अस्मितादर्शचे जागरण
अस्मितादर्श हे केवळ वाऽमयीन मासिक नाही तर ती एक समाजशील साहित्याची चळवळ आहे . दलित चळवळीत अस्मिता हे मूल्य आहे . म्हणून अस्मिता या नावाने पहिले तीन अंक प्रसिध्द झाल्यावर 1968 साली अस्मितादर्शचा पहिला दिवाळी अंक प्रसिध्द झाला . डाॅ गंगाधर पानतावणे हे त्याचे संपादक आणि संचालक . डाॅ पानतावणे यांनी आयुष्यभर आंबेडकरी विचार विश्वाचे संगोपण , संवर्धन हेच आपले जीवन ध्येय मानून वाटचाल केली . त्यांनी केलेले डाॅ आंबेडकरांच्या पञकारीतेचे संशोधन संपादन मराठी साहित्य व पञकारीतेच्या इतिहासाला नवे वळण देणारे ठरले . बाबासाहेबांच्या शब्दशस्ञाचा वेध डाॅ पानतावणे यांनीच घेतला . त्यासाठी अस्मितादर्श या विचारपीठाचा त्यांनी नेमका उपयोग करून घेतला . अस्मितादर्शच्या प्रकाशनाबरोबरच अस्मितादर्श साहित्य संमेलन ही त्यांची देण .
1968 च्या पहिल्या अंकात मोरेश्वर वहाणे , दया पवार ,वामन निंबाळकर , अर्जन डांगळे . केशव मेश्राम, फ.मु शिंदे , शिवराम देवलकर , यशवंत मनोहर , निलकांत चव्हाण , भ मा परसवाळे , वसंत दत्ताञेय गुर्जर , तुलसी परब , सतिश काळसेकर , चंद्रकांत खोत , शरद साटम , प्र श्री नेरुरकर यांच्या कविता होत्या .शंकरराव खरातांची आडातलं भूत , ,बाबुराव बागुल यांची पान , रा रं बोराडे यांची पान्हा या कथा होत्या. हे सर्वच लेखक पुढील काळात मराठीतले नामवंत लेखक ठरले . शंकरराव खरात , केशव मेश्राम , फ. मु शिंदे हे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष झाले . बाबुराव बागुलांना जनस्थान पुरस्कारासह विविध मानसन्मान मिळाले . ही एखाद्या वाऽमयीन नियतकालिकाची ऐतिहासिक कामगिरी मानावी लागेल .1974च्या पारंभी जानेवारीत पहिले अस्मितादर्श साहित्य समेलन झाले . औरंगाबादला झालेल्या या संमेलनाचे उद्घाटन प्राचार्य म.भि. चिटणीस यांनी केले होते . पहिले संमेलन अध्यक्षांशिवाय झाले तरी पुढील एकतीस संमेलनांना अध्यक्ष नियुक्त करुन संमेलने पार पडली . दलित , परिवर्तनवादी विचारांच्या अध्यक्षांची निवड हे या संमेलनाचे यश .शामराव कदम , कुमुद पावडे , जनार्दन वाघमारे , वसंत मून , दया पवार , नामदेव ढसाळ , भालचंद्र फडके , निर्मलकुमार फडकुले , लक्ष्मण माने , रा.ग.जाधव , मा.प.मंगुडकर ,, ज्योती लांजेवार , भास्कर चंदनशीव ही नावंच विचार व्युह स्पष्ट करणारी आहेत . गं. बा . सरदार , कुसुमाग्रज, डाॅ ऐलिनाॅर झेलियट , ग.प्र.प्रधान , सुरेश द्वादशीवार , मधु मंगेश कर्णिक , ना.धो.महानोर यांची संमेलनातली भूमिका व उपस्थिती लक्षणीय ठरते .
दलित साहित्याचा आणि आंबेडकरी विचाराचा व्यापक पट मांडणारी ही संमेलने महाराष्ट्रातल्या महत्वाच्या शहरात तर झालीच तसेच महाराष्ट्राबाहेर इंदूर सारख्या शहरातही झाली . एकतीसावे संमेलन जळगावात झाले तर या वर्षी ते वाशिमला भरले . नांदेडचे रविचंद्र हडसनकर हे त्याचे अध्यक्ष होते . एक कवी , कथाकाराचा सन्मान या निमित्ताने झाला .
अस्मितादर्शने सातत्याने विविध विषयावर चर्चा घडवून आणली . समकालीन विषयावर संवाद घडवून आणला . दलित स्ञी आत्मकथने , दलित कथा, दलित रंगभूमी,दलित शाहिरी अशा विषयावर विशेषांक प्रसिध्द करणा-या या नियतकालिकाने शंकरराव खरात , भालचंद्र फडके , बाबुराव बागुल,केशव मेश्राम यांचा सन्मान करणारे विशेषांकही प्रसिध्द केले . एखादे साहित्य चळवळ व प्रवाहाला वाहिलेले नियतकालिक पावणेपाच दशके चालते हा विक्रमच म्हणावा लागेल . आज साहित्य संशोधन करणा-या संशोधक विद्यार्थ्याना अस्मितादर्शने कितीतरी संदर्भ उपलब्ध करून दिले आहेत . ते केवळ वाऽमयीन नियतकालिक नाही तर समकालिन सामाजिक चळवळीचे केंद्र आहे . या केंद्राने कितीतरी लेखक , कवी घडविले आहेत .
साहित्य संमेलने खर्चिक होत असताना अस्मितादर्श संमेलने तुटपुंज्या आर्थिक समाजबळावर होत असतात . वादविवादापेक्षा संवादावर भर असणारी ही संमेलने नवसांस्कृतिक भूमिका पार पाडीत आहेत . दलित उत्थानाची जबाबदारी पार पाडीत आहे .उपेक्षित जनसमुहाची स्पंदने टिपत आहेत . जागतिकीकरणाने चळवळी शबल होत असताना डाॅ गंगाधर पानतावणे यांनी विचारांचे जागरण चालविले आहे . दलित , परिवर्तनवादी लेखकाची तिसरी - चौथी पिढी सक्रीय ठेवण्याचे काम या नियतकालिकाने केले आहे . डाॅ बाबासाहेब आंबेडकर यांच्या शतकोत्तर रौप्यमहोत्सवाची तयारी चालू आहे .दुसरीकडे रोहित वेमुलाची हत्या , जेएनयुचे प्रकरण चळवळीच्या दृष्टिने आव्हान ठरते आहे . दलितांचे प्रश्न गुंतागुंतीचे होत आहे . या काळात अस्मितादर्श सारखी चळवळीची साधने महत्वाची भूमिका बजावत आहेत . वाशिमला असेच विचारमंथन रविचंद्र हडसनकर यांच्या अध्यक्षतेखाली झाले . साहित्य संस्कृतीच्या दृष्टिने ही फार महत्वाची घटन मला वाटते.
डाॅ शंकर बो-हाडे
9226573791
No comments:
Post a Comment