नटसम्राट नाटकात एक संवाद आहे , म्हातारपण हे दुसरे बालपण असतं . त्यावेळी गणपतराव बेलवलकरांची मुलगी म्हणते ,या बालपणाला आई आणायची कुठून ? म्हातारपणात बायको ही त्याची काठी असते . पण तिलाही वृध्दापकाळ सुसहाय्य असला पाहीजे . दोन पिढ्यात अंतर निर्माण होते . त्यांच्यात ठकराव निर्माण होतो . ते टाळता येऊ शकते . ज्येष्ठांना ते सहज शक्य आहे . त्यासाठी भूतकाळाला चिकटून बसून चालत नाही .मी पूर्वी कोण होतो हे विसरावे लागते . अहंकाराचा वारा न लगे माझ्या राजसा , असे संतांनी सांगून ठेवले आहे . सेकंड इनिंग सुरू होते तेंव्हा कॅप्टन बदलला आहे , हे लक्षात घेऊन आपण वाटचाल केली तर जगण्यातही मजा येऊ शकते . माझे एक मिञ आहेत . पस्तीस वर्षे सेवा करून निवृत्त झाले . आयुष्यातला अर्धाकाळ चाकरमानी शिक्षक असलेल्या मिञांनी पुढच्या महीनाभरात घर डोक्यावर घेतले . मी रिटायर झालो असं समजू नका ? स्वयंपाक उशिरा का केला ? अशी व्यर्थ बडबड सर करू लागले .सुनांना सासरा राक्षस वाटायला लागला . मग मी मिञवर्यांचे समुपदेशन केले . म्हातारपण समजाऊन घेतले की आनंदाचे क्षण वाटयाला यायला वेळ लागणार नाही .
पंढरीनाथ कुलकर्णी नावाचे काका होते . साने गुरूजींचा प्रभाव असणा-या काकांनी व्यक्तीमत्व विकास मंच ही संस्था सुरू केली . शाळा शाळांमध्ये वाचन संसस्कृती वाढविण्याचा प्रयत्न केले . दिवाळीला त्यांनी गरीब मुलांच्या घरात पणत्या पेटवल्या . काकांचा वृध्दापकाळ सुसह्य आणि समृध्द गेला . म्हातारपणात घरात अडथळा होण्यापेक्षा अंधारात पणत्या पेटवणा-या काकांची आजही मला आठवण येते .
ज्येष्ठांनी आपल्या दुस-या बालपणात नातवंडांना वेळ द्यायला हवा . नातवंडांसाठी खेळा , हसा , नाचा . एकाच जागी बसणं , थांबण हे कंटाळवाणं असतं . या वेळी जोडीदारासह फिरण्यात मजा असते . एका मुलाकडे आहात . दुसरा असेल तर त्याच्याकडेही काही काळ रहा . दोन मुलात त्यामुळे दरी निर्माण होत नाही . आपल्याला मुलगी असेल तर तिलाही वेळ द्या . एका खांद्यावर भार टाकण्यापेक्षा हा भार हलका करता येईल . भटकायची आवड असेल तर जुन्या मिञाची जरूर आठवण करा . थकवा आणि कंटाळा येणार नाही . शक्यच असेल तर पर्यटन करायलाही हरकत नाही . पण एकाच जागी राहून तुमच्या वाटयाला तेच तेच आयुष्य येईल .
म्हातारपणात औषधांची सोबत काहींना करावी लागते . खाण्यापिण्याच्या , औषधाच्या वेळा पाळल्यातर छान दिवस जातात . काही मिञ मला काय होतय या समजूतीत गाफील रहातात . हे गाफीलपण अंगावर आणि जीवावर बेतू शकतं . डाॅक्टरांचा सल्ला माना . डाॅ अप्पासाहेब पवार हे नामवंत स्ञीरोग तज्ञ . त्यांना थोडी शंका येताच ते एका तरूण डाॅक्टरला भेटले . सल्ला घेतला .तपासण्या केल्या . नियमित औषधे घेऊन डाॅ अप्पासाहेब पवार वयाच्या ऐंशीनंतरही निरोगी निरामय आयुष्य जगत आहेत . अप्पासाहेबांनी या काळात आपली आत्मकथाही लिहीली . " अविश्रांत मी " ही त्यांची आतमकथा ज्येष्ठांना प्रेरणा देणारी आहे . मला वाटतं प्रत्येकाचे आयुष्य ही एक कादंबरी असते . त्यात जीवनाचे नाट्यही भरलेले असते . तुमच्या आयुष्याची पानं पुढच्या पिढ्यांसाठी जरूर उघडी करा . "आमचा बाप आन् आम्ही " हे डाॅ नरेंद्र जाधवांचे पुस्तक बापाने वृध्दापकाळात लिहीलेल्या पाचपंचविस पानातूनच विकसित झाले आहे . आठवणी जागवत जागवत स्वतःला शोधताना मजा येते . हातात लेखनी घ्या . सारे गुपित सांगून टाका . आपल्या बापाने काय काय सोसले , आपल्या आईला कसे कसे चटके बसले ते सांगायला काय हरकत आहे . चंद्रकांत महामिने यांनीही वयाची ऐंशी
पूर्ण केली आहे , पण महामिने दिसा माजी काही लिहीत रहावे या न्यायाने आजही दिवाळी अंकासाठी लिहीत आहेत . ज्ञानेश सोनारांची व्यंगचिञ आणि चिञकला आजही वयाचा बाऊ न करता सुरू आहे . मग ज्येष्ठतेने गारठण्याचे कारण नाही .
विरंगुळयाच्या अनेक गोष्टी आहेत . एखाद्या गरीब मुलाची शाळेची फी भरून बघा . कितीतरी आनंद घेता येईल . कुंभमेळयात काही शिक्षकांनी " रघुपती राघव राजाराम - शिक्षणासाठी द्याहो दान " म्हणत एक उपक्रम राबविला . त्यात दोन तरुण आघाडीवर होते . यु .के . अहीरे आणि अशोक पाटील . दोघही मुख्याध्यापक म्हणून निवृत्त झाले . साठी ओलांडलेल्या या तरुणांची ऊर्जा पाहून अचंबा वाटतो . ज्येष्ठांनी स्वतःसाठी जगता जगता इतरांसाठीही जगायला हरकत नाही . सृष्टीतल्या आणि मानवी संबधातल्या अनेक गोष्टी खूप आनंद देणा-या आहेत .
ज्येष्ठ नागरिकांनी वयाचं भय का बाळगावं ? मृत्यूचं भय का बाळगावं ? मृत्यू तर शाश्वत आहे . त्याऐवजी सप्रेम द्या निरोप , बहरून जात आहे , असं म्हणतं सगळयांचा निरोप घेण्याची मानसिकता ठेवावी , असं मला वाटतं . तुम्हाला काय वाटतं ?
No comments:
Post a Comment