबरोबर रहाताना
मुलगी बापाला विसरत नाही
बापाची फरफट कळते मुलीला
बापाची आठवण छळते मुलीला
No comments:
Post a Comment