Sunday, 20 November 2016

                                     
                                   वकीलांचे साहित्य संमेलन होऊ द्या
                   कालपरवाची गोष्ट. अॅड दौलतराव घुमरे यांच्या तीन पुस्तकांचे प्रकाशन होते . अडॅ घुमरे हे ज्येष्ठ   विधीज्ञ. वयाच्या नव्वदीत त्यांनी आपले अनुभव संचित शब्दबध्द केले . लाॅयर हे त्यांचे आत्मकथन . प्रकाशन समारंभास अॅड धैर्यशील   पाटील ,अॅड उज्वल  निकम , न्या साधना जाधव असे दिग्गज होते . मराठी साहित्याच्या अंगणात हे सारस्वताचे झाड वाढविणारी वकील मंडळीही आहेत आणि त्यांनी साहित्यसेवा करून आपले योगदान मराठी साहित्याला दिले असे म्हटले तर ते अयोग्य ठरणार नाही . वकीलाला  विविध कथांचा उलगडा होत असतो . डाॅक्टर माणसाचे वस्ञाविना शरीर पहात असतो . वकीलासमोर वस्ञाच्याआतील माणसाचे चरीञ आणि चारिञ्य येत असते . म्हणून वकीलाचे लेखन हे वास्तवाच्या पायावर उभे असते . मला वाटतं वकीलांनी मोठ्या संख्येने आपले अनुभव  लिहीले तर मोठ्या अक्षर वाऽमय निर्माण होऊ शकते . वकीलांना घटनांचे कितीतरी पदर माहित असतात . अजून मानवी जीवनाचे खरे रहस्य साहित्यातही पुरते अवतरले नाही .
              स्वातंञ्य चळवळीतले कितीतरी नेते कायद्याचे पदवीधर , द्वीपदवीधर होते . न्या महादेव गोविंद रानडे यांनी ग्रंथकार सभा भरवून अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाची मुहूर्तमेड रोवली .मराठी सत्तेचा उदय हा त्यांचा महत्वपूर्ण ग्रंथ . लोकहितवादी गोपाळ हरी देशमुख यांची शतपञे प्रसिध्द आहेत . ते कायदा क्षेञातच कार्यरत होते . बाळ गंगाधर टिळक हे वकीलीची परीक्षा पास होऊन भारतीय असंतोषाचे जनक ठरले . स्वातंञ्यवीर सावरकर हे ही बॅरिस्टर होऊन स्वातंञ्य लढ्याचे नेतृत्व करीत होते . मोहनदास करमचंद गांधी हे बॅरिस्टर होऊनच भारतात आले आणि स्वातंञ्य लढ्याचे नेतृत्व करू लागले . डाॅ बाबासाहेब आंबेडकर यांनी कितीतरी खटल्यात बाजू मांडली . फाळणीपूर्व अखंड हिंदुस्थानचे नेते महमद अली जीना हे बॅरिस्टरच होते . यांनी चळवळीचे साधन म्हणून साहित्याकडे पाहीले .  लोकमान्य टिळक यांनी केसरी , मराठा या वृत्तपञातून अग्रलेख लिहून सरकारचे स्वरुप विस्तारण केले . मंडालेच्या तुरुंगात असताना " गीतारहस्य " हा ग्रंथ लिहीला .गांधीजींनी यंग इंडिया , हरिजन मधून लिहीले . डाॅ बाबासाहेब आंबेडकरांनी मूकनायक , बहिष्कृत भारत या पञांबरोबरच स्वतंञ ग्रंथसंपदाही निर्माण केली . पं जवाहरलाल नेहरू यांचा " भारताचा शोध " हा मूलभूत ग्रंथ ठरला . काॅग्रेसचे त्तकालिन नेते न. वि. तथा काकासाहेब गाडगीळ हे प्रवासवर्णनकार म्हणूनही प्रसिध्द आहेत . ही सर्व मंडळी कायदा क्षेञातली होती . काहींनी वकीलीची सनद घेउनही वकीली केली नाही . डाॅ बाबासाहेब आंबेडकरांनी माञ बाह्मणेतर चळवळीतील जेधे-जवळकर , र.धो.कर्वे यांच्या खटल्यात वकीली केली . तरी त्यांच वैचारिक वाऽमयाच्या क्षेञातील स्थान अव्वल दर्जाचेच मानावे लागते . टिळक - आंबेडकर यांच्याशिवाय स्वातंञ्य लढयाचा आणि प्रबोधनाच्या चळवळीचा तसेच वाऽमयाचा इतिहास लिहीला जावू शकत नाही . स्वातंञ्यपूर्व काळातील वकीलांच्या साहित्याचे प्रयोजन स्वातंञ्य लढा , समाज परिवर्तन असे होते . ते साहित्य ललित आणि दलित असे दोन्ही नव्हते . चळवळीचे साधन होते . बी. सी. कांबळे यांनी त्याच न्यायाने डाॅ आंबेडकरांचे चरीञ खंड लिहीले . आधुनिक मराठी साहित्याचा हा पूर्वकाळ होता .  
                    खरं तर तज्ञ वकीलांनी केलेले लेखन हे कायदा क्षेञाविषयी आणि इंग्रजी या भाषिक माध्यमातून . या पुस्तकांची मराठी भाषांतरेही झाली . त्यांना विविध मानसन्मानही मिळाले . वुई दी पिपल हे न्या छगलांचे पुस्तक महत्वपूर्ण ठरते. कायदा क्षेञात वकील , न्यायधीश यांनी साहित्याच्या क्षेञात महत्वपूर्ण भर घातली आहे  कायद्याचा.अन्वयार्थ स्पष्ट करणारी , एखाद्या वेगळया केसचा पैलू स्पष्ट करणारी आंग्ल भाषेतील ही पुस्तके रूपांतरित होऊन मराठीत आली आहेत . अलिकडील भास्करराव आव्हाड , काका घुगे , दौलतराव घुमरे यांची ग्रंथ संपदा हे याचे उदाहरण ठरावे .सातारच्या धैर्यशील पाटलांच्या " ओल्ड वर्ल्ड , न्यू होरायझन्स  " या पुस्तकाला नेहरू पारितोषिकही मिळाले आहे . मिस रूल ऑफ लाॅ ,मिस युज ऑफ लाॅ , ही काका घुगे यांची पुस्तके प्रसिध्द आहेत . भास्करराव आव्हाड यांचे वैदीक न्यायशास्ञावरील पुस्तक मराठीत आले आहे .
                   आधुनिक मराठी साहित्यात भाऊसाहेब पाटणकरांच्या गझला प्रसिध्द आहेत . पुन्हा एकदा हा धैर्यशील पाटील यांच कविता संग्रह तर दलित कवी अशोक बनसोडे यांचा माझ्या बापाचा बाप संग्रह वकील कवीही आहेत याचा पुरावा मानावा लागतो . शंकरराव खरातांचे तराळ अंतराळ हे आत्मकथन प्रसिध्द आहे . कथाकार , कादंबरीकार असणा-या शंकरराव खरातांनी जळगावच्या साहित्य संमेलनाचे अध्यक्षस्थानही भूषविले आहे . बाबा कदम हे  लोकप्रिय कादंबरीकार . वाचनालयात त्यांच्या कादंब-या वाचनासाठी प्रतिक्षायादी असायची . ते ही वकीलांचेच प्रतिनिधी . बाळासाहेब भारदे हे विधानसभेचे सभापती असले तरी संत साहित्यावर त्यांनी ग्रंथ लेखनही केले आहे . रयत शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष पद भषविलेल्या रावसाहेब शिंदे यांचे ध्यासपर्व हे आत्मकथन . त्यांनी भावलेली माणसं या शीर्षकाने व्यक्तीचिञेही लिहीलेली आहेत . त्यांच्या पञलेखनाचे संवाद पर्व खंडात्मक रुपात प्रसिध्द आहे . काकासाहेब कालेलकरांनंतर प्रवास वर्णन लिहीणारे लेखक भास्करराव आव्हाड . त्यांची क्षितिजापार , कोलंबसाचा मागोवा , शोध कांगारूंचा ही प्रवास वर्णने पसिध्द आहेत . त्यांनी प्रसंगाप्रसंगाने लिहीलेल्या स्फुट लेखनातून पंचनामा , विविधा -एक, दोन असे संग्रह पसिध्द झाले आहेत . मरूद्यान , उद्यानविश्व असे कविता संग्रह लिहीणारे ज्येष्ठ विधिज्ञ आव्हाड महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या विश्वस्थ मंडळाचे अध्यक्षही आहे.
                     वकीलांची ज्येष्ठ पिढी आज व्यवसायातून बाहेर पडत असताना आठवणी , अनुभवकथन , आत्मकथा लिहीत आहे .  गंगाजल  - अॅड खुटाडे , जमनादास आहुजा - पंख नियतीचे, माझ्याचसाठी जन्मलो न मी - सुदाम भागुजी ( दाजी ) सांगळे यांनी आपल्या आत्मकथा लिहून प्रसिध्द केल्या आहेत . नव्या पिढीला या आत्मानुभवातून बोध होतो . वकीलीचा व्यवसाय तरुण वयात वाट पहायला लावणारा तर वय वाढत असताना कामाचा व्याप वाढवणारा . वकीलाला सेवानिवृत्ती नसते . म्हणून नव्वदीतही कोर्टात लक्ष घालणारे वकील सापडतात . त्यातल्या काहींनी आता हे अनुभवसंचित शब्दबध्द करायला सुरुवात केली आहे . मराठी साहित्य समृध्दीला वकीलांचाही हातभार लागतो आहे , हे सुचिन्ह . आता वकीलांचे साहित्य संमेलन व्हावे , असे म्हटल्यास ते फार कल्पनाविलासाचे ठरणार नाही .
                                                                            प्रा डाॅ शंकर बो-हाडे
                                                                             9226573791

         

                                      बहुभाषिक संमेलन घुमान ( पंजाब )

            बहुभाषिक साहित्य संमेलन पंजाब प्रांतातल्या घुमान येथे सुरू झाले आहे . अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाची ही उपलब्धी मानावी लागेल . अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलने उत्सवी होऊ लागली आहेत . हा उत्सव काळानुरूप आणि आयोजक संस्थेच्या ताकदी नुसार अधिकाधिक हायटेक होऊ लागला आहे .पिंप्री चिंचवडचे संमेलन हे त्याचे ताजे उदाहरण . सरहदने आठ्ठयाऐशीवे संमेलन यशस्वी करून  दाखविले . ते घुमानला घेण्यातले औचित्यही मांडले . पंजाब- महाराष्ट्रातला अनुबंध स्पष्ट झाला . संमेलनाध्यक्षांनी तर " पुंडलिक वरदा हरी विठ्ठल " या वचनाचा विस्तार " ज्ञानदेव नामदेव तुकाराम " असा केला . डाॅ सदानंद मोरे यांचे घुमानचे अध्यक्षीय भाषण मराठे आणि शीख यांचा अनुबंध स्पष्ट करणारे होते . भक्ती आणि शौर्य याची मांडणी त्यांनी केली होती , पण उत्सवीपणाच्या झगमगाटात ते भाषण दुर्लक्षित राहीले . तरी या संमेलनाने भाषिक संस्कृतीला नवा आयाम दिला .
              साहित्य संमेलने आणि वाद काही नवे नाही . बहुभाषिक साहित्य संमेलन आतापर्यंत त्यापासून दूर आहे . कारण हे संमेलन उत्सवी नाही . भाषिक आदान प्रदान , भाषासंवर्धन आणि अनुवाद रुपांतर , भाषिकसबंध यावर चर्चा होणार आहे . मागच्या वेळी महाराष्ट्रातून खास दोन रेल्वेने महाराष्ट्रीय मडळी गेली होती . यावेळी लवाजमा घेऊन कुणी जाणार नाही . महाराष्ट्रातील निवडक मडळी या दोन दिवसाच्या संमेलनात सहभागी होत आहेत .भारत देसरडा , संजय नहार यांचे बरोबरच कथाकार राजन खान निमंञक आहेत . तर अरुण नेवासकर स्वागताध्यक्ष आहेत . अरुण नेवासकरांनी घुमानच्या संमेलनासाठी मोठे योगदान दिले होते . हे संमेलन यशस्वी व्हावे यासाठी त्यांचे प्रयत्न आहेत . कार्यक्रम पञिकेत माध्यमातील मंडळी मोठ्या प्रमाणात आहेत .विजय कुवळेकर , राजीव खांडेकर , सुरूश भटेवरा , विजय बाविस्कर , महेश म्हाञे , सुनिल चावके यांचे बरोबरच पियुष नासिककर हा युवा पञकार कवी संमेलनात रामदास फुटाणेंसोबत मराठी कवींचे प्रतिनिधित्व करणार आहे . अरूण जाखडे हे प्रकाशकांचे प्रतिनिधी असले तरी त्यांनी स्वतंञ लेखन संपादनही केले आहे . अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे पूर्वाध्यक्ष वसंत आबाजी डहाके आणि डाॅसदानंद मोरे या संमेलनात सञाध्यक्षाच्या भूमिकेत आहे .श्रीपाल सबनीसांचीही सञाध्यक्ष म्हणूनही संमेलनात दखल घेतली गेली आहे . गोव्याचे कवी विष्णु सुर्या गुंजाळ , शिरीष नाईक हे अन्य मराठी वक्तेही सहभागी होणार आहेत .
            गणेश देवी या संमेलनाचे अध्यक्ष आहेत . त्यांचे भाषेच्या क्षेञातले काम महत्वाचे आहे . घुमानच्या संमेलनातील त्यांची मुलाखत महत्वपूर्ण होती . भाषाविषयक महत्वपूर्ण कामगिरी करणारा भाषातज्ञ या संमेलनात बोलणार असल्याने या छोटेखाणी संमेलनात महत्वपूर्ण चर्चा अपेक्षित आहे . भाषिक आदानप्रदान मोठ्या प्रमाणावर घडत आहे . कोणतीच भाषा प्रदुषणापासून मुक्त नाही . मराठीतले कितीतरी शब्द अन्य भाषेत स्थिरावले आहेत . बाई आणि आई हे शब्द गुरुवाणीत असल्याचे डाॅ सदानंद मोरे यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणातच सप्रमाण सिध्द केले आहे . काही मराठी शब्दांनी तर थेट ऑक्सफर्ड डिक्शनरीत स्थान  मिळविले आहे . आज आपण बोलतो ती मराठी भाषाही आदानाने समृध्द झाली आहे . तंञज्ञानाने नवनवीन शोध लागत असून नव्या उपकरणासाठी परभाषेतून आलेला शब्द योजवा लागतो .तो भाषा स्वीकारतेसुध्दा .अशा भाषिक घुसळणीच्या काळात हे संमेलन होत आहे . साने गुरूजींची अंतरभारतीची कल्पना या संमेलनात दिसेल अशी आशा वाटते .
               पंजाबमध्ये घुमानला होणा-या बहुभाषिक संमेलनात भाषा भगिनींची चर्चा होईलच पण या निमित्ताने तिथे पुढील काळात बहुभाषेच्या अभ्यासासाठी भाषाभवन उभारण्याची कल्पना पुढे आली आहे . भाषाविषयक संशोधनही त्यातून व्हावे अशी अपेक्षा आहे . भाषांतर , अनुवादाच्या क्षेञात साने गुरूजी राष्ट्रीय स्मारकानेही कोकणात काम सुरू केले आहे . ते देशपातळीवर घडण्याची चिन्हे घुमानला दिसत आहे . हे संमेलन प्रत्येक वर्षी घुमानला होणार आहे . संत नामदेवांमुळे घुमान पुण्यमूमी , तिर्थक्षेञ म्हणून परिचित होते . आता ते भाषा संवर्धन , संशोधनाचे केंद्र बनत आहे . महाराष्ट्राच्या साहित्य संस्कृतीतून हा उपक्रम फळावा , फुलावा आणि मराठीचा झेंडा असाच फडकत रहावा , अशी अपेक्षा करू या .
                                                       

                                             डाॅ शंकर बो-हाडे
                                             9226573791
युवा वाईन लेडी - श्रध्दा मोरे जागतिक स्तरावर लाईफटाईम जज
================%=======================

                  1980चे दशक नाशिक जिल्हयासाठी विशेष दशक मानावे लागते . शेतमालाला उत्पादन खर्चावर आधारित भाव मिळाला पाहीजे यासाठी अभूतपूर्व आंदोलन सुरू झाले . या उग्र आंदोलनाचे पडसाद भारतभर उमटले .शरद जोशी यांच्या खांद्याला खांदा लावून माधव खंडेराव मोरे लढत होते . त्यांच्या बरोबर प्रल्हाद पाटील कराड , निफाड सहकारी साखर कारखान्याचे तत्कालीन चेअसमन माधवराव बोरस्ते होते . पैकी माधव खंडेराव मोरे यांनी शेतक-यांसाठी आंदोलनाबरोबरच विविध प्रयोग केले . एकदा ते नारायणगावला  वाइन कंपनीला भेट देण्यासाठी गेले . कंपनीने भेट नाकारताच नाना कडाडले , " तुम्ही काय अॅटमबाॅम्ब तयार करीत आहात का  ? एक दिवस  व्यापारी माझ्या बांधावर वाइनची द्राक्ष खरेदी करायला येईल , तेंव्हा बांधाबांधावर वायनरी उभ्या दिसतील . "  मोरे यांनी प्रथम द्राक्ष निर्यात करणारी कंपनी सुरु केली . त्यासाठी ख्रिस्तोफर या इंग्लंडच्या व्यापा-याकडून रितसर माहिती करुन घेतली . पुढील काळात  त्यांनी पिंपेन इंडिया लि. ही कंपनी स्थापन केली . पिंपेन हा या शेतकरी नेत्याचा ड्रीम प्रोजेक्ट होता . 1988 मध्ये स्थापन झालेल्या या कंपनीला दीर्घायुष्य लाभले नाही . पुढे 1992 मध्ये महाग्रेपची स्थापना माधव खंडेराव मोरे यांनी केली . महाग्रेप हे द्राक्ष उत्पादकांचे व्यासपीठ ठरले . नाना महाग्रेप मधून बाहेर पडले .पिंपेनलाही यश मिळाले नाही . पण नानांचे स्वप्न आणि शब्द नाशिक जिल्हयात शब्दशः खरे ठरले आहेत . विंचूरला वाईन पार्क उभा राहिला आहे .  शॅपेन हे नाव गावावरून पडले . तसेच नाव पिपेन दिले गेले . पिंपळगावची सुरा म्हणून पिंपेन . विचुरची सुरा विंचुरा .विंचूरची विंचूरा , सुला या वाईन जगाच्या मार्केटमध्ये पोहचल्या आहेत . पिंपेन सुला वाईनने  टेक ओव्हर केली  .माधव खंडेराव मोरे यांनी वाईन पार्क मधला प्रोजेक्ट पिंपळगावला आपल्या बांधावर नेला .  त्यांच्या सूनबाई सौ सुनंदा विश्वास मोरे या  सायलो वाईनचे प्राॅडक्शनचे काम सांभाळीत असून त्या नाशिकच्या वाईनलेडी ठरल्या आहेत .तर नानांची  नात श्रध्दा विश्वास मोरे या इंग्लंडमधले शिक्षण संपवून फ्रान्समध्ये पुढील शिक्षणासाठी गेली असून वाईनच्या जागतिक स्पर्धेसाठी जज म्हणून नियुक्त झाली आहे , एक मराठी मुलगी जागतिक स्पर्धेसाठी जज म्हणून निवडली जाणे हेच एक कौतुक आहे. पुण्याच्या गरवारे महाविद्यालयातून बी एस्सी ( बायोटेक )पदवी संपादन करणा-या श्रध्दा हिने वाईन उद्योगात करियर करण्याचा निर्णय घेतला असून आता तिने लाईफटाईम जज म्हणून मान्यता मिळविली आहे . फ्रान्स सरकारच्या Effervescence du Monde  या संस्थेच्य वतीने वाईनचे  जागतिक मानांकन करण्यासाठी परीक्षा घेतली जाते . या परीक्षेसाठी जगभरातून तज्ञ व्यक्ती सहभागी होतात . या स्पर्धेत पिंपळगावच्या भूमिकन्येने बाजी मारली आहे . सौ सुनंदा मोरे या श्रध्दाच्या आई . पिंपळगावला त्या मोरे यांच्या सायलो वाईनचे प्राॅडक्शन सांभाळतात . सुनंदा मोरे या उद्योगाशी विवाहानंतर जोडल्या गेल्या . सुनंदा मोरे यांचा विश्वास मोरे यांचेशी प्रेमविवाह झाला तरी त्या काही बंडखोर नव्हत्या. नात्याचा विचार करता नातं विवाहाला मान्यता देणारच होतं. मामाचीच मुलगी आणि ती ही बालमैञिण असल्याने विवाहाला अडचण नव्हती . विश्वास मोरे यांनी बायकोला आधीच सांगितले होते , " दोन मुलींनंतर आपण थांबायचे ." स्ञी जन्माचे स्वागत करा असे त्यांना कुणी सांगितले नव्हते .सौ. सुनंदा  बी ए झाल्या आहेत . लग्नानंतर त्यांनी या उद्योगात लक्ष घातले . प्रत्यक्ष शेतीतला अनुभव नसताना त्या शेती पाहू लागल्या . माधव खंडेराव मोरे यांनी द्राक्षासाठी महाग्रेप हे व्यासपीठ निर्माण केले . विंचूरला वाईनपार्क उभा करण्यासाठी प्रयत्न केला . एका स्वप्नाचा  पाठपुरावा करण्याचा माधवराव नाना यांचा प्रयत्न होता . त्याच वेळी विश्वास मोरे वसौ सुनंदा हे स्वतःचे प्राॅडक्ट डेव्हलप करीत होते . वाईन उद्योगाचा अभ्यास मोरे कुटूंबाने सुरू केल होता .सायलो हे नाव मुलीच्या नावावरुन ठरले . त्यांची कन्या सायली ही आज सी ए करते आहे . उत्तम चिजकार असणा-या सायलीच्या नावाचा ब्रॅड प्रसिध्द होऊ लागला आहे . बाराहजार लिटरची टाकी तयार झाली . वाईनचे उत्पादन सुरू झाल्यावर त्याचे ब्रॅडीगही करावे लागले . सायलो वाईनचे उत्पादन आज सिक्कीम भूतानपर्यंत गेले आहे . सायलो वाईनचे मदर युनिट पिंपळगाव ( ब ) मध्ये असले तरी त्याचा विस्तार सिक्कीम, भूतानपर्यंत पोहचला आहे . पुढील काळात हाॅगकाॅग शहरापर्यंत विस्तार करण्याचे नियोजन चालू आहे .  1998 साली वाईन पार्क सुरू झाला . विंचूराचे नाव सर्वदूर पोहचत असताना सायलोचे उत्पादन आस्ते पण दमदार वाटचाल करीत आहे . श्रध्दा विश्वास मोरे थेट इंग्लंडमध्ये वाईन उत्पादनाचे धडे घेऊन फ्रान्स मध्ये पोहचली आहे .तिथे माॅटपेले शहरातील गायझनहॅम विद्यापीठाच्या वेटीसी वेनेफेरा महाविद्यालयात शिकत असताना तिने EmaVE  ही मानाची शिष्यवृत्ती मिळवली असून जगातील साठ देशातील शॅपेंन उत्पादकांचा सहभाग असलेल्या स्पर्धेत ती जज म्हणून निवडली गेली आहे . भारतातील पहिली व एकमेव जज असणारी श्रध्दा आता या उद्योगातील नाविन्यपूर्ण घडामोडी आपल्या उत्पादनासाठी कळवित असते . आता ती जगभर या उत्पादनात व उद्योगात चालणा-या घडामोडी टिपत आहे . एक खासा मराठा समाजातील ही कन्या क्रांतीकारक शेतकरी कुटूंबात वाढली . आता ती वाईन व शॅपेन उद्योगाच्या घडामोडींची साक्षीदार  व लाईफ टाईम जज झाली आहे .
                  वाईन उद्योगासमोर आज विविध समस्या व आव्हाने आहेत . वाईन पार्क सुरू झाला तेंव्हा एक्कावन्न परवाने देण्यात आली . आज त्यातल्या काही वायनरी बंद पडल्या आहेत . काहींनी आक्रमक मार्केटींग केले . काही झगडत आहेत .कारण भारतात वाईन उत्पादनाच्या बाबतीत राज्यस्तरावर शासनाची भूमिका वेगवेगळया राज्यात वेगवेगळी आहे .केंद्रस्तरावर धोरण नसल्याने शासनाच्या नियम अटींचा फटका  उत्पादकांना बसतो आहे .              
               शेतकरी संघटनेचे नेते माधव खंडेराव मोरे यांनी शेतक-याच्या बांधावर वाईनरीचे स्वप्न पाहीले आणि ते प्रत्यक्षात आले . सौ. सुनंदा व विश्वास मोरे यांनी त्या स्वप्नाचे प्रात्यक्षिक करून सिक्कीम, दार्जिलींग  पर्यंत त्याचा विस्तार केला तर त्यांची कन्या या क्षेञातील लाईफ टाईम जज म्हणून जगभर पोहचली आहे . तिला उद्या सर्वचजण वाईनलेडी म्हणूनच ओळखतील अशी दमदार वाटचाल श्रध्दा   विश्वास मोरे हिची सुरू आहे . ती बाईपणाच्या बुरख्यातून बाहेर पडून स्वतःची ओळख निर्माण करीत आहे .                
                                                                        प्रा डाॅ शंकर बो-हाडे
                                                                         9226573791

अस्मितादर्शचे जागरण
अस्मितादर्श  हे केवळ वाऽमयीन मासिक नाही तर ती एक समाजशील साहित्याची चळवळ आहे . दलित चळवळीत अस्मिता हे मूल्य आहे . म्हणून अस्मिता या नावाने पहिले तीन अंक प्रसिध्द झाल्यावर 1968 साली अस्मितादर्शचा पहिला दिवाळी अंक प्रसिध्द झाला . डाॅ गंगाधर पानतावणे हे त्याचे संपादक आणि संचालक . डाॅ पानतावणे यांनी आयुष्यभर आंबेडकरी विचार विश्वाचे संगोपण , संवर्धन   हेच आपले जीवन ध्येय मानून वाटचाल केली . त्यांनी केलेले डाॅ आंबेडकरांच्या पञकारीतेचे संशोधन संपादन मराठी साहित्य व पञकारीतेच्या इतिहासाला नवे वळण देणारे ठरले . बाबासाहेबांच्या शब्दशस्ञाचा वेध डाॅ पानतावणे यांनीच घेतला . त्यासाठी अस्मितादर्श या विचारपीठाचा त्यांनी नेमका उपयोग करून घेतला . अस्मितादर्शच्या प्रकाशनाबरोबरच अस्मितादर्श साहित्य संमेलन ही त्यांची देण .
                                   
 1968 च्या पहिल्या अंकात मोरेश्वर वहाणे , दया पवार ,वामन निंबाळकर , अर्जन डांगळे . केशव मेश्राम, फ.मु शिंदे , शिवराम देवलकर , यशवंत मनोहर , निलकांत चव्हाण , भ मा परसवाळे , वसंत दत्ताञेय गुर्जर , तुलसी परब , सतिश काळसेकर , चंद्रकांत खोत , शरद साटम , प्र श्री नेरुरकर यांच्या कविता होत्या .शंकरराव खरातांची आडातलं भूत , ,बाबुराव बागुल यांची पान , रा रं बोराडे यांची पान्हा या कथा होत्या. हे सर्वच लेखक पुढील काळात मराठीतले नामवंत लेखक ठरले . शंकरराव खरात , केशव मेश्राम , फ. मु शिंदे हे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष झाले . बाबुराव बागुलांना जनस्थान पुरस्कारासह विविध मानसन्मान मिळाले . ही एखाद्या वाऽमयीन नियतकालिकाची ऐतिहासिक कामगिरी मानावी लागेल .1974च्या पारंभी जानेवारीत पहिले अस्मितादर्श साहित्य समेलन झाले . औरंगाबादला झालेल्या या संमेलनाचे उद्घाटन प्राचार्य म.भि. चिटणीस यांनी केले होते . पहिले संमेलन अध्यक्षांशिवाय झाले तरी पुढील एकतीस संमेलनांना अध्यक्ष नियुक्त करुन संमेलने पार पडली . दलित , परिवर्तनवादी विचारांच्या अध्यक्षांची निवड हे या संमेलनाचे यश .शामराव कदम , कुमुद पावडे , जनार्दन वाघमारे ,  वसंत मून , दया पवार , नामदेव ढसाळ , भालचंद्र फडके , निर्मलकुमार फडकुले , लक्ष्मण माने , रा.ग.जाधव , मा.प.मंगुडकर ,, ज्योती लांजेवार , भास्कर चंदनशीव ही नावंच विचार व्युह स्पष्ट करणारी आहेत . गं. बा . सरदार , कुसुमाग्रज, डाॅ ऐलिनाॅर झेलियट , ग.प्र.प्रधान , सुरेश द्वादशीवार , मधु मंगेश कर्णिक , ना.धो.महानोर यांची संमेलनातली भूमिका व उपस्थिती लक्षणीय ठरते .
दलित साहित्याचा आणि आंबेडकरी विचाराचा व्यापक पट मांडणारी ही संमेलने महाराष्ट्रातल्या महत्वाच्या शहरात तर झालीच तसेच महाराष्ट्राबाहेर इंदूर सारख्या शहरातही झाली . एकतीसावे संमेलन जळगावात झाले तर या वर्षी ते वाशिमला भरले . नांदेडचे रविचंद्र हडसनकर हे त्याचे अध्यक्ष होते . एक कवी , कथाकाराचा सन्मान या निमित्ताने झाला .
            अस्मितादर्शने सातत्याने विविध विषयावर चर्चा घडवून आणली . समकालीन विषयावर संवाद घडवून आणला . दलित स्ञी आत्मकथने , दलित कथा, दलित रंगभूमी,दलित शाहिरी अशा विषयावर विशेषांक प्रसिध्द करणा-या या नियतकालिकाने शंकरराव खरात , भालचंद्र फडके , बाबुराव बागुल,केशव मेश्राम यांचा सन्मान करणारे विशेषांकही प्रसिध्द केले . एखादे साहित्य चळवळ व प्रवाहाला वाहिलेले नियतकालिक पावणेपाच दशके चालते हा विक्रमच म्हणावा लागेल . आज साहित्य संशोधन करणा-या संशोधक विद्यार्थ्याना अस्मितादर्शने कितीतरी संदर्भ उपलब्ध करून दिले आहेत . ते केवळ वाऽमयीन नियतकालिक नाही तर समकालिन सामाजिक चळवळीचे केंद्र आहे . या केंद्राने कितीतरी लेखक , कवी घडविले आहेत .
            साहित्य संमेलने खर्चिक होत असताना अस्मितादर्श संमेलने तुटपुंज्या आर्थिक समाजबळावर होत असतात . वादविवादापेक्षा संवादावर भर असणारी ही संमेलने नवसांस्कृतिक भूमिका पार पाडीत आहेत . दलित उत्थानाची जबाबदारी पार पाडीत आहे .उपेक्षित जनसमुहाची स्पंदने टिपत आहेत . जागतिकीकरणाने चळवळी शबल होत असताना डाॅ गंगाधर पानतावणे यांनी विचारांचे जागरण चालविले आहे . दलित , परिवर्तनवादी लेखकाची तिसरी - चौथी पिढी सक्रीय ठेवण्याचे काम या नियतकालिकाने केले आहे . डाॅ बाबासाहेब आंबेडकर यांच्या शतकोत्तर रौप्यमहोत्सवाची तयारी चालू आहे .दुसरीकडे रोहित वेमुलाची हत्या , जेएनयुचे प्रकरण चळवळीच्या दृष्टिने आव्हान ठरते आहे . दलितांचे प्रश्न गुंतागुंतीचे होत आहे . या काळात अस्मितादर्श सारखी चळवळीची साधने महत्वाची भूमिका बजावत आहेत . वाशिमला असेच विचारमंथन रविचंद्र हडसनकर यांच्या अध्यक्षतेखाली झाले . साहित्य संस्कृतीच्या दृष्टिने ही फार महत्वाची घटन मला वाटते.
                                                                    डाॅ शंकर बो-हाडे
                                                                     9226573791

Sunday, 14 February 2016

पाटलांची भाऊबंदकी

                                                पाटलांची भाऊबंदकी
                                                 =============
" कादंबरी " हा वाऽमयप्रकार इंग्रजी राजवटीतच जन्माला आला . गोष्ट सांगणे आणिगोष्ट ऐकणे ही मानवाची प्रधृत्ती पुरातण आहे. पुराणे , आख्अयाने , बखरी इ. ग्रंथातून कादंबरीची काही अंगोपांगे जाणवतात हे खरे आहे .1829 मध्ये पसिध्द झालेल्या ' महाराष्ट्र भाषेचा कोष ' या ग्रंथात ' कादंबरी ' या शब्दाचे अर्थ देताना एक कल्पित कथा असा एक अर्थ दिला आहे .
                                                                    भालचंद्र फडके
                                                                     प्रदक्षिणा खंड -एक
                                                                     पृ 202

महाराष्ट्राला आणि मराठी माणसाला साहित्याच्या क्षेञातील वाद संवाद आणि भाऊबंदकी नवीन नाही . साहित्याच्या क्षेञात टोकाचे वाद खेळले जातात आणि भाऊबंदकीतून घरं उजाड होतात . मागिल महिन्यात विश्वास पाटलांच्या कादंब-यांवरुन त्यांच्या भावाने वादाला तोंड फोडले . पण हा वाद काही रंगला नाही . नाक्या नाक्यावर , चौकाचौकात काही मंडळींनी हे प्रकरण चघळले आणि संपले . विश्वास पाटलांचे बंधु हे कादंबरीकार आहेत , हे फार थोड्यानाच माहित होते . या निमित्ताने त्यांचे लेखन उजेडात आले इतकेच .
             विश्शास पाटील हे लोकप्रिय लेखकांचे प्रतिनिधी . लोकप्रिय लेखकांच्या कादंब~या बेतलेल्या असतात हा आक्षेप त्यांच्यावर घेता येईल . झाडाझडती कादंबरी धरणग्रस्तांवर बेतलेली आहे .धरणग्रस्तांवर लिहीणारे विश्वासराव एकटेच नाहीत .चंद्रकांत नलगे यांच्या देवाची साक्ष बरोबरच ना. द. जोशी यांची धरण या शीर्षकाची आणखी एक कादंबरी आहे . संभाजी महाराजांवर छावा आहेच अन्य लेखकांनीही लिहीले आहे .प्रभाकर बागुल या सत्तर कादंब-या लिहीणा-या लेखकाची धर्मवीर राजे संभाजी ही कादंबरी प्रकाशनाच्या तयारीत आहे . तिची पृष्ठ संख्याच आठशे आहे .  हरीभाऊ आपटे यांनी ऐतिहासिक कादंब-या लिहून पूर्व वैभवाचे चिञ रेखाटले आहे . त्यांची ' केवळ स्वराज्यासाठी '  या कादंबरीत त्यांनी संभाजीचा वध आणि राजारामाची कारकिर्द  याचे चिञण केले आहे  .महाराष्ट्राचा आणि मराठयांचा पराक्रमाचा इतिहास प्रत्येक काळात कलावंताला आवाहन करीत असतो . आपल्या बखर वाऽमयात हे ऐतिहासिक ऐवज उपलब्ध आहे . पानिपतची बखर प्रसिध्दच आहे . गोपाळ गोविंद मुजूमदार यांच्या ' मराठेशाहीची अखेर (1931) पाणिपतचे चिञण आलेले आहे . ' नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्यावर चरीञपर बरेच लिहून झाले आहे . महानायकपूर्वी कॅप्टन बेलवलकरांनीही नेताजींवर कादंबरी लिहील्याचे आठवते . साठोत्तरी ग्रामीण साहित्याने कृषी जीवन , उध्दवस्त खेडे , यांञिकीकरण ,  नातेसंबध याचे चिञण कले आहे .आनंद यादवांच्या गोतावळा , घरभिती , नांगरणी यामधून व्यक्त होणारा आशय अन्यही ग्रामीण लेखकांच्या लेखनात , कथा कादंबरीतही व्यक्त होतो .
                मधल्या काळात " देऊळ " हा चिञपट खूपच गाजला . त्यातील देवाच्या जन्माच्या कथेचा प्लाॅट मनोहर विभांडिक यांच्या कथेत येवून गेला होता . विभांडिक निर्मात्याववर दावा ठोकू शकत होते .पण त्यांनी तसे काही केले नाही . मला त्यांनी ती कथा वाचायला पाठविली होती . मुद्दा विश्वास पाटलांच्या कादंब-यांचा येतो . गिरणी कामगारांच्या संपाने गिरणगाव , लालबाग , परळ मधून कामगार उध्दवस्त झाला . यावर दाह ही सुरेश पाटील यांची कादंबरी आहेच . त्यावर मधल्या काळात " लालबाग परळ " असा सिनेमाही येऊन गेला . आता विश्वास पाटलांची " लस्ट फाॅर लालबाग " ही कादंबरी आली आणि तिच्या तीन महिन्यात तीन आवृत्या संपल्या आहेत . विश्वास पाटलांचे प्रकाशक तालेवार आहेत . विश्वासराव जिल्हाधिकारी आहेत . कलावंताला नव्या ग्लोबल काळात स्वतःला आपल्या प्राॅडक्टचे मार्केटींग करावे लागते . चिञपटातील तारे तारका जिल्हा पातळीवर जाऊन मार्केटींग करताना दिसतात . नाना पाटेकर-महेश मांजरेकरांनी तसे ते केले आणि चिञपटही गल्ला भरून गेला . विश्वास पाटलांनी असे अनुभव , साधना मधून केले असले तरी ते आवश्यक समजले पाहीजे . काही वर्षापूर्वी तमाशात वगनाटय होते . " रक्तात रंगली कु-हाड अर्थात सख्खे भाऊ पक्के वैरी " या पध्दतीने हे पाटलांचे विश्वासघात नाटय गाजले . वाऽमय चौ-यावर यापूर्वीही मराठीत बरेच आरोप प्रत्यारोप झाले आहेत . अगदी व्यंकटेश माडगुळकर यांच्या " सत्तांतर " कादंबरीबर असे आरोप झाले होते . या प्रकरणाला भाऊबंदीचे स्वरूप आल्याने ते फार गंभीरपणे कोणी घेतले नाही . त्याऐवजी एखाद्या नामवंत समीक्षकाने विश्वास पाटलांचा समाचार घेतला असता तर हे प्रकरण वादाचे ठरले असते .कादंबरीत कल्पित वास्तव असते . एका विशिष्ट त-हेच्या कल्पित कथेला कादंबरी हे नाव मराठीमध्ये रूढ असावे , हा प्रा कुसुमावती देशपांडे यांचा तर्क खरा मानावा लागतो . या प्रकरणी  उभय बाजूने चर्चा रंगली नाही आणि गंमतही वाटली नाही . भाऊबंदकी माञ जाहीर झाली .
डाॅ शंकर बो-हाडे / 9226573791

Thursday, 21 January 2016

                                        पॅट्रयाटीक गाईड
                                        ==========
अंदमानच्या राॅस आयलंड बेटावर टूरिस्ट कंपनीने एक गाईड बोलावली होती .तिचे नाव अनुराधा राव . प्रथम दर्शनी तिच्या विषयी कुतूहल वाटत नाही . तरी तीने दंडात घातलेल्या  पितळी देवदेवतांच्या मूर्तीवरून हे रसायनवेगळे असल्याचे  लक्षात येते . अनुराधा राव बंगाली स्ञी . तिच्या चार पिढ्या अंदमान बेटावर गेल्या . एकञित कुटुंब होते. ते आज राहीले नाही. अंदमानातील 572 बेटांपैकी आज अनेक बेटं भूकंप , सुनामी मध्ये नष्ट झाली .
अनुराधा राव ही राॅस आयलंड बेटावरची खाजगी गाईड असली तरी कोरडी ,, तांञिक माहिती सांगत नाही . तिच्या बोलण्यात या बेटांचा इतिहास , भूगोल तर असतोच पण त्याहून अधिक करुणा असते . ब्रिटशांनी पॅरिस ऑफ द ईस्ट अशी उपमा देऊन हे बेट विकसित केले . तिथे चर्च  होता . आयुक्तांचे निवासस्थान होते. सैनिकांची रहाण्याची व्यवस्था होती . बेकरी होती. राॅस आयलंड बेट म्हणजे ब्रिटीशांची श्रीमंती होती .अनुराधाच्या चार पिढया या बेटाशी संबधित आहेत . एका पिढीने दुस-या महायुध्दात या बेटांना बसलेली झळ पाहीली . राॅस आयलंड बेटावरच स्मशानभूमी उभारावी लागली , दुस-या महायुध्दात जपानी फौजांनी केलेल्या बाॅम्ब हल्ल्यात राॅस आयलंड बरोबरच सेल्युलर जेलचेही नुकसान केले . जेलच्या काही विंग पडल्या . काळयापाण्यासाठी प्रसिध्द असणा-या जेलची अवस्था केविलवाणी करून टाकली . तीन वर्षे इथे जपानचा ताबा होता . 2004 च्या तत्सुनामीच्या लाटांनीही या बेटांना तडाखा दिला . ही करुण कहानी अनुराधा सांगते तेंव्हा एक गाईड बोलतोय असे वाटत नाही . एखादया साक्षीदाराची करुणेनं भरलेली कैफीयत ऐकत आहोत असे वाटत रहाते .
          अनुराधा राव स्वातंञ्यवीर सावरकरांविषयी म्हणते , ऐसा सच्चा देशभक्त न आज होगा ,न कल होनेवाला है ! पुढे सावरकरांनी भिंतीवर लिहीलेल्या कमला या खंडकाव्याचा दाखलाही देते .सेल्युलर जेलमधल्या छळ छावणीचं वर्णन करता करता तिचा कल्पनाविलासही बहराला येतो . सावरकरांनी भिंतीचा कागद बनवण्यासाठी भाताच्या कन्यांनी भिंत सारवली . सावरकरांच्या कोठीसमोर एक बुलबुल येऊन सावरकरांना रिझवायची .तेंव्हा सारवलेल्या भिंतीवर पाणी शिंपडून सावरकर ते भिंतीचे पोपडे ( भाताचे कण ) तिच्या पुढे टाकत . हा कल्पनाविलास ऐकून नवल वाटत रहाते .
          अनुराधाचे रूप बावळे . तिच्या खाद्यावर एक पिशवी असते . पुरूषी मॅनेला , ढगळ पॅट घातलेल्या अनुराधाच्या खिशात एक खारूताईचे पिल्लू असते . ती आता इथल्या  पक्ष्यांविषयी , प्राण्याविषयी , झाडाफुलाविषयी बोलू लागते . जपानच्या हल्ल्यात आणि तत्सुनामीच्या तडाख्यात भग्न झालेल्या वास्तूविषयी बोलू लागते . एका झाडाखाली उभे राहून राॅस बेटावरील पक्ष्यांची ओळख करून देताना ती त्या पक्ष्यांशीच बोलू लागते . खांदयावरच्या पिशवीतून ती बोलता बोलता ब्रेडचे तुकडे भिरकावते आणि बघता बघता त्या विशिष्ट पक्ष्यांचा किलबिलाट होतो . तिचा आवाज ऐकून मोरांचा थवाही येतो . ती त्यांनाही खायला देते . मग हळूच एक दोन ससेही  येतात . ती सतत बोलत रहाते . मै तो ऐसीही फास्ट बोलती रहती हू म्हणत तीचा आवाज ऐकूण चार दोन हरणंही येतात . ती त्यांनाही खायला घालते .  मग एक विस्तिर्ण झाडाजवळ येऊन त्या पाचशे वर्ष जुन्या झाडाची माहिती देते . राॅस बेटाची तत्सुनामीने कशी अवस्था केली त्याचं वर्णनही करते . बाजूला बुडाजवळ झाडांना आलेला वक्र ती दाखवते . 572 बेटांचा हा समुह पण त्यातली अनेक बेटं भुकंप , तत्सुनामीने गिळंकृत केली आहेत . छ्तीस बेटांवर मानवी वस्ती आहे . पुढील पन्नास वर्षात प्राकृतिक बदल होऊन मानवी वस्तीला त्याची झळ बसेल असेही बोलले जात आहे . अनुराधा राव या बेटांना घट्ट चिकटून आहे . ती नुसती बोलत रहाते . तिला प्राण्यांचा स्वभाव , त्यांची दुखणी कळतात . एका काळया सशाला बिस्कीट टाकल्यावर ती म्हणते , त्याला असं खायला घालू नका . तो आजारी आहे . त्याला औषध चालू आहे . एका हरणाला खायला दिल्यावर ती म्हणते , त्याच्यापासून दूर रहा . तो बदमाश आहे .
          अनुराधा राव प्रायव्हेट गाईडचे काम करुन उपजिविका चालविते .ती म्हणते, मला बाॅयफ्रेंड नाही . हे बेट , त्यावरचे पशुपक्षी , झाडं , फुलं हेच माझे सोयरे आहेत . ती मिळालेल्या पैश्यातून पशुपक्ष्यांसाठी मुक्त हस्ते उधळण करते . रिकाम्या वेळेत तिचा पशुपक्ष्यांशी संवाद चालू असतो . एकदा एक लष्करी अधिकारी राॅस बेटाला भेट देण्यासाठी आला . पर्यटक नसल्याने अनुराधा पशुपक्ष्यांशी संवाद करत बेटावर फिरत होती . त्याने अनुराधाला पाहीले . आपल्या अहवालात " इथे पशुपक्षी प्राण्यांबरोबरच वेडीही पहायला मिळाली " अशी नोंद केली . अनुराधाला हे एका अधिका-याने सांगितले पण तिला त्याविषयी ना खेद वाटला , ना खंत . ती अतिशय संवेदनशील स्ञी आहे . राॅस बेटाची सफर करताना ती  पर्यटकांना उद्देशून म्हणाली , माझं एक ऐकाल ? आपण गावाकडं गेल्यावर गावाजवळ असणारा वृध्दाश्रम काढून फेकून द्या . आपल्याला दुनिया दाखवली ते आईबाप आपले ईश्वर आहेत . तुम्हाला प्रथम आईने जन्म दिला . देव दाखवला . धर्म शिकवला . त्या देवाना वृध्दाश्रमात ठेवणं पाप आहे . माझी तुम्हाला कळकळीची विनंती आहे . आपल्या आजूबाजूचे वृध्दाश्रम काढून फेका .अनुराधाच्या आवाजातील कारुण्याने डोळे भरुण येतात .
              अनुराधाला तिच्या लाघवी स्वभावामुळे , करुणमयी भाषेमुळे फॅनही भरपूर आहेत . कुणी तिच्यानावे गुगलवर पेजही सुरु केले आहे . कुणी आपल्याकडे येण्याचे निमंञणही पाठवतात . कुणी तिला खरोखर विमानाची तिकीटही पाठवतात . ती कशालाही दाद देत नाही . विमानाचे तिकीट रद्द करून ती पैसे परत पाठवून देते . आम्ही तिला भेटलो . तिला ऐकलं आणि प्रेमातच पडलो .ती फक्त कोरडी तांञिक माहीती सांगणारी गाईड नाही . तीला पॅट्राॅटीक गाईड म्हणावे लागते .
नटसम्राट नाटकात एक संवाद आहे , म्हातारपण हे दुसरे बालपण असतं . त्यावेळी गणपतराव बेलवलकरांची मुलगी म्हणते ,या बालपणाला आई आणायची कुठून ? म्हातारपणात बायको ही त्याची काठी असते . पण तिलाही वृध्दापकाळ सुसहाय्य असला पाहीजे . दोन पिढ्यात अंतर निर्माण होते . त्यांच्यात ठकराव निर्माण होतो . ते टाळता येऊ शकते . ज्येष्ठांना ते सहज शक्य आहे . त्यासाठी भूतकाळाला चिकटून बसून चालत नाही .मी पूर्वी कोण होतो हे विसरावे लागते . अहंकाराचा वारा न लगे माझ्या राजसा , असे संतांनी सांगून ठेवले आहे . सेकंड इनिंग सुरू होते तेंव्हा कॅप्टन बदलला आहे , हे लक्षात घेऊन  आपण वाटचाल केली तर जगण्यातही मजा येऊ शकते . माझे एक मिञ आहेत . पस्तीस वर्षे सेवा करून निवृत्त झाले . आयुष्यातला अर्धाकाळ चाकरमानी शिक्षक असलेल्या मिञांनी पुढच्या महीनाभरात घर डोक्यावर घेतले . मी रिटायर झालो असं समजू नका ? स्वयंपाक उशिरा का केला ? अशी व्यर्थ बडबड सर करू लागले .सुनांना सासरा राक्षस वाटायला लागला . मग मी मिञवर्यांचे समुपदेशन केले . म्हातारपण समजाऊन घेतले की आनंदाचे क्षण वाटयाला यायला वेळ लागणार नाही .
          पंढरीनाथ कुलकर्णी नावाचे काका होते . साने गुरूजींचा प्रभाव असणा-या काकांनी व्यक्तीमत्व विकास मंच ही संस्था सुरू केली . शाळा शाळांमध्ये वाचन संसस्कृती वाढविण्याचा प्रयत्न केले . दिवाळीला त्यांनी गरीब मुलांच्या घरात पणत्या पेटवल्या . काकांचा वृध्दापकाळ सुसह्य आणि समृध्द गेला . म्हातारपणात घरात अडथळा होण्यापेक्षा अंधारात पणत्या पेटवणा-या काकांची आजही मला आठवण येते .
          ज्येष्ठांनी आपल्या दुस-या बालपणात नातवंडांना वेळ द्यायला हवा . नातवंडांसाठी खेळा , हसा , नाचा . एकाच जागी बसणं , थांबण हे कंटाळवाणं असतं . या वेळी जोडीदारासह फिरण्यात मजा असते . एका मुलाकडे आहात . दुसरा असेल तर त्याच्याकडेही काही काळ रहा . दोन मुलात त्यामुळे दरी निर्माण होत नाही . आपल्याला मुलगी असेल तर तिलाही वेळ द्या . एका खांद्यावर भार टाकण्यापेक्षा हा भार हलका करता येईल . भटकायची आवड असेल तर जुन्या मिञाची जरूर आठवण करा . थकवा आणि कंटाळा येणार नाही . शक्यच असेल तर पर्यटन करायलाही हरकत नाही . पण एकाच जागी राहून  तुमच्या वाटयाला तेच तेच आयुष्य येईल .
             म्हातारपणात औषधांची सोबत काहींना करावी लागते . खाण्यापिण्याच्या , औषधाच्या वेळा पाळल्यातर छान दिवस जातात . काही मिञ मला काय होतय या समजूतीत गाफील रहातात . हे गाफीलपण अंगावर आणि जीवावर बेतू शकतं . डाॅक्टरांचा सल्ला माना . डाॅ अप्पासाहेब पवार हे नामवंत स्ञीरोग तज्ञ . त्यांना थोडी शंका येताच ते एका तरूण डाॅक्टरला भेटले . सल्ला घेतला .तपासण्या केल्या . नियमित औषधे घेऊन डाॅ अप्पासाहेब पवार वयाच्या ऐंशीनंतरही निरोगी निरामय आयुष्य जगत आहेत . अप्पासाहेबांनी या काळात आपली आत्मकथाही लिहीली .  " अविश्रांत मी " ही त्यांची आतमकथा ज्येष्ठांना प्रेरणा देणारी आहे . मला वाटतं प्रत्येकाचे आयुष्य ही एक कादंबरी असते . त्यात जीवनाचे नाट्यही भरलेले असते . तुमच्या आयुष्याची पानं पुढच्या पिढ्यांसाठी जरूर उघडी करा . "आमचा बाप आन् आम्ही " हे डाॅ नरेंद्र जाधवांचे पुस्तक बापाने वृध्दापकाळात लिहीलेल्या  पाचपंचविस पानातूनच  विकसित झाले आहे . आठवणी जागवत जागवत स्वतःला शोधताना मजा येते . हातात लेखनी घ्या . सारे गुपित सांगून टाका . आपल्या बापाने काय काय सोसले , आपल्या आईला कसे कसे चटके बसले ते सांगायला काय हरकत आहे . चंद्रकांत महामिने यांनीही वयाची ऐंशी
पूर्ण केली आहे , पण महामिने दिसा माजी काही लिहीत रहावे या न्यायाने आजही दिवाळी अंकासाठी लिहीत आहेत . ज्ञानेश सोनारांची व्यंगचिञ आणि चिञकला आजही वयाचा बाऊ न करता सुरू आहे . मग ज्येष्ठतेने गारठण्याचे कारण नाही .
                 विरंगुळयाच्या अनेक गोष्टी आहेत . एखाद्या गरीब मुलाची शाळेची फी भरून बघा . कितीतरी आनंद घेता येईल . कुंभमेळयात काही शिक्षकांनी " रघुपती राघव राजाराम - शिक्षणासाठी द्याहो दान  " म्हणत एक उपक्रम राबविला . त्यात दोन तरुण आघाडीवर होते .  यु .के . अहीरे आणि अशोक पाटील . दोघही मुख्याध्यापक म्हणून निवृत्त झाले . साठी ओलांडलेल्या या तरुणांची ऊर्जा पाहून अचंबा वाटतो . ज्येष्ठांनी स्वतःसाठी जगता जगता इतरांसाठीही जगायला हरकत नाही . सृष्टीतल्या आणि मानवी संबधातल्या अनेक गोष्टी खूप आनंद देणा-या आहेत .
                   ज्येष्ठ नागरिकांनी वयाचं भय का बाळगावं ? मृत्यूचं भय का बाळगावं ? मृत्यू तर शाश्वत आहे . त्याऐवजी सप्रेम द्या निरोप , बहरून जात आहे , असं म्हणतं सगळयांचा निरोप घेण्याची मानसिकता ठेवावी , असं मला वाटतं . तुम्हाला काय वाटतं ?
साहित्य संमेलन की अकारण वादाचे आकांडतांडव
================================


साहित्यिकांचे संमेलन म्हणजे काव्यगायन, परस्पर प्रशंसा नाहीतर अकारण वादाचे आकांडतांडव आणि उथळ विचारांची खैरात असा प्रकार झाला असल्यामुळे , संमेलनातून भरीव कार्यनिष्पत्ती होत नाही याचे आश्चर्य करावयास नको .
जागृतिकार पाळेकर
सहा जानेवारी 1945

धुळे येथे 1945 मध्ये भा वि वरेरकरांच्या अध्यक्षतेखाली भरलेल्या साहित्य संमेलनावरची ही प्रतिक्रीया सत्तर वर्षानंतर भरणा-या अखिल भारतीय साहित्य संमेलनांना आजही लागू पडते . तत्कालीन महनीय व्यक्तिंनी अध्यक्षस्थान भूषविल्याने अध्यक्षीय भाषणांना एक दर्जा तरी होता .बेळगाव येथे भरलेल्या मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षीय भाषणात ग. ञ्यं. माडखोलकर यांनी संयुक्त महाराष्ट्र निर्मितीचे प्रतिपादन अत्यंत तळमळीने केले होते . तरी विदर्भ साहित्य संघाच्या रौप्य महोत्सवी साहित्य संमेलनास या , असा वि. भि. कोलते यांनी आग्रह केल्यावर भाऊसाहेब माडखोलकर म्हणाले होते , " मी मुळीच येणार नाही . तुमचे संमेलन होणार म्हणजे काय होणार ? तोच अश्लिल वाऽमयाचा प्रश्न , कला की जीवन या संबधीची चर्चा , काव्यगायन आणि काही कंटाळी स्वरूपाचे ठराव , हेच की नाही? असल्या कामात खर्च करायला माझ्याजवळ मुळीच वेळ नाही. मी संमेलनाला मुळीच येणार नाही . "  (अजुनि चालतोची वाट )संमेलनाचे विषय साठोत्तरी , नव्वदोत्तरी झाले . बाकीचे सर्व सवंगपणे चालू आहे . या महामराठी उत्सवाचे  आकडे माञ कोटीच्या घरात गेले आहेत .
              मंञी , लोकनेत्यांची संमेलनातील उपस्थिती हा अलिकडचा लाडका विषय . पण राज्यसत्तेचा आर्थिक आधार मागायचा आणि मंञ्यांची टवाळी करायची  हे दिवस कालबाहय झाले आहेत . महाराष्ट्रात पुरस्कार वापसीला कसा प्रतिसाद मिळाला हे आपण पाहिले आहे . उत्सवप्रियता हे मराठी माणसाचे लक्षण लक्षात घेतले तर संमेलने संपन्न होत रहाणार आणि त्याविषयीच्या उथळ चर्चाही होत रहाणार . माध्यमांचा विस्तार झाल्याने ते अटळ आहे .  नगरचे संमेलन गाजले ते निषेधाचा ठराव करणार की नाही , या विषयावरून . नाशिकचे संमेलन लक्षात राहीले बोकड बळी दिला की नाही ? या अप्रस्तुत मुद्यावरून . ठाण्याचे संमेलन चर्चेत आले नथुरामच्या मुद्यावरून . चिपळूनच्या संमेलनात दिंडीवरून चर्चा झाली . सासवडला म्हणे अध्यक्षांनी भाषणाच्या प्रतीच भिरकावल्या . असाहित्यिक मुद्यावरूनच साहित्य संमेलने लक्षात रहातात .पिंपरी चिंचवडचे संमेलनच रद्द करा इथ पर्यत चर्चा आली आहे .
             मराठी साहित्य संमेलनाच्या मंचावर काही महत्वपूर्ण विषयाची चर्चा व्हावी , अशी अपेक्षा असते . अध्यक्षांचे भाषण हे या दृष्टीने दिशादर्शक ठरावे . पण मागील काही संमेलनांच्या अध्यक्षीय भाषणांकडे नजर टाकल्यास सगळीच आबाळ दिसून येते . अध्यक्षीय भाषणात साहित्य व्यवहार व साहित्य विचारावर , समाजविचारावर चर्चा होणे अपेक्षित असते . पण तसे घडत नाही . निवडून येताना झालेल्या दमछाकीचेच प्रतिबिंब भाषणात पडते . सर्वांनाच सांभाळून घेण्याची भूमिका असते . हम भले , तुम भले , सब भले पध्दतीने काही विचार परंपरा , साहित्य प्रवाह , नवा लेखक , नवे समाज वास्तव यावर भाष्य अथवा समीक्षात्मक मांडणी काही होत नाही . काहींनी तसा प्रयत्न केला तर तो समजून घेतला जात नाही . कराडच्या साहित्य संमेलनाचे उदघाटक होते माजी पंतप्रधान नरसिंहराव . त्यांनी अस्खलीत मरठीत भाषण करताना भरताच्या रससिध्दांता पलिकडे आपण फार प्रगती केली नाही असे स्पष्ट करून भारतीय साहित्य परंपरेतील मराठी साहित्याच्याही वाटचालीचा धांडोळा घेतला होता . ते भाषण खूपच गाजले . घुमानला संमेलनाध्यक्षांना फार अवकाश मिळाला नाही . तरी डाॅ सदानंद मोरे यांनी संत साहित्याच्या पृष्ठ भूमीवर पंडीती साहित्याच्या परंपरेवर नेमके प्रश्न चिन्ह उपस्थित केले होते . पण ते भाषण कुणी फार गांभिर्याने घेतले नाही की त्याची समीक्षाही झाली नाही .
               साहित्य संमेलनाचा सोहळा संपन्न होईल . तो होऊ द्या . पण विचार परंपरांची प्रगती त्यात दिसू द्या . अन्यथा अध्यक्षीय भाषणांचे वैभवशाली दिवस इतिहास जमा होवून साहित्य जञा भरली आणि सरली अशीच नोंद पिंपरी चिंचवडच्या साहित्य संमेलनाची नोंद इतिहासात होईल आणि एक विक्षिप्त माणूस वलयांकित झाला असे म्हटले जाईल . तसे होऊ नये , महाराष्ट्राच्या वैभवशाली परंपरेचे दर्शन तिथे घडावे . अन्यथा जागृतिकार पाळेकरांनी म्हटल्याप्रमाणे , अकारण वादाचे आकांडतांडव आणि उथळ विचारांची खैरात यामुळेच हे संमेलनही लक्षात राहील .

Saturday, 16 January 2016

साहित्य संमेलनाची सबनीस संस्कृती


आठव


आठव
====

साहित्य आणि संस्कृतीचा यांचा सेतू एकच . साहित्यातून संसकृतीचेच दर्शन घडते.नाशिकला पुण्यापाठोपाठ सांस्कृतिक राजधानी म्हटले जाते . दादासाहेब फाळके हे चिञ महर्षी तर कवी कुसुमाग्रज हे साहित्य महर्षी . कानेटकरांनी मराठी नाटक समृध्द केले . बाबुराव बागुलांनी दलितांच्या जीवनाला कथेतून अविष्कृत केले . वामनदादा कर्डकांनी डाॅ आंबेडकरांच्या किर्तीचे पोवाडे गायले . पुढच्या पिढीत अनेकांनी ही साहित्यदिंडी आपल्या खांद्यावरून वाहून नेली . आता मराठीत नवी पिढी लिहू लागली आहे .तरी जुन्यांचा आठव होतोच .
           नाशिकचा पोवाडा लिहीणारे बी . डी . जाधव कामगार क्षेञात रमले . परिस्थितीचे ओझे खांद्यावर घेतलेला हा कलावंत साहित्याच्या प्रांतातून दूर गेला . अ. वा. वर्टी हे विनोदी कथाकार . नाशिकचा साहित्य मेळावा त्यांच्यामुळे हसरा , ताजातवाना असायचा .  माधव मनोहर हे समीक्षक . ते मुंबईत रमले . त्यांचा एक पाय नाशिकमध्ये होता .नाटकांची समीक्षा त्यांनी व्रतस्थपणे कली . वसंत नरहर फेणे यानी कथा आणि कादंबरीच्या क्षेञात मौलिक कामगिरी केली . त्यांची सेंट्रल बस स्टेशन ही नाशिकच्या सीबीएस वरच्या घडामोडी टिपणारी कादंबरी . शिवाजी तुपे हे चिञकार . नाशिकचा गंगाघाट , जुनं नाशिक ही त्यांच्या चिञांची समृध्दी . ते लिहीतही होते . लेखकात मिसळतही होते .चंद्रकांत वर्तक हे कथाकार . त्यांनी ललित लेखनही केले . साहित्य चर्चेत त्यांचे विचारमंथन सतत चालू असायचे . वळणावरचे साकव हा त्यांचा महत्वाचा कथासंग्रह . मो ग तपस्वी उत्तरायुष्यात नाशिकमध्येच स्थिरावले . पञकार असणारे तपस्वी नाशिकच्या सांस्कृतिक घडामोडीत सामिल होत .  बा वा दातार हे महत्वाचे व्यक्तीमत्व . विनोदी साहित्यावर संशोधन केलेल्या दातार सरांनी दोन तात्या हा ग्रंथ लिहीला .अभिनव भारताचे साक्षिदार असणा-या बा वा दातारांना तात्याराव सावरकर महत्वाचे वाटत होते आणि तात्यासाहेब शिरवाडकरही महत्वाचे वाटत होते . पसन्न निर्मळ माणूस असणारे दातारसरांची आजही आठवण होते .  पञकार सुरेश अवधूत यांनी भरारी , झेप असे स्तंभलेखन केले . संपादकांची मोठी परंपरा नाशिकमध्ये आहे . माधव गडकरी हे निफाडकर . काही काळ ते निफाडमध्ये रमलेही . त्यांचे लेखन विविधांगी होते . साहित्यातील माणिकमोती हे त्यांचे व्यक्तिचिञांचे पुस्तक . त्यांचे संपादकीय लेखनही ग्रंथबध्द झाले आहे . पञमहर्षी द . शं . पोतनीस , शशिकांत टेंभे या संपादकांनीही आपले योगदान दिले आहे . लेखकांना घडवणारे हे संपादक नाशिकच्या सांस्कृतिक विश्वाचे आधारवड होते . राजीव पाटील हा उमदा दिग्दर्शक . त्याचे जोगवा , सावरखेड एक गाव , सनईचौघडे हे महत्वाचे चिञपट होते . राजीव पाटीलची आई आशाताई पाटील या उत्तम वक्त्या , सूञसंचालक . त्यांचा मधला मुलगा प्रशांत पाटील हा अभिनेता . संस्कृतीची सेवा या कुटुंबाने केली .
             कवी आनंद जोर्वेकर हा उमदा कवी ." थोडे शब्द थोडी गाणी , हेच माझे अन्नपाणी " ही त्याची भूमिका होती . निजरूप हा त्याचा कविता संग्रह . पुढे त्याचा  " काहीलिचे पाणी " हा कवितांचा संग्रह आला . विशुध्द कविता आणि विशुध्द कवी म्हणजे आनंद जोर्वेकर तथा प्रमोद कुलकर्णी . त्याच पिढीतला पण वेगळया कुळातला कवी म्हणजे अरूण काळे .  राॅकगार्डन , सायरनचे शहर या कविता संग्रहानंतर त्याचा नंतर आलेले लोक हा संग्रह प्रसिध्द झाला . जागतिकीकरणानंतरची परीभाषा , लोकभाषा अरूण काळे यांनी मांडली . दलित कवितेला नवे परिमाण या कवीने दिले . उपेक्षित , शोषित , वंचित , दलित समाजाची कुतरओढ या कवीने मांडली . कैलास पगारे हा त्याचा समकालिन कवी . सर्व्हे हा त्याचा पहिला संग्रह साहित्य संस्कृती मंडळाच्या अनुदानाने आला . त्या नंतर या ही मोसमात हा त्याचा संग्रह प्रसिध्द झाला . दीर्घ विरामानंतर त्याचा मल्टीनॅशनल वाॅर हा कविता संग्रह प्रसिध्द झाला . दलित कवितेच्या प्रवाहात त्याने समर्थपणे आपले योगदान दिले . त्याचा माणूसनामा हा संग्रह याच वर्षी प्रसिध्द झाला . अरूण काळे आणि कैलास पगारे यांनी मानवी मूल्यांसाठी कविता लिहीली . अक्षर सुधारण्यासाठी कुणी कविता लिहीत नसते ,ही या कविंची भूमिका होती . जयश्री पाठक ही कवयञी आणि कवीची सखी . कवितेचे विविध कार्यक्रम करणा-या जयश्री पाठक यांनी बालकविताही लिहिल्या . पण कवीला जगण्याला चाल लावता येत नाही हे अरूण काळेने सांगितलेले सूञ जयश्री पाठकांनाही लागू पडले .
             आज हे कवी , चिञकार , पञकार , नाटककार , नट , दिग्दर्शक आपल्यात नाहीत . पण साहित्य संस्कृतीची त्यांनी सेवा कली . काहींना दीर्घायुष्य लाभले . काहींची अचानक एक्झिट झाली . चटका लावणारं मरण काहींना अनुभवाला आले .ही माणसं लाखमोलाची होती म्हणून नव्या वर्षाला सामोरे जाताना त्यांचा आठव महत्वाचा ठरतो .