पॅट्रयाटीक गाईड
==========
अंदमानच्या राॅस आयलंड बेटावर टूरिस्ट कंपनीने एक गाईड बोलावली होती .तिचे नाव अनुराधा राव . प्रथम दर्शनी तिच्या विषयी कुतूहल वाटत नाही . तरी तीने दंडात घातलेल्या पितळी देवदेवतांच्या मूर्तीवरून हे रसायनवेगळे असल्याचे लक्षात येते . अनुराधा राव बंगाली स्ञी . तिच्या चार पिढ्या अंदमान बेटावर गेल्या . एकञित कुटुंब होते. ते आज राहीले नाही. अंदमानातील 572 बेटांपैकी आज अनेक बेटं भूकंप , सुनामी मध्ये नष्ट झाली .
अनुराधा राव ही राॅस आयलंड बेटावरची खाजगी गाईड असली तरी कोरडी ,, तांञिक माहिती सांगत नाही . तिच्या बोलण्यात या बेटांचा इतिहास , भूगोल तर असतोच पण त्याहून अधिक करुणा असते . ब्रिटशांनी पॅरिस ऑफ द ईस्ट अशी उपमा देऊन हे बेट विकसित केले . तिथे चर्च होता . आयुक्तांचे निवासस्थान होते. सैनिकांची रहाण्याची व्यवस्था होती . बेकरी होती. राॅस आयलंड बेट म्हणजे ब्रिटीशांची श्रीमंती होती .अनुराधाच्या चार पिढया या बेटाशी संबधित आहेत . एका पिढीने दुस-या महायुध्दात या बेटांना बसलेली झळ पाहीली . राॅस आयलंड बेटावरच स्मशानभूमी उभारावी लागली , दुस-या महायुध्दात जपानी फौजांनी केलेल्या बाॅम्ब हल्ल्यात राॅस आयलंड बरोबरच सेल्युलर जेलचेही नुकसान केले . जेलच्या काही विंग पडल्या . काळयापाण्यासाठी प्रसिध्द असणा-या जेलची अवस्था केविलवाणी करून टाकली . तीन वर्षे इथे जपानचा ताबा होता . 2004 च्या तत्सुनामीच्या लाटांनीही या बेटांना तडाखा दिला . ही करुण कहानी अनुराधा सांगते तेंव्हा एक गाईड बोलतोय असे वाटत नाही . एखादया साक्षीदाराची करुणेनं भरलेली कैफीयत ऐकत आहोत असे वाटत रहाते .
अनुराधा राव स्वातंञ्यवीर सावरकरांविषयी म्हणते , ऐसा सच्चा देशभक्त न आज होगा ,न कल होनेवाला है ! पुढे सावरकरांनी भिंतीवर लिहीलेल्या कमला या खंडकाव्याचा दाखलाही देते .सेल्युलर जेलमधल्या छळ छावणीचं वर्णन करता करता तिचा कल्पनाविलासही बहराला येतो . सावरकरांनी भिंतीचा कागद बनवण्यासाठी भाताच्या कन्यांनी भिंत सारवली . सावरकरांच्या कोठीसमोर एक बुलबुल येऊन सावरकरांना रिझवायची .तेंव्हा सारवलेल्या भिंतीवर पाणी शिंपडून सावरकर ते भिंतीचे पोपडे ( भाताचे कण ) तिच्या पुढे टाकत . हा कल्पनाविलास ऐकून नवल वाटत रहाते .
अनुराधाचे रूप बावळे . तिच्या खाद्यावर एक पिशवी असते . पुरूषी मॅनेला , ढगळ पॅट घातलेल्या अनुराधाच्या खिशात एक खारूताईचे पिल्लू असते . ती आता इथल्या पक्ष्यांविषयी , प्राण्याविषयी , झाडाफुलाविषयी बोलू लागते . जपानच्या हल्ल्यात आणि तत्सुनामीच्या तडाख्यात भग्न झालेल्या वास्तूविषयी बोलू लागते . एका झाडाखाली उभे राहून राॅस बेटावरील पक्ष्यांची ओळख करून देताना ती त्या पक्ष्यांशीच बोलू लागते . खांदयावरच्या पिशवीतून ती बोलता बोलता ब्रेडचे तुकडे भिरकावते आणि बघता बघता त्या विशिष्ट पक्ष्यांचा किलबिलाट होतो . तिचा आवाज ऐकून मोरांचा थवाही येतो . ती त्यांनाही खायला देते . मग हळूच एक दोन ससेही येतात . ती सतत बोलत रहाते . मै तो ऐसीही फास्ट बोलती रहती हू म्हणत तीचा आवाज ऐकूण चार दोन हरणंही येतात . ती त्यांनाही खायला घालते . मग एक विस्तिर्ण झाडाजवळ येऊन त्या पाचशे वर्ष जुन्या झाडाची माहिती देते . राॅस बेटाची तत्सुनामीने कशी अवस्था केली त्याचं वर्णनही करते . बाजूला बुडाजवळ झाडांना आलेला वक्र ती दाखवते . 572 बेटांचा हा समुह पण त्यातली अनेक बेटं भुकंप , तत्सुनामीने गिळंकृत केली आहेत . छ्तीस बेटांवर मानवी वस्ती आहे . पुढील पन्नास वर्षात प्राकृतिक बदल होऊन मानवी वस्तीला त्याची झळ बसेल असेही बोलले जात आहे . अनुराधा राव या बेटांना घट्ट चिकटून आहे . ती नुसती बोलत रहाते . तिला प्राण्यांचा स्वभाव , त्यांची दुखणी कळतात . एका काळया सशाला बिस्कीट टाकल्यावर ती म्हणते , त्याला असं खायला घालू नका . तो आजारी आहे . त्याला औषध चालू आहे . एका हरणाला खायला दिल्यावर ती म्हणते , त्याच्यापासून दूर रहा . तो बदमाश आहे .
अनुराधा राव प्रायव्हेट गाईडचे काम करुन उपजिविका चालविते .ती म्हणते, मला बाॅयफ्रेंड नाही . हे बेट , त्यावरचे पशुपक्षी , झाडं , फुलं हेच माझे सोयरे आहेत . ती मिळालेल्या पैश्यातून पशुपक्ष्यांसाठी मुक्त हस्ते उधळण करते . रिकाम्या वेळेत तिचा पशुपक्ष्यांशी संवाद चालू असतो . एकदा एक लष्करी अधिकारी राॅस बेटाला भेट देण्यासाठी आला . पर्यटक नसल्याने अनुराधा पशुपक्ष्यांशी संवाद करत बेटावर फिरत होती . त्याने अनुराधाला पाहीले . आपल्या अहवालात " इथे पशुपक्षी प्राण्यांबरोबरच वेडीही पहायला मिळाली " अशी नोंद केली . अनुराधाला हे एका अधिका-याने सांगितले पण तिला त्याविषयी ना खेद वाटला , ना खंत . ती अतिशय संवेदनशील स्ञी आहे . राॅस बेटाची सफर करताना ती पर्यटकांना उद्देशून म्हणाली , माझं एक ऐकाल ? आपण गावाकडं गेल्यावर गावाजवळ असणारा वृध्दाश्रम काढून फेकून द्या . आपल्याला दुनिया दाखवली ते आईबाप आपले ईश्वर आहेत . तुम्हाला प्रथम आईने जन्म दिला . देव दाखवला . धर्म शिकवला . त्या देवाना वृध्दाश्रमात ठेवणं पाप आहे . माझी तुम्हाला कळकळीची विनंती आहे . आपल्या आजूबाजूचे वृध्दाश्रम काढून फेका .अनुराधाच्या आवाजातील कारुण्याने डोळे भरुण येतात .
अनुराधाला तिच्या लाघवी स्वभावामुळे , करुणमयी भाषेमुळे फॅनही भरपूर आहेत . कुणी तिच्यानावे गुगलवर पेजही सुरु केले आहे . कुणी आपल्याकडे येण्याचे निमंञणही पाठवतात . कुणी तिला खरोखर विमानाची तिकीटही पाठवतात . ती कशालाही दाद देत नाही . विमानाचे तिकीट रद्द करून ती पैसे परत पाठवून देते . आम्ही तिला भेटलो . तिला ऐकलं आणि प्रेमातच पडलो .ती फक्त कोरडी तांञिक माहीती सांगणारी गाईड नाही . तीला पॅट्राॅटीक गाईड म्हणावे लागते .