Sunday, 1 July 2018

त्यांना आपलं ऑनलाईन भलं करायचं आहे

त्यांना आपलं ऑनलाईन भले करायचे आहे

आधार जोडा ऑनलाईन व्हा

कर्ज माफी हवी ऑनलाईन या

त्यांना आपलं ऑनलाईन भलं करायचं आहे

शिक्षण हवे ऑनलाईन अर्ज करा

शिष्यवृत्ती हवी ऑनलाईन असा

निकालही ऑनलाईनच पहा

त्यांना आपलं ऑनलाईन भलं करायचं आहे

गॅसची मागणी , सबसिडी ऑनलाईनच मिळवा

टॅक्स  , जीएसटी भरा

आपण कॅशलेस सोसायटीचे सभासद आहोत

आपण ऑनलाईन असणं ही कॅशलेस सोसायटीची पहिली अट आहे

म्हणा ,

जो जे वांछिल तो ते लाहो ऑनलाईनच

गाईवासरे गुरेढोरे ऑफलाईन आहे

झोपडया झोपडपट्टया ऑफलाईन आहे

मजूर मजूरांचा बाजार ऑफलाईन आहे

मोलकरीण रामागडी ऑफलाईन आहे

भूक आणि भूकबळी ऑफलाईन आहे

सहीची निशाणी डाव्या हाताचा आंगठावाले ऑफलाईन आहेत

ते ऑनलाईन कधी येतील ?

कॅशलेस सोसायटीचे सभासद कधी होतील ?

भूता परस्परे मैञ जीवांचे कधी जडेल ?

त्यांचं भलं कधी होईल ?

माझं हे प्रश्नोपनिषद संपत नाही

तोवर कॅशलेस सोसायटीत मला रस नाही

शंकर बो-हाडे

सीतेपुढे ओढली लक्ष्मण रेषा

सीते पुढे ओढली लक्ष्मण रेषा

हे विधान मला स्वातंञ्याचा संकोच केल्यासारखे वाटते

सीतेला अग्नि परीक्षेच्या दारी ढकलणारा वाल्मिकी

मला वाल्याकोळी वाटतो

धोब्याला बदनाम करणारा वाल्मिकी ऋषी कसा असेल

तो वाल्यापण विसरला असेल कशावरुन ?

आज सीता ऑफीसला जाताना रोज दरवाजा ओलांडते

तिचा राम तीला वनवासाला पाठवत नाही

ऑफीसला जा असेच सांगतो

घराचे हप्ते , पोरांचं शिक्षण , महागाई सांभाळायची असते तिला

ती बसते वेतन आयोगाची आकडेमोड करत

हिशोब न जुळल्याची सल असते तिच्या मनात

ती धक्के खात खात ऑफीसला जाते आणि येते

तीला कोणत्याच रावणाची भिती वाटत नाही

पे स्लिप पाहिल्यावर रामही रावणाविषयी विचारीत नाही

कपडे आणायला वरचेवर राम धोब्याकडे जातो

सीतेच्या कपड्यावरच्या डागाविषयी ते चर्चाही करत नाही

दमलेला राम कपडे पाहूनच फ्रेश होतो

रामायणात सीतेला न्याय मिळाला नसेल

दामायणात तरी न्यायाचा तराजू तिच्या बाजूने कुठे आहे ?

ती कमावते आणि कमावत रहाते

ती दमते , भागते आणि अग्निपरीक्षा देत रहाते

रावणाचे भय आणि रामाचे अभय ती विसरते

ऑफीसच्या द्वारकेची सम्राज्ञी बनून ती घर चालवते

सीतेपुढे लक्ष्मण रेषा ओढायला रामाला तरी कुठे वेळ आहे ?

मुलींना कुठून येतं एवढं शहाणपण

मुलींना कुठून येत एवढं शहाणपण

बाप दमून भागून आल्यावर एकदम गळयाला मिठी मारतात

मोत्याचा  हार गळयात पडलेला पाहून बापाचा शिनभाग घालवतात

उशीरा घरी येणा-या बापासाठी मुली जागत रहातात

टी व्ही पहात असल्याचं नाटक करत

किंवा परीक्षा जवळ आल्याचा बहाणा करत

मुली मोठ्या होतात

चिवचिव चिवणारी चिमणी

अंगाखांदयावरुन दूर जाते

हे कोणतं शहाणपण येतं तिच्यात

मुलगी न्हातीधुती झाल्यावर आईची मैञीण होते

भावासाठी राखी होते

सख्यांची सहेली असते

राजहंसाची वाट बघते

तिला माडांयचा असतो राजा राणीचा संसार

राजा काही येत नाही

डोली काही सजत नाही

बापाच्या डोक्यावरचा कर्जाचा डोंगर पाहून

मुली सरळ सरळ सुसाइड नोट लिहून

कवटाळतात मृत्यूला

मुलींना कुठून येतं एवढं शहाणपण !

रस्त्याने चालताना वडीलांचे बोट धरुन चालणारी मुलगी

बोट सोडून कधी चालायला लागते कळतही नाही

कधी वाट चुकते , भरकटते, विस्कटतेही

ती चालत रहाते

दुःखाचे डोंगर चढते,उतरते

ती चालत रहाते

उतारावरुन वेगात वहाणा-या पाण्यासारखी

ती चालत रहाते

ऊन वारा पाऊस गारा

ती चालतच रहाते

बापाचे बोट सुटले तरी  बापासाठी झुरते झिजते

मुलींना कुठून येतं एवढं शहाणपण  !

नवरा टाकलेल्या आईबरोबर रहाताना

मुलगी बापाला विसरत नाही

बापाची फरफट कळते मुलीला

बापाची आठवण छळते मुलीला

हसणारी मुलगी मोठी झाल्यावर गंभीर का होते ?

हसणारी खिदळणारी मुलगी मोठी झाली का गंभीर होते

केस मोकळे सोडून ऊनपाळया घेते

केसाचा गुंता सोडवत बसते

अलिकडे मुलगी केस कापते

केसाच्या त-हेत-हेच्या फॅशन करते

परंपरेचा गुंता सोडवते

काल  हसणारी खिदळणारी मुलगी

आज हसू लागल्यावर

बाप का पुजीत बसतो चार घरं ?

पाहुणे येणार म्हटल्यावर ती कावरीबावरी होते

तो राजकुमार असेल का मुलीच्या स्वप्नातला

की कसाई असेल ?

हसणारी खेळणा-या मुली मोठ्या होतात

हासू लपवत रहातात

कुठून येतं मुलीला शहाणपण

वाढत्या वयात. . .

शंकर बो-हाडे

माझ्या समोर दोन रस्ते आहेत

माझ्या समोर दोन रस्ते आहेत

उजव्या बाजूच्या रस्त्यावर मंदीर आहे

तिथे घंटानादात आरती सुरु आहे

याच रस्त्यावर पुढे मस्जीदही आहे

सकाळी सकाळी मौलवीची अजान ऐकू येते

पुढे गेल्यावर चर्चही लागते

रविवारी मंडळी येशूच्या प्रार्थनेसाठी येतात

या रस्त्यावर गुरुद्वाराही आहे

सटरफटर देवतांची ठाणीही आहेत

या रस्त्यावर बौध्द विहारही असायला हवे होते

पण ते भीमनगरात आहे

डाव्या बाजूच्या रस्त्यावरुन मोर्चा चालला आहे

तिथून घोषणा ऐकायला येतात

हमे चाहीए आजादी ,

इन्कलाब जिंदाबाद ,

कोण म्हणत देत नाही

घेतल्या शिवाय रहाणार नाही ,

हम सब एक है

मार्क्स फुले शाहू आंबेडकर यांचा जयजयकारही मोर्चेकरी करताहेत

फारच विचारांचा गलका या रस्त्यावर आहे

मधल्या रस्त्याने जा असं मिञ म्हणतात

तिथे पसायदान म्हटले जातेय

वैष्णव जन तो तेने कहीए ही प्रार्थनाही चालू आहे

खरा तो एकची धर्मचे सूरही ऐकू येताहेत

बुध्दंम् सरणम् गच्छामीही ऐकायला येते आहे

मधल्या रस्त्यानेवरच

अंगणवाडी बालवाडी भरते

शाळाही जवळ आहे

काॅलेजलाही मुलंमुली तिथूनच जातात

अभ्यासिकाही जवळच आहे

वाचनालयातून पुस्तकही आणता येतात

खेळाचे मैदानही लागते मधल्या रस्त्याने

मी कोणत्या रस्त्याने जावू ?

माझा रस्ता कोणता ?

शंकर बो-हाडे

मी मेट्रोन निघालो

मी मेट्रोने निघालोय

तुम्ही या लोकलने

माझी मुलं जातील कानव्हेंटला

तुम्ही घाला सरकारी शाळेत

मी माॅलमध्येच शाॅपींग करतो

तुम्ही जा बाजारात

पिझ्झा बर्गरची मजा काही औरच

तुम्ही मारा मिसळपाववर ताव

मी कॅशलेस सोसायटीचा मेंबर

तुमच्या खिशात चिल्लर खुर्दा

आय लव इंडिया

तुम्ही करा स्वच्छ भारत

माझी गुंतवणूक शेअर्स , बाॅड , डीमॅट द्वारे

तुम्ही करा बचत एफ डी , सेव्हींग खाते काढून

मान्य आहे तुमचा माझा अंतिम मुक्काम एकच

मी अम्ब्ल्युलन्स मध्ये तुम्ही चौघांच्या खांद्यावर

आता तुम्ही ऑडीयन्स आहात

तुम्ही आता ऑडीयन्स आहात

मन की बात ऐका

जन गण मन की बात ऐका

तुम्हाला आता फक्त ऐकायचे आहे

प्राईम टाईमच्या चर्चा ऐका

तिथले औट डेटेड लोक सोयीने बोलतील

पक्षातून प्रवक्तेपण मिळालेले बोलतील

अॅकर मधेमधे बोलत राहतील

ते उगाच तावातावाने बोलत राहतील

तुम्ही फक्त ऐकायचे

तुम्ही ऑडीयन्स आहात

उद्या युध्दाचे ढग जमा होतील

युध्दाचे ढोल बडवले जातील

सीमेवरचा संघर्ष दाखवला जाईल

सैनिक शहीद होतील

ते यावर ऑनलाईन बोलतील

तुम्ही फक्त ऐकायचे

तुम्ही ऑडीयन्स आहात

त्यांच्या लाईव्ह शोसाठी ते तुम्हाला घेऊन जातील

त्यांच्या स्टॅन्ड अप काॅमेडीसाठी तुम्ही फक्त हसायचे

किंवा टाळया वाजवायच्या

अॅकर करील एखाद्या क्षणाला इमोशनल

कॅमेरा ते तुमच्यावर झुम करतील

तुम्ही डोळयाला पदर किंवा रुमाल लावायचा

तुम्ही ऑडीयन्स हे विसरायचे नाही

किंवा

ते तुमची एखाद्या प्रश्नावर बाईट घेतीलही

तुम्हाला ते फार बोलू देणार नाहीत

तेच बोलतील तुमच्या वतीने

तुमच्या प्रश्नाची ते नव्वद सेकंदाची बातमी करतील

स्टोरी रचतील

तुम्ही पहायचं , ऐकायचं

कारण तुम्ही ऑडीयन्स आहात

ते दाखवतील दगड फेकीची न्यूज

गाडयांच्या काचा फोडल्याची ऑनलाईन दृश्य

बंदच्या काळातला शुकशुकाट

ते मोजत बसतील बंद दुकानांची शटर्स

त्यांचा कॅमेरा काही क्षण रस्त्याने जाणा-या म्हातारा म्हतारीवर झुम होईल

तुम्ही फक्त पहायची ती दृश्य आणि ऐकायचे

तुम्ही ऑडीयन्स आहात

ते भारत बंदचा नारा देतील

तुम्ही घराबाहेर पडू नका

रेल्वे बंदचा नारा दिला जाईल

तुम्ही रेल्वेत बसू नका

मन की बात ऐका

जन गण मन की बात ऐका

तुम्हाला आता फक्त ऐकायचे आहे

कारण तुम्ही फक्त आणि फक्त ऑडीयन्स आहात

डाॅ शंकर बो-हाडे

राहिबाई

राहीबाईने पाडयावर झोपडीशेजारी शौचालय बांधले

ती स्वच्छतादूत झाली

आता राहीबाई चॅनलवर दिसतेय

स्वच्छ भारताची आयडाॅल म्हणून

तिच्या झोपडीसमोर बाईटसाठी कॅमेरामन उभा आहे

चुलीतला जाळ नाकातोंडात जातो आहे

तो धुराचे लोट पकडतो कॅमे-यात

राहीबाई नव्वद सेकंद लाईव्ह

तिचा पाडा कायमचा ऑफलाईन

एवढं खपून घर बांधता येत नाही

जगायची काही सोय नाही

आणि

ते

हागायची सोय केली म्हणून राहीबाईवर कॅमेरे उगारताहेत

राहीबाईला न्यूज व्हॅल्यू देणा-या सरकारची

ती लाभार्थी

शंकर बो-हाडे

अटी शर्थी लागू

मंञी म्हणाले
कर्ज माफी तत्त्वतः मान्य
बळीराजा सुखावला
नंतर
अटी शर्थी लागू

काॅल सेंटरवरची बाई म्हणाली
रोज एक जीबी डाटा
इनकमिंग आऊट गोइंगी फ्री
नंतर म्हणाली ,
अटी शर्थी लागू

बॅक मॅनेजरला म्हटलं
जनधनचं खातं काढायचं आहे
मॅनेजर माझ्याशी सटरफटर बोलला
नंतर म्हणाला ,
अटी शर्थी लागू

मैञिणीला म्हटलं
चल  बागेत जावू , हॉटेलात जेवू
थोडी  जवळ ये
( खूप दिवसांनी ती चक्क लाजली )
नंतर म्हणाली ,
अटी शर्थी लागू

बायकोला म्हटलं
थोडासा रुमानी हो जाये
आज काही खास होवून जाऊ दे
ती ही म्हणाली ,
अटी शर्थी लागू

मोकळा श्वास घ्यायचा
अटी शर्थी लागू
आनंदाने जगायचे
अटी शर्थी लागू
मरण तरी
अटी शर्थी विना मिळो

शंकर बो-हाडे

रामाने रावणास मारले - कविता

रामाने रावणास मारले

या वाक्यात मारले हे क्रियापद कशासाठी शिकवित होते गुरुजी

पुढे एकदा तर

रावणाने सीतेचे अपहरण केले हेच गुरुजी पुन्हा पुन्हा सांगत राहीले

बाईचे आणि मायीचे अपहरण करताना काहीच का वाटले नाही कुणाला ?

कधीतरी गुरुजी रंगात येवून महाभारतावर बोलत होते

द्रौपदी वस्ञहरणाचा प्रसंग रंगवून रंगवून सांगत होते

द्रौपदीचे वस्ञहरण करताना कौरवांना लाज का वाटली नसेल ?

पांडव वाट पहात होते का वस्ञहरणानंतरच्या द्रौपदीची ?

पाणिपतात लाखो बांगडी टिचली असे इतिहासाचे शिक्षक म्हणाले

त्या विधवांचे लग्न करायला काय हरकत होती ?

नवे मानवी संसाधन त्यातून जन्माला आले नसते का ?

युध्दात पहीला बळी जातो बाईचा

तिचे अपहरण , स्वामित्व , उपभोग

जेत्यांचा हा कोणता अधिकार ?

आमचे युध्दाचे अभ्यासक्रम कोण विकसित करतो ?

आम्हाला युध्दसज्जतेचा पाठ कोण शिकवतो ?

पुढे होणा-या युध्दाची कोण तयारी करुन घेतो ?

शंकर बो-हाडे

उन्हाळ्याची सुट्टी आणि खेळाची मज्जा

मामाचे गाव आणि खेळाची मज्जा

झुकझुक झुकझुक आगीन गाडी

धुरांच्या रेषा हवेत सोडी

पळती झाडे पाहू या

मामाच्या गावाला जावू या

ही बालकविता आठवण्याचे कारण म्हणजे मुलांची उन्हाळयाची सुट्टी सुरु आहे . उन्हाची काहिली होत असताना बाजारात कलिंगड , आंबे , अननस विकायला आली आहेत . उसाचा रस रस्त्यारस्त्यावर विकणारे दिसत आहेत . मैदानावर , गल्लीत पोरांनी क्रिकेटचा डाव मांडला आहे . एकल कुटुंब व्यवस्थेतील मुलांची काळजी घेणारे पालक विकेंडला मुलांना सोबत फिरायला घेवून जात आहे . मामा मोठा तालेवार राहिला नाही . तो ही टू बी एचके

संस्कृतीचा सभासद झाला आहे . मामाची बायको सुगरण म्हणण्याचा काळ शहरात संपला . आता ती पुरणपोळी किंवा मांडे शाॅपमधूनच घेऊन येते . मामाच्या गावाला जावू या असा काही मामाचा गाव राहिला नाही . मामाच्या शेतीचे तुकडे झाले . नापिकीने मामा दारिद्रयात लोटला . मामाच्या गावातही शेतकरी आत्महत्या सुरु झाल्या . बांधावरुन मामा मामाचे भांडणही सुरु झाले . समृध्दीच्या पैशाचे वाटपात नात्यातील ताणतणाव  वाढला . कवितेतील मामा तालेवार होता . त्याचे गाव समृध्द होते . नद्यानाले वहात असायचे . आंब्याफणसाच्या बागा होत्या पण तो कवितेतला गाव उजाड झाला . राहिले दूर घर माझे अशी मामाची अवस्था झाली .

       उन्हाळयाची सुटी म्हटली की मज्जाच मज्जा . कितीतरी गोष्टींचे शिक्षण या सुटीत व्हायचे . पोहायला जाणे हे शिक्षणच असायचे . समुह संस्कार , सहकार आणि समाजशीलतेचे शिक्षण देणारी ही सुटी होती . श्यामची आई मध्ये लपून बसलेल्या भिञ्या श्यामला मुले पोहायला घेऊन जातात आणि पाण्यात सरळ ढकलून देतात . गटांगळया खात हातपाय हालवत शाम बाहेर येतो . हातपाय हलवल्याशिवाय संकटातून मार्ग निघत नाही हे लहानग्या श्यामला प्रात्यक्षिकातून कळते . श्यामची आई जा रे त्याला घेवून म्हणते . आजची मम्मी तसे करणार नाही . कारण छोट्या कुटुंबात अशी रिस्क कोणती मम्मी घेईल ? शिवाय मोठमोठी धरणे बांधल्यावर पाण्याच्या आवर्तनाची शेतक-यालाच वाट पहावी लागते तर पोहायला पाणी कुठून असणार ? शहरात मुलांची पोहायची ही भूक जलतरण तलाव भागवतात . तिथे प्रशिक्षकही असतो . त्याचे वेळापञकही आखीव रेखीव असते .

         उन्हाळयाच्या सुट्टीत खेळ कितीतरी प्रकारचे असायचे . मुलींच्या सागर गोट्या , ठिक-या , चल्लस हे कमी श्रमाचे खेळ .लंगडी हा मुलींचा खेळ मूलही खेळायची . लगोरी तथा लिंगुरच्या हा खेळही रंगायचा .लपलेल्या खेळाडूला शोधून काढायचा खेळ म्हणजे इस्टाॅप . ( स्टाॅप हा शब्द  कळायला शाळेत जावे लागले ) एकमेकाला चेंडू फेकून मारून गडी बाद करण्याचा खेळ म्हणजे आबाधोबी . या खेळात पळण्याचे , लपण्याचे कौशल्य असायचे .पत्यांचा डावही रंगायचा . लहान मुलांचे तीन दोन पाच , बदाम सात हे खेळ ठरलेले . मुलं थोडी मोठी असतील तर जोडपत्ता . कोट कोट हा उनाड पोरांचा लेख . रमी हा प्रतिष्ठीत खेळ समजला जायचा . रंजनासाठीचा हा पत्याचा खेळ काहींचे व्यसनच होऊन जायचा . मुलांचा विडी दांडू हा खास देशी खेळ . या खेळात चुरस असायची आणि उजळणी आपोआप पाठ व्हायची . दांडू मोजतानाचे कौशल्यही महत्वाचे ठरायचे . बालपण सरल्यावर आम्ही मिञांनी विटूदांडूचा डाव मांडला . वय वाढलेले . विटी मारताना ताकद पणाला  लावून दांडू मारला आणि रस्त्याने चाललेल्या पादचा-याचे कपाळाचा ठाव आमच्या विटीने घेतला . रक्त येवू लागले . बिचारा उदार होता पण शिव्यांची लाखोली वहातच गेला . बालपणातच हे खेळ खेळण्यात मजा असते . सुर पारंब्या हा खास झाडावर चढून खेळण्या खेळ . आम्ही तो खेळण्यापेक्षा पहाण्यातच धन्यता मानायचो . पण आटया पाटया खेळायला कौशल्य लागायचे . तास दोन तास खेळ रंगायचा . देशी खेळात कबड्डी हा महत्वाचा खेळ . खेळाडूला शक्तीबरोबरच युक्तीने बचाव करावा लागायचा . संध्याकाळी मैदानावर जमून वेगवेगळे संघ तयार करुन हा खेळ खेळला जायचा . संघशक्तीचे धडे या खेळातून मिळायचे आणि अपयश येवू नये यासाठी प्रयत्न करा हे शिक्षणही आपोआप व्हायचे . कबड्डी हा खेळ आता प्रतिष्ठा पावतो आहे . आंतरराष्ट्रीय स्तरावर त्याचे ब्रॅडींग होत आहे . देशी खेळापैकी खोखो हा कौशल्याचा खेळ . वेग आणि युक्तीने हा खेळ रंगत असे . कमी वेळात होणारा हा खेळ चुरशीत रंगतदार होत असे . मुलांच्या शरीराला आणि बुध्दीलाही खाद्य देणारे हे खेळ म्हणजे सुटीची मजा असायची . काही विद्वान मुलांनी बुध्दीबळाचा पट मांडलेला असायचा आणि तासंतास हा खेळ चालत असे . बुध्दीबळात बुध्दीचे वैभव होते पण शारीर व्यायामाला संधी नव्हती . खेळ हे आपले सांस्कृतिक वैशिष्टय आहे . कुस्ती हा बलोपासनेचा खेळ . व्यायामाने शरीर कमावणारी काही मुले असत . गावागावात तालमीही असत . तिथे  दंड बैठकापासून तर गदा ( लाकडी ) फिरवणे , जोर काढणे असे प्रकार चालत . उन्हाळयाच्या सुटीत ही बलोपासना मुलांना शिकविली जाई .

      देशी खेळांचा क्षय होत असल्याची भिती आहे . घराचे होम थिएटर झाल्याने खेळ खेळण्यापेक्षा पहाण्याकडे आपला अधिक कल असतो . क्रिकेट पहाण्यात जाणा-या वेळेचा विचार केला तरी कितीतरी मानवी तास आपण वाया घालवतो . मुलं हे सामने बघत बसतात . त्यापेक्षा मला गल्लीतला सचिन तेंडुलकर महत्वाचा वाटतो . सचिन षटकार मारतो , सचिन रण काढतो , सचिन ऑऊट होतो हे प्रात्यक्षिक गल्लीतल्या क्रिकेटमधून मिळते . मी गल्लोगल्लीच्या सचिनचा फॅन आहे . कारण सुटीतल्या क्रिकेटमध्ये सचिन आऊट होतो किंवा नाॅटाऊट रहातो . गल्लीतला सचिन व्हीकीट किपरही असतो आणि रणरही असतो . उन्हाळयाची सुटी या सचिनची जहागिर असते .

    काळ बदलला . सुटीची संकल्पना बदलली . सुटीत मुलांना क्लासेसला पाठविणारे पप्पा मम्मी असतात . अर्थात हे स्काॅलर मुलांचे पप्पा मम्मी . आता सुटीत छंद वर्गही घेतले जातात . मुलांना या बंदिस्त छंद वर्गातून काय मिळत असेत हा प्रश्नच आहे . या सुटीत तरुण दिग्दर्शक सचिन शिंदे याने नाटय प्रशिक्षण शिबीर घेतले . मुलांकडून नाटकातील प्रवेश , एकांक , दीर्घांक बसवून घेतले आणि त्याचे सादरीकरणही केले . असे प्रयोग सुटीची मौज वाढविणारे असतात . मुलांची क्षमता आजमावता येते . बाकीचे उपक्रम सुटी घालवणारेच असतात .

     उन्हाळयाची सुटी आहे मग मुलांना मुक्त खेळू द्यावे . खेळात कौशल्य असते . ऊर्जा असते . बुध्दीचे उपयोजनही करावे लागते . चांगल्या पहिलवानाशी बोललात तरी लक्षात येईल फक्त मांड्या ठोकून पहिलवान होता येत नाही तर कुस्ती बुध्दीचातुर्यानेच निकाली काढता येते . मुलाला सायकल चालवत शाळेत जायचे असेल तर सुटीतच सायकलवर टांग कशी मारायची हे शिकता येते . त्यासाठी पडणे झडणे, खर्चटणे ही पूर्व अट असते . त्याशिवाय सायकलचे प्रशिक्षण पूर्ण होतच नाही . उन्हाळयाच्या सुटीत सायंकाळी मुलं मैदानावर एकञ येत . गोल रिंगण करुन “ मामाचे हरवलेले पञ “ शोधण्याचा खेळ घेतला जायचा . ते पञ शोधताना मजा यायची . मामाची रंगीत गाडी गेली , आगीनगाडी झुकझुक न रहाता फास्ट ट्रेन झाली आणि मामाचे पञ व्यस्त वेळापञकात आणि व्हाॅटस अॅप , एसएमएसच्या जमान्यात कायमचे हरवले .

डाॅ शंकर बो-हाडे

९२२६५७३७९१

नाममहात्म्य

नाममहात्म्य

( आड ) नावात काय असतं ? या लेखात आडनावाची रंजकता मी मांडली होती . आडनावात इतिहास , आख्यायिका , वैशिष्टय पूर्णता असते . काही आडनावे निर्थकही असतात . पण आपली ओळख असणारे नाव हे विशेष नाम असते . त्यामागेही परंपरा , संस्कृती असते . भक्तीभाव किंवा विचार , संस्कारही असतात . माझे नाव शंकर . हे ठेवण्यामागे आई वडीलांची श्रध्दा दिसून येते . माझ्याआधीची अपत्ये जगत नव्हती . आईवडील नारोशंकराला गेले . नवस केला . मुलगा झाला तर त्याचे नाव शंकर ठेवू . आम्ही जन्मलो , जगलो . शंकर या नावाची अशी अख्यायिका आई सांगते . शंकराचे नाव महादेव . त्याचा अपभ्रंश महादू . विरुपाक्ष हे नावही शंकराचेच . निलकंठ , निलेश हे नावही याच परंपरेतले . देवतांच्या नावावरुन मुलांना नावे दिल्याची हजारो उदाहरणे सापडतात . गणांचा अधिपती तो गणपती . एकट्या गणपतीची कितीतरी नावे मुलांना ठेवलेली दिसतील . गणेश , गणपती , गजानन अशी चिक्कार नावे सांगता येतील . हेरंब हे नावही गणेशाचेच . पण वक्रतुंड , एकदंत अशी गणपतीची नावे काही व्यक्तीनामात सापडत नाही . मारोती , बजरंग ही नावे मुलांना शोभतात . राम, रामचंद्र ,रामभाऊ ही देवतेचीच . एखाद्या व्यक्तीचे नाव रावणही असू शकेल . पण दशानन सापडणार नाही . दशमुखे हे आडनाव असू शकेल . विष्णू , दत्त या देवतांवरुनही नावे सापडतात .  लक्ष्मी , रेणुका , अंबा , सरस्वती ही स्ञीनामे देवतेचीच . मुलींच्या नावातही देवता महात्म्य सापडते . ग्रामीण भागात वारकरी परंपरा मानणा-या माणसांनी मुलांना विठ्ठल , विठोबा. मुलींना रुक्मिणी , रखमा ही नावे दिली . आमचेकडे शिक्षणाने अद्याक्षरावरुन ओळख सांगण्याची प्रथा पडली . एस एम जोशी हे श्रीधर महादेव जोशी आहेत हे कुणाला माहित नसते . तसेच प्राचार्य पी व्ही रसाळ हे आमचे मिञ . मी पी. व्ही. या अद्याक्षरातील नावाचा शोध घेतला तेंव्हा पी फाॅर पुंडलिकचा उलगडा झाला . साहजिक विठ्ठलाचा व्ही झाला . विठ्ठलाच्याच घरात पुंडलिक आणि जनाबाईही होतीच . पंढरपूर म्हणजे विठ्ठलाची पंढरी . पंढरी , पंढरीनाथ ही नावेही वारकरी परंपरेतली . पांडुरंग हा विठ्ठलच . विठ्ठलाचे भक्त असणारे निवृत्ती ,ज्ञानेश्वर (ज्ञानोबा ) , सोपान , मुक्ताबाई , एकनाथ , नामदेव , तुकाराम ही विशेष नामेही वारकरी परंपरेतून आली . सावळया विठठ्लाचे नावावरुन सावळीरामही आलेच . नाथ परंपरेतूनही आपल्याकडे मुलांची नावे आली . निवृतानाथ , एकनाथ , कानिफनाथ , जालिंदरनाथ , नवनाथ ही नाथ परंपरेतून आलेली नावे . रामायण , महाभारतातील व्यक्तीरेखांवरुनही नावे आली . रामदास शब्दातील दास हे पद योजून भानुदास , रेणुकादास आणि येशूदास अशीही विशेषनामे झाली . सूर्याला प्रभाकर , दिनकर , भास्कर , रवी म्हणतात . ही सूर्यनामे व्यक्तीनामे झाली मग चंद्र कशाला मागे राहिल . शशी , शशीकांत , शशांक ही चंद्राची नावे मुलांना मिळाली तर त्यांचे प्रकाश किरणांनीही व्यक्तीनामाचा रस्ता धरला . रोहिणी , अनुराधा ,विशाखा , चिञा, स्वाती, फाल्गुणी, कृतिका , रेवती , आश्विनी ही नक्षञे आणि मराठी मासनामेही मुलामुलींना दिली गेली .वसंत,हेमंत, शरद, शिशिर , वर्षा हे ऋतुही विशेषनामे ठरली. ईश्वर हे पद नावात योजून योगेश्वर , रामेश्वर , जोगेश्वरी अशी नावेही मुलामुलींना दिली गेली . १९६० च्या दशकात अशी नावे अधिक सापडत .

            रामनगरीत राम नगरकरांनी एक फर्मास किस्सा ऐकवला आहे . नवरदेव असणा-या रामचंद्र तथा रामला तहान लागते . गंगामावशी , गोदूमावशी , यमुनामावशी यांच्याकडे तो पाणी मागतो पण नद्यांची नावं असणा-या या मावश्या लगीनघाईत नवरदेवाला पाणी द्यायचे विसरुन जातात . गंगा , सिंधू , सरस्वती , कावेरी , यमुना , शरयू या नद्यांची नावे स्ञीनामे झाली . स्ञीनामात देवी महात्म्य जसे सापडते तसे नद्यामहात्म्यही सापडते .स्ञीनामे भाववाचक नामातूनही आलेली दिसतात . सुंदर , सुमन ही स्ञीनामे या प्रकारातली .स्ञी आणि सौंदर्य याला महत्व आहे . स्वर्गातील अप्सरा,  मेनका , रंभा , उर्वशी या त्यातूनच पृथ्वीवरही अवतरल्या .तरी स्ञीनामात नकुशी ( नकोशी ) असेही नाव मुलीला दिले गेले . मुलगा झाला तर आनंद व्यक्त करणारा समाज मुलगी नको हा विचार नकुशी या नावातून तर व्यक्त करत नसतील ? मध्यंतरी सुप्रिया सुळे यांनी या नकोश्या मुलींची नावे तेजस्विनी करण्याचा कार्यक्रम घेवून आमच्या नकोश्या विचारांना तेजस्वी बनविले होते . माझे एक प्राचार्य मिञ आहेत डाॅ के एन गणगे . एका कार्यक्रमात मला त्यांच्याविषयी बोलायचे होते . मी मराठीचा बरा अभिमानी आणि आद्याक्षर प्रथेचा समर्थक नसल्याने सरांना के फाॅर काय ? असे सरळच विचारले . ते क्षणभर गप्प झाले . विक्षानशाखेतील पीएच डी धारक आणि प्राचार्यांसमोर असे धाडस कोण करणार ? सरांनी काही क्षणांनी आपले मराठी नाव सांगितले कचरु . विशेषनामात अशी दगडू , धोडू , कचरू अशी नावे काही मुलांना का ठेवत असतील ? त्याचेही उत्तर नंतरच्या काळात मिळाले . रोगराईपसरली की मुलं दगावत . एखाद्या घरात मुल जगत नसे . घरात मुल जगावं , कुणाची दृष्ट लागू नये म्हणून मुलांची नावे कचरु , दगडू , धोंडू अशी ठेवित असत . कचरा , दगड , गोटे असणारी ही मुले जगत असत आणि उंच भरारी घेत असत . प्राचार्य डाॅ के एन गणगे यांनी पंढरपूर काॅलेजला नॅकच्या मानांकनात अग्रस्थान मिळवून दिले हा त्याचा पुरावा . कचरु , दगडू , नकुसा ही नावे ग्रामीण भागात आणि ब्राह्मणेतर , दलित समाजात ठेवली जात . त्यातून लोकसंस्कृती ध्वनीत होत असे . अर्थात १९५६ मध्ये डाॅ बाबासाहेब आंबेडकरांनी बौध्दधम्म स्वीकारला आणि मुलामुलींची नावेही बदलली . सम्राट अशोक , राजा हर्षवर्धन , गौतम . सिध्दार्थ , महेंद्र , राहुल , मिलींद  अशी बौध्द राजे व तत्वज्ञानी यांची नावे मुलांना मिळाली . धम्मसंगिनी , संघमिञा ही मुलींची नावे आली . बुध्दभूषण हे नावही त्याच परंपरेतले . हा खुलासा नरेंद्र जाधव यांचे भाषणातून झाला . ही दृष्टी बौध्दधम्मातून आली .

           राजे व पराक्रमी पुरुषांची नावेही मुलामुलींना दिली गेली . शिवाजी , संभाजी , येसाजी ( यशवंत ) , राजाराम , तानाजी ही पुरुष नामे याची निदर्शक . बहुजन समाजात ही नावे अधिक सापडतात . राजा म्हणजे इंद्र . राजेंद्र , नरेंद्र , देवेंद्र , महेंद्र ही नावे इंद्र हे पद योजून तयार होतात . शिवाजी हे नाव ब्राह्मण समाजात फार सापडत नाही . तरी अमरावतीचे शिवाजीराव पटवर्धन यांचे नावही विसरता येत नाही . विवेकानंद या नावातले नंद हे पद घेवून अजितानंद , प्रज्ञानंद अशीही नावे घडवली गेली . विशेषतः साधू महाराजांच्या नावात नंद हे पद योजून विशेषनामे घडविली जातात .उदा . स्वरुपानंद . इंग्रजीच्या प्रभावातून साहेब हे पद योजून नावे घडविली गेली . राव हे पद बायकांचे आवडते . उखाणा घेतांना रावांचे नाव घेते तुमचा मान राखून असे यमक जुळविलेले दिसते . साहेबराव हे त्याचे ठळक उदाहरण .  नाशिक नगरजिल्हयात अण्णासाहेब , रावसाहेब , भाऊसाहेब , नानासाहेब अशी नावे सापडतात . घरातील प्रमुखाला कारभारी म्हणतात . पतीला कारभारी म्हण्याची प्रथा होती . त्यातून कारभारी हे विशेषनामही आले .

           नागराज मंजुळे यांची शाॅर्टफिल्म होती “ पिस्तुल्या “ हा पिस्तुल्या कोण ? फासे पाथधी समाजातील एक मुलगा . फासेपारधी समाज अजूनही खूप मागे आहे . शिक्षणापासून दूर असणारी फासेपारधी जमात  गुन्हेगारीसाठी प्रसिध्द आहे . त्यातल्या मुलांची नावे डॅशिंग , डेरिंग , झटक्या , चिणपाट अशी ठेवलेली आढळतात . हिंदी इंग्रजी भाषेचे मिश्रण असणारी शायनिंग , बिस्कीटया , टेलरिंग , खटपटया , जंक्शन , गुगली , पावडर ही नावे फासेपारध्यांचीच . बारक्या , झारमड , कुडमुडया , लुकतुक्या ही फासेपारध्यांची नावे प्रकृतीधर्मावरुन घेतलेली असावी . रोशन , गुलशन ही त्यापैकी शोभिवंत नावे . फासेपारधी समाज शिक्षण प्रवाहात येवून संस्कृतीकरणाची वाटचाल करील तेंव्हा ही नावे बदलतील पण आज माञ पुस्तूल्याचे वास्तवच आपल्याला स्वीकारावे लागते .

           ख्रिस्ती समाजातही संतांची नावे मुलामुलींना मिळालेली दिसतात . ख्रिस्ती मिशन-यांनी धर्म प्रसार करुन इंडियन ख्रिस्ती समाज निर्माण झाला . ख्रिस्ती संतांची मोठी परंपरा त्या धर्मात आहे .फ्रान्सिस वाघमारे यांचे वडील मुरलीधर वाघमारे यांनी ख्रिस्तीधर्म स्वीकारल्यावर आपल्या मुलांची नावे लुईस , ऑगस्टीन , मेरी , अॅग्नेस , मार्था , मारिया , तेरेसा , वेरोनिका , एलिझाबेथ अशी ठेवली . पिटर , पाॅल , मार्टीन , अॅन्थोनी , जेकब , जोसेफ , ऑगस्टीन , सॅम्युल , मार्क , मॅथ्यू , मोझेस , अब्राहम ही नावे ख्रिस्ती संतांची किंवा तत्वज्ञांची तरी असतील . तिच गोष्ट मुस्लिम समाजातही दिसून येईल . अल्लाची शंभर नावे मुलांना दिली आहेत . रहमान , मलिक , अजिज , जब्बार , गफ्फार , वहाब , रज्जाक , अलिम , खाफिद , अली , हफिज , मुक्तदीर , वाली , रऊफ , वारिस , रशिद , मुजीब , हकीम , कय्यूम, वाजिद , कादीर ही प्रेषिताचीच नावे आहेत . आपण वकील नेमतो . हा वकील म्हणजे साक्षात प्रेषितच . मुस्लिम समाजात पराक्रमी पुरुषांची  , सुफी संतांची आणि शायरांची नावेही घेतलेली दिसतील . आदम , आयुब हे पराक्रमीच योध्देच होते. ख्वाजा , दस्तगीर , निजामुद्दीन , मीर तकी मीर हे सुफी संत होते . मुस्लिमांचे पविञ महीने रमजान , शाबान यावरुनही मुलांची नावे सापडतात . आमचे मार्गदर्शक प्रा . प्रमोद वागदरीकरांनी मुलीचे नाव सकीना ठेवलेले होते . सकीना ही पैगंबर साहेबांची मुलगी . डाॅ नरेंद्र दाभोळकरांचा हमीद हे नाव मुस्लिम संस्कृतीतूनच आले .निळू फुले यांच्या मुलीचे नाव गार्बो . आमच्या घरात मूल जन्माला आले तेंव्हा साधनाचे संपादक यदूनाथ थत्ते यांनी बौध्द तत्वज्ञानातील , परंपरेतील नावे पञाने कळविली होती . आनंदवर्धन , गुणवर्धन , स्नेहवर्धन , हर्षवर्धन , शीलभद्र अशी काही नावे सुचविली होती . हर्षवर्धनला कुसुमाग्रजांचे अनुमोदन मिळाले . धर्मनिरपेक्ष तत्वज्ञान मानणा-या माणसांनी जाणिवेच्या पातळीवर अशी नावे ठेवलेली दिसतात .

       ख्रिस्तीधर्मांतराची लाट स्वातंञ्यानंतर ओसरली आणि मिशन-यांच्या शाळेत घालणे गरजेचे राहीले नाही . मुलांची नावे ऑगस्टीन असेल तर आनंद , अनंत करण्याची प्रवृत्ती बळावली . सुवार्ताचे स्वार्था नाव त्यातून पुढे आले . प्रत्येक काळात काही एक नाव ठेवण्याची प्रवृत्ती दिसते . अशोक हे नाव एका गावात अनेक मुलांचे ठेवले गेले . माझे मिञ ज्ञानोबा ढगे यांचे गावात ज्ञानोबा नावाची सतरा मुले होती . पुढील काळात सृष्टी हे मुलीचे नाव ठेवण्याची क्रेझ निर्माण झाली आणि अनेकजणींचे नाव सृष्टी ठेवले गेले . नाम महात्म्यात काळाचा महिमाही दिसून येतो .

            काळ बदलला . नाममहात्म्यातही बदल झाला . मुलामुलींच्या नावातही कितीतरी छटा आल्या . कालची संगिता आज स्वरा झाला . ऋतुजा , क्षितीजा , संहिता अशी मुलींची नावे आली . ऐश्वर्या हे फक्त नटीचे नाव राहीले नाही . ऋत्विक असे मुलाचे नावही आले . श्लोक , ओवी , गाथा ही परंपरेतील नावे नव्याने रुढ झाली .आमच्या रणुकाका गुजरांनी पहिल्या मुलीचे नाव ठेवले मेघा . नंतरच्या मुलीचे नाव वर्षा . तिसरी मुलगी झाली . तिचे नाव ठेवले सरिता आणि शेवटी घरात जन्मला तो सागर . मेघा, वर्षा, सरिता , सागर अशी अन्वयर्थक नावे देणारे पालक आज वाढले आहे . एकल कुटुंबात जन्मणा-या बाळाचे नाव हटके ठेवण्याकडे मातापित्यांचा कल आहे . काळ बदलला आणि नाममहात्म्यही बदलत गेले .