Sunday, 1 July 2018

त्यांना आपलं ऑनलाईन भलं करायचं आहे

त्यांना आपलं ऑनलाईन भले करायचे आहे

आधार जोडा ऑनलाईन व्हा

कर्ज माफी हवी ऑनलाईन या

त्यांना आपलं ऑनलाईन भलं करायचं आहे

शिक्षण हवे ऑनलाईन अर्ज करा

शिष्यवृत्ती हवी ऑनलाईन असा

निकालही ऑनलाईनच पहा

त्यांना आपलं ऑनलाईन भलं करायचं आहे

गॅसची मागणी , सबसिडी ऑनलाईनच मिळवा

टॅक्स  , जीएसटी भरा

आपण कॅशलेस सोसायटीचे सभासद आहोत

आपण ऑनलाईन असणं ही कॅशलेस सोसायटीची पहिली अट आहे

म्हणा ,

जो जे वांछिल तो ते लाहो ऑनलाईनच

गाईवासरे गुरेढोरे ऑफलाईन आहे

झोपडया झोपडपट्टया ऑफलाईन आहे

मजूर मजूरांचा बाजार ऑफलाईन आहे

मोलकरीण रामागडी ऑफलाईन आहे

भूक आणि भूकबळी ऑफलाईन आहे

सहीची निशाणी डाव्या हाताचा आंगठावाले ऑफलाईन आहेत

ते ऑनलाईन कधी येतील ?

कॅशलेस सोसायटीचे सभासद कधी होतील ?

भूता परस्परे मैञ जीवांचे कधी जडेल ?

त्यांचं भलं कधी होईल ?

माझं हे प्रश्नोपनिषद संपत नाही

तोवर कॅशलेस सोसायटीत मला रस नाही

शंकर बो-हाडे



सीतेपुढे ओढली लक्ष्मण रेषा

सीते पुढे ओढली लक्ष्मण रेषा

हे विधान मला स्वातंञ्याचा संकोच केल्यासारखे वाटते

सीतेला अग्नि परीक्षेच्या दारी ढकलणारा वाल्मिकी

मला वाल्याकोळी वाटतो

धोब्याला बदनाम करणारा वाल्मिकी ऋषी कसा असेल

तो वाल्यापण विसरला असेल कशावरुन ?

आज सीता ऑफीसला जाताना रोज दरवाजा ओलांडते

तिचा राम तीला वनवासाला पाठवत नाही

ऑफीसला जा असेच सांगतो

घराचे हप्ते , पोरांचं शिक्षण , महागाई सांभाळायची असते तिला

ती बसते वेतन आयोगाची आकडेमोड करत

हिशोब न जुळल्याची सल असते तिच्या मनात

ती धक्के खात खात ऑफीसला जाते आणि येते

तीला कोणत्याच रावणाची भिती वाटत नाही

पे स्लिप पाहिल्यावर रामही रावणाविषयी विचारीत नाही

कपडे आणायला वरचेवर राम धोब्याकडे जातो

सीतेच्या कपड्यावरच्या डागाविषयी ते चर्चाही करत नाही

दमलेला राम कपडे पाहूनच फ्रेश होतो

रामायणात सीतेला न्याय मिळाला नसेल

दामायणात तरी न्यायाचा तराजू तिच्या बाजूने कुठे आहे ?

ती कमावते आणि कमावत रहाते

ती दमते , भागते आणि अग्निपरीक्षा देत रहाते

रावणाचे भय आणि रामाचे अभय ती विसरते

ऑफीसच्या द्वारकेची सम्राज्ञी बनून ती घर चालवते

सीतेपुढे लक्ष्मण रेषा ओढायला रामाला तरी कुठे वेळ आहे ?

मुलींना कुठून येतं एवढं शहाणपण


मुलींना कुठून येत एवढं शहाणपण

बाप दमून भागून आल्यावर एकदम गळयाला मिठी मारतात

मोत्याचा  हार गळयात पडलेला पाहून बापाचा शिनभाग घालवतात

उशीरा घरी येणा-या बापासाठी मुली जागत रहातात

टी व्ही पहात असल्याचं नाटक करत

किंवा परीक्षा जवळ आल्याचा बहाणा करत

मुली मोठ्या होतात

चिवचिव चिवणारी चिमणी

अंगाखांदयावरुन दूर जाते

हे कोणतं शहाणपण येतं तिच्यात

मुलगी न्हातीधुती झाल्यावर आईची मैञीण होते

भावासाठी राखी होते

सख्यांची सहेली असते

राजहंसाची वाट बघते

तिला माडांयचा असतो राजा राणीचा संसार

राजा काही येत नाही

डोली काही सजत नाही

बापाच्या डोक्यावरचा कर्जाचा डोंगर पाहून

मुली सरळ सरळ सुसाइड नोट लिहून

कवटाळतात मृत्यूला

मुलींना कुठून येतं एवढं शहाणपण !


रस्त्याने चालताना वडीलांचे बोट धरुन चालणारी मुलगी

बोट सोडून कधी चालायला लागते कळतही नाही

कधी वाट चुकते , भरकटते, विस्कटतेही

ती चालत रहाते

दुःखाचे डोंगर चढते,उतरते

ती चालत रहाते

उतारावरुन वेगात वहाणा-या पाण्यासारखी

ती चालत रहाते

ऊन वारा पाऊस गारा

ती चालतच रहाते

बापाचे बोट सुटले तरी  बापासाठी झुरते झिजते

मुलींना कुठून येतं एवढं शहाणपण  !


नवरा टाकलेल्या आईबरोबर रहाताना

मुलगी बापाला विसरत नाही

बापाची फरफट कळते मुलीला

बापाची आठवण छळते मुलीला


हसणारी मुलगी मोठी झाल्यावर गंभीर का होते ?

हसणारी खिदळणारी मुलगी मोठी झाली का गंभीर होते

केस मोकळे सोडून ऊनपाळया घेते

केसाचा गुंता सोडवत बसते

अलिकडे मुलगी केस कापते

केसाच्या त-हेत-हेच्या फॅशन करते

परंपरेचा गुंता सोडवते

काल  हसणारी खिदळणारी मुलगी

आज हसू लागल्यावर

बाप का पुजीत बसतो चार घरं ?

पाहुणे येणार म्हटल्यावर ती कावरीबावरी होते

तो राजकुमार असेल का मुलीच्या स्वप्नातला

की कसाई असेल ?

हसणारी खेळणा-या मुली मोठ्या होतात

हासू लपवत रहातात

कुठून येतं मुलीला शहाणपण

वाढत्या वयात. . .



शंकर बो-हाडे

माझ्या समोर दोन रस्ते आहेत

माझ्या समोर दोन रस्ते आहेत

उजव्या बाजूच्या रस्त्यावर मंदीर आहे

तिथे घंटानादात आरती सुरु आहे

याच रस्त्यावर पुढे मस्जीदही आहे

सकाळी सकाळी मौलवीची अजान ऐकू येते

पुढे गेल्यावर चर्चही लागते

रविवारी मंडळी येशूच्या प्रार्थनेसाठी येतात

या रस्त्यावर गुरुद्वाराही आहे

सटरफटर देवतांची ठाणीही आहेत

या रस्त्यावर बौध्द विहारही असायला हवे होते

पण ते भीमनगरात आहे

डाव्या बाजूच्या रस्त्यावरुन मोर्चा चालला आहे

तिथून घोषणा ऐकायला येतात

हमे चाहीए आजादी ,

इन्कलाब जिंदाबाद ,

कोण म्हणत देत नाही

घेतल्या शिवाय रहाणार नाही ,

हम सब एक है

मार्क्स फुले शाहू आंबेडकर यांचा जयजयकारही मोर्चेकरी करताहेत

फारच विचारांचा गलका या रस्त्यावर आहे

मधल्या रस्त्याने जा असं मिञ म्हणतात

तिथे पसायदान म्हटले जातेय

वैष्णव जन तो तेने कहीए ही प्रार्थनाही चालू आहे

खरा तो एकची धर्मचे सूरही ऐकू येताहेत

बुध्दंम् सरणम् गच्छामीही ऐकायला येते आहे

मधल्या रस्त्यानेवरच

अंगणवाडी बालवाडी भरते

शाळाही जवळ आहे

काॅलेजलाही मुलंमुली तिथूनच जातात

अभ्यासिकाही जवळच आहे

वाचनालयातून पुस्तकही आणता येतात

खेळाचे मैदानही लागते मधल्या रस्त्याने

मी कोणत्या रस्त्याने जावू ?

माझा रस्ता कोणता ?

शंकर बो-हाडे

मी मेट्रोन निघालो

मी मेट्रोने निघालोय

तुम्ही या लोकलने

माझी मुलं जातील कानव्हेंटला

तुम्ही घाला सरकारी शाळेत

मी माॅलमध्येच शाॅपींग करतो

तुम्ही जा बाजारात

पिझ्झा बर्गरची मजा काही औरच

तुम्ही मारा मिसळपाववर ताव

मी कॅशलेस सोसायटीचा मेंबर

तुमच्या खिशात चिल्लर खुर्दा

आय लव इंडिया

तुम्ही करा स्वच्छ भारत

माझी गुंतवणूक शेअर्स , बाॅड , डीमॅट द्वारे

तुम्ही करा बचत एफ डी , सेव्हींग खाते काढून

मान्य आहे तुमचा माझा अंतिम मुक्काम एकच

मी अम्ब्ल्युलन्स मध्ये तुम्ही चौघांच्या खांद्यावर

आता तुम्ही ऑडीयन्स आहात

तुम्ही आता ऑडीयन्स आहात

मन की बात ऐका

जन गण मन की बात ऐका

तुम्हाला आता फक्त ऐकायचे आहे

प्राईम टाईमच्या चर्चा ऐका

तिथले औट डेटेड लोक सोयीने बोलतील

पक्षातून प्रवक्तेपण मिळालेले बोलतील

अॅकर मधेमधे बोलत राहतील

ते उगाच तावातावाने बोलत राहतील

तुम्ही फक्त ऐकायचे

तुम्ही ऑडीयन्स आहात

उद्या युध्दाचे ढग जमा होतील

युध्दाचे ढोल बडवले जातील

सीमेवरचा संघर्ष दाखवला जाईल

सैनिक शहीद होतील

ते यावर ऑनलाईन बोलतील

तुम्ही फक्त ऐकायचे

तुम्ही ऑडीयन्स आहात

त्यांच्या लाईव्ह शोसाठी ते तुम्हाला घेऊन जातील

त्यांच्या स्टॅन्ड अप काॅमेडीसाठी तुम्ही फक्त हसायचे

किंवा टाळया वाजवायच्या

अॅकर करील एखाद्या क्षणाला इमोशनल

कॅमेरा ते तुमच्यावर झुम करतील

तुम्ही डोळयाला पदर किंवा रुमाल लावायचा

तुम्ही ऑडीयन्स हे विसरायचे नाही

किंवा

ते तुमची एखाद्या प्रश्नावर बाईट घेतीलही

तुम्हाला ते फार बोलू देणार नाहीत

तेच बोलतील तुमच्या वतीने

तुमच्या प्रश्नाची ते नव्वद सेकंदाची बातमी करतील

स्टोरी रचतील

तुम्ही पहायचं , ऐकायचं

कारण तुम्ही ऑडीयन्स आहात

ते दाखवतील दगड फेकीची न्यूज

गाडयांच्या काचा फोडल्याची ऑनलाईन दृश्य

बंदच्या काळातला शुकशुकाट

ते मोजत बसतील बंद दुकानांची शटर्स

त्यांचा कॅमेरा काही क्षण रस्त्याने जाणा-या म्हातारा म्हतारीवर झुम होईल

तुम्ही फक्त पहायची ती दृश्य आणि ऐकायचे

तुम्ही ऑडीयन्स आहात

ते भारत बंदचा नारा देतील

तुम्ही घराबाहेर पडू नका

रेल्वे बंदचा नारा दिला जाईल

तुम्ही रेल्वेत बसू नका

मन की बात ऐका

जन गण मन की बात ऐका

तुम्हाला आता फक्त ऐकायचे आहे

कारण तुम्ही फक्त आणि फक्त ऑडीयन्स आहात

डाॅ शंकर बो-हाडे