Saturday, 16 January 2016

साहित्य संमेलनाची सबनीस संस्कृती


साहित्य संमेलनाची सबनीस संस्कृती
========================

डाॅ श्रीपाल सबनीस यांची पिंपरी चिंचवडच्या एकोण्णवदाव्या साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी निवड झाली तेंव्हा कोण हे सबनीस ? यांची वाऽमयीन  कामगिरी कोणती ? असे प्रश्न उपस्थित केले गेले . खरे तर हे असहिष्णू प्रश्न उपस्थित करण्याचे कारण नव्हते . ते मराठीतले लेखक , पुस्तक परिचय आणि प्रस्तावना लिहीणारे लेखक- समीक्षक आहेत . त्यांची कारकिर्द अव्वल नसली तरी विपुल आहे . लोक वाचत नाही हा त्यांचा दोष नाही . मराठी साहित्य संमेलनाला मोठी परंपरा आहे .ग्रंथकार सभेचे रूपडे अखिल भारतीय झाले . तिथे अनेक महानुभवांनी अध्यक्षस्थान भूषविले . महामंडळाने घटने द्वारे अध्यक्ष निवडीचा लोकशाही मार्ग स्वीकारल्यामुळे अनेक जण या प्रकियेपासून दूरही गेले . महानुभवांची जागा अनुभवींनी घेतली . मधल्या काळात मध्यममार्गी मंडळी निवडून आली . त्यांचे प्रतिनिधी डाॅ श्रीपाल सबनीस .
सबनीसांची मोर्चेबांधणी मागील तीन वर्षापासूनच चालू होती . त्यासाठी त्यांनी पुण्यनगगरीत सावली शोधली . मग महाराष्ट्र साहित्य परिषदेचे आधार लक्षात घेऊन वाटचाल सुरू केली . फ. मु. शिंदे यांच्या विरूध्द अध्यक्षपदाची निवडणूक लढविण्याची तयारीही केली . पण योग जुळून आला नाही . सासवडनंतर घुमानला नशीब आजमावण्याची त्यांची तयारी होती . त्यासाठी नामदेवाच्या इहवादावर पुस्तकही लिहीले . पण डाॅ. सदानंद मोरेनी लोकाग्रहास्तव मैदानात उतरण्याचे जाहीर केल्यावर आपला मनसुबा बदलून ते मोरेंच्या मागे उभे राहीले . पुढच्या वेळी माझ्यामागे उभे रहा , असा शुध्द  हेत ठेऊनच त्यांची वाटचाल चालू होती . या काळात त्यांनी बृहन्महाराष्ट्रातील विविध साहित्य संस्थांचा अभ्यास करून या संस्थांच्या आधारांशी मैञही जुळवले . कुणाच्या पुस्तकाला प्रस्तावना लिही , कुणाच्या पुस्तकांची परीक्षणे लिही किंवा कुणाच्या पुस्तकाच्या प्रकाशन समारंभात प्रमुख वक्ता म्हणून स्तुतीसुमने उधळ असे विविध उपक्रम करीत त्यांनी व्यक्तीगत पातळीवर थेट संपर्क वाढवला . पिप्री- चिंचवडचे संमेलन घोषित झाल्यावर अपेक्षेप्रमाणे त्यांनी उमेदवारी घोषित केली . निवडणूकीत भावनेपेक्षा  मतदान करून घेणे महत्वाचे असते . अ. भा. साहित्य संमेलनाचे निवडणूकीत तर मतपञिका गोळा करण्याला महत्व असते . ज्याच्या खिशात मतपञिका तो अध्यक्ष ही रित आहे . एकदा साधनेचे संपादक यदूनाथ थत्ते निवडणूकीच्या रिंगणात उभे होते . त्यांनी मतदारांना पञ पाठवून करून मतदान करण्याची विनंती केली . नाटककार , संपादक विद्याधर गोखले यांनी मतपञिका गोळा करणयासाठी यंञणाच उभी केली होती .  घटक संस्थापैकी काहीनी मतपञिका गोळा करून एकगठ्ठा मतदान करण्याचा प्रघात सुरू झाला आहे . त्यामुळे    कुसूमाग्रज , चि वि जोशी , इंदिरा संत , गंगाधर पानतावणे , सुरेश भट , मालतीबाई बेडेकर , प्रभा गणोरकर ,    गिरीजा कीर यांना पराभवाला सामोरे जावे लागले . पैकी कुसुमाग्रजांनी मडगावच्या साहित्य संमेलनात अध्यक्षपद भुषविले तर डाॅ पानतावणे विश्व साहित्य संमेलनाचे अध्यक्ष झाले .
आता पिंप्री चिंचवडचे ढोल वाजू लागले आहेत. सबनीसांनी सर्व डावपेच यशस्वी करून अध्यक्षपद पटकावले आहे .अध्यक्षांनी आपली मते मांडायला हरकत नाही . माञ ती जबाबदारीने मांडली पाहीजे . कोण सबनीस ? हा प्रश्न निकाली निघाला आहे .  अध्यक्षांची विधाने टीकेची लक्ष्य होत आहेत . आपण धुमकेतू की तारा हे  सिध्द करण्याची योग्य वेळ आली आहे . सबनीसांनी ती गमावू नये .

No comments:

Post a Comment