Sunday, 1 July 2018

ढगोमेघो

 नागवंशीयांचे गुरु ढेगो मेघो

         कादंबरीकार राकेश वानखेडे यांची “ मसनद “ कादंबरी प्रकाशनपूर्व समीक्षेसाठी आली . तत्पूर्वी त्यांची “ पुरोगामी “ ही कादंबरी चर्चेत होती . मार्क्सवादी आणि आंबेडकरवादी चळवळीचे ताणेबाणे टिपणा-या या कादंबरीवर बरीच उलटसुलट चर्चा झाली . आता तर मार्क्स , गांधी , आंबेडकर विचारधारांवर एकञित चर्चा सुरु झाली आहे . वानखेडे यांनी आधीच आंबेडकरी व मार्क्सवादी विचारधारांचा गोफ विणला असल्याने लेखकाला पुढचे बरेच आधी दिसत असल्याचे स्पष्ट होते . मसनद या नव्या कादंबरीत नागवंशीय महार समाजाच्या संस्कृती व इतिहासावर लेखकाने प्रकाश टाकला आहे .  कादंबरीत वास्तवावर कलेचे कातडे चढविलेले असते . कादंबरीला गारुडयाची थैली असेही म्हणतात . मसनदची नायिका नभाचे कुटुंब विदेशात स्थिरस्थावर आहे . नभासमोर करियरचे अनेक आधुनिक पर्याय वडील ठेवतात . पण नभा इतिहास हा अभ्यास विषय निवडते आणि सीमा कोरेगावचे शौर्य हा विषय तिच्या मनात डोकावतो . ती गुगलअंकलची मदत घेते पण तिथे तिच्या वाटयाला निराशात येते . सहकारी मंडळींकडूनही उपेक्षेशिवाय काही मिळत नाही . नभा या विषयावर संशोधनासाठी वेळ मागावून घेते आणि थेट भारतात पोहचते . पुण्यात भांडारकर संस्थेतही तिच्या हाताला काही लागत नाही . ती थेट भिमा कोरेगावला पोहचते . तिथे असतो एक शौर्य स्तंभ . त्याविषयी तिच्याशी कोणी फारसं बोलत नाही . नभाजवळ संशोधकाला लागणारा संयम , चिकाटी असते . ती आपला प्रयत्न सोडत नाही . पुन्हा ती भीमा कोरेगावला पोहचते . चारदोन म्हाता-यांशी बोलताना त्यातला एक म्हातारा तिला थेट घरीच घेऊन जातो . तिथून पुढे नागवंशीय महार समाजाचा इतिहास व संस्कृतीचा परिचय सात ढेगो मेघो यांचेकडून होतो . महार समाज पराक्रमी , लढवय्या होता . तो इथला भूमीपूञ ( मूळ निवासी ) होता हे लेखकाने विविध घटना प्रसंगातून सिध्द केले आहे .

        ढेगो मेघो हे महार समाजाचे गुरु मानले जातात . डाॅ रा.चिं. ढेरे यांनी लज्जागौरी या आपल्या ग्रंथात ढेगोजी मेघोजी हे नाव महार समाजाच्या गुरु घराण्याचे असल्याचे म्हटले आहे . तेराव्या शतकापासूनच ढेगो मेघो हे महार समाजाचे सर्व विधी करीत असत .  लीळा चरीञातही नागवंशी महार समाजाचे आद्य गुरु सोमाजीबाबा यांची आणि चक्रधरांची भेट झाल्याची लिळा सापडते . ( लीळा चरीञ : उत्तरार्ध लीळा क्र २३८ ) चक्रधर आणि सोमाजीबाबा हे समकालीन असल्याचे दिसून येते . ढेगो मेघो हे सोमाजी बाबाचे भक्त . त्यांनी नागपूर पासून तर    कोल्हापूर पर्यंत प्रवास करुन महार समाजाचे विविध धार्मिक विधी पार पाडल्याचे दिसते . पेशवाईतही ढेगो मेघोंचे अस्तित्व दिसून येते . पेशवाईत महारांनी त्यांची लग्ने लावण्याबाबत भटांना विनंती केली तेंव्हा भटांनी महारांची लग्ने लावण्यास नकार दिला . महारांची सर्व कामे त्यांचे गुरु ढेगो मेघो हेच करतात असा निर्वाळा दिल्याची नोंद पेशवे दप्तरात सापडते . ढेगो मेघो हे महारांचे सर्व प्रकारचे पौरोहित्य करीत . त्यासाठी त्यांना दोन रुपये मिळत . कोल्हापूरला असताना  ही रक्कम महालक्ष्मी मंदिरात मोठया हौदात ठेवलेली होती . ती इंग्रजांनी लुटून नेली याचे ऐतिहासिक उल्लेख सापडतात .

     ढेगो-मेघो हे दोघे बंधू धोडी आई आणि कोडाजी बाबा यांचे पोटी जन्माला आले .  ते सोमाजी बाबांचे लढवय्ये शिष्य होते . स्वतः सोमाजी बाबा सन्यस्त असूनही वीर पुरुष होते .  ते जटवाडा जि औरंगाबाद येथील लढाईत बोधल्यांविरुध्द लढले . ढेगो मेघों यांच्या मदतीसाठी सोमाजीबाबा निवडक शिष्यांसह चढाई करुन गेले . या लढाईत ढेगो मेघो शहीद झाले .  औरंगाबादच्या सुभेदाराने ढेगो मेघोंच्या समाधीसाठी चाळीस एकर जमीन दिली . जटवाडा येथे ढेगो मेघोंची समाधी आहे . ढेगो मेघोंच्या नंतर गुरु परंपरा चालविणाराला ढेगो मेघोच म्हटले जाते . सात पिढ्यांची कल्पना मसनद या कादंबरीत कल्पिलेली आहे . महार हे शूद्र नव्हते तर लढवय्ये , पराक्रमी  होते हे महारांचे गुरुंवरुन लक्षात घेता येते .

    डाॅ तुषार मोरे यांनी ढेगो मेघो यांचा धरणीमाता पाणीपिता संप्रदाय असल्याचे संशोधनातून सिध्द केले आहे . ढग आणि मेघ या पदातून पाण्याशी असणारा संबध स्पष्ट होतो . ढग म्हणजे ढग पांढरा व त्याचे रुपांतर मेघ ( काळा ढग )  पाणी देणारा म्हणून त्याला मेघो म्हटले गेले व हे मेघपूजन अनादी काळापासून आजतागायत महार समाजात सुरु असल्याचे स्पष्टीकरण डाॅ तुषार मोरे यांनी दिले आहे .तसेच मर म्हणजे माती . महारांची कुलदेवता मरीआई मानले जाते . प्रत्येक गावात मरीआईचे मंदिर असायचे . गावावर संकट आल्यास मरीआईचा गाडा गावाबाहेर काढत .  पूर्वी पटकी सारखे रोग आल्यास त्याची झळ आख्ख्या गावाला बसत असे . अशावेळी महारांची कुलदेवता असणा-या मरीआईला सगळे गाव साकडे घालीत . तिची खणानारळाने ओटी भरीत . मरीआईची याञा सारे गाव एकञ येवून करे . ढेगो मेघो हे पाण्याशी संबधित आहे तर मरीआई मातीशी संबधित आहे . नागवंशीय महारांची लोकदैवते व लोकसंस्कृती अशी भूमी व पाण्याशी संबधित असल्याचे डाॅ तुषार मोरे यांचे पुस्तक वाचताना लक्षात येते . मानवी संस्कृतीत निसर्ग देवता , निसर्गपूजा यांना महत्व आहे . वैदिकांनी पंचमहाभूते मानली तर अवैदिक , द्रविडी परंपरेत माती ,जल यांना महत्व आले . त्यातून धरणीमाता , पाणीपिता संप्रदायच निर्माण झाला . ढेगो मेघो यांच्या आरत्या मौखिक परंपरेत प्रसिध्द आहेत . महार पुराण नावाची पोथी महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांना हस्तलिखित स्वरुपात मिळाली होती . तिच्यातही म्हार महात्म्य गाईलेले आहे . पोथी वाड़़मयाची रचना अध्यायानुसार असते . रचना काळ आणि फलश्रुतीही सांगितलेली असते . महार महात्म्याचा कर्तो म्हणतो ,

आद्यन्त तुमच्या ववस्याचे म्हैमा | सेस न वर्णावी झाली सीमा |

वेदा न कळे आगमा | मोमववसे अप्रंपार ||२||

हे म्हार महात्म्य कथा आगळी | जो का धरील हृदयकमळी |

तयाचे द्वीतभावाची होळी | करील रुषी मार्कंडी ||२||

अनंत योगापासून | कितीक राजांचे ढळले जन |

परी हा म्हार जुनाट पुरातन | न ढळेची कल्पान्ती ||६||

देव झाले उदंड | परी हा म्हार अक्षय्त कालदंड |

यांच्या हाती नवखंड | केले मुळीच ऋत्यांनी ||७||

महर्षींना मिळालेली ही पोथी हस्तलिखित स्वरुपातील आहे . तिच्यात सोमाजीबाबांचा उल्लेखही सापडतो . खरे तर अशा पोथ्या शोधून त्याचे संशोधन केले पाहीजे . भारतीय परंपरेतील महार समाजाचे स्थान महात्म्य आणि लोकसंस्कृतीवर त्यामुळे प्रकाश पडू शकतो . ढेगो मेघोंचा एक संप्रदाय मानून डाॅ मोरे हा अभ्यास करतात . सोमाजीबाबा नंतर आलेले ढेगो मेघो या गुरुंनी आपली परंपरा निर्माण केलेली दिसते . राकेश वानखेडे ढेगो मेघोंचे तोंडून महारांचा इतिहास कथन करताना महार हे लढवय्ये होते आणि भिमा कोरेगावच्या लढाईत महार पलटणीने पराक्रम गाजविल्याचे कथन करतात .

       १९५६ ला डाॅ बाबासाहेबांनी बुध्द धम्माचा स्वीकार करुन नवपरिवर्तन घडविले . तत्पूर्वीचा महार समाज समजावून घ्यायचा असेल , नागवंशीय महार समाजाची लोकसंस्कृती समजावून घ्यायची असेल तर डाॅ तुषार मोरे यांचे धरणीमाता पाणीपिता संप्रदाय ( ढगो मेघो ) हे पुस्तक उपयोगी ठरते . कवी अॅड अशोक बनसोडे यांनी ही लोकपरंपरा आदिम असल्याचे मान्य केले .सतनामाचा जयघोष करणारी ही परंपरा विदर्भ , मराठवाडा , कोल्हापूर पर्यंत होती . ढेगो मघोच्या आरत्या गायल्या जात होत्या . आखाजीला याञाही भरत होत्या . या संदर्भात मसनद ही कादंबरीही महत्वपूर्ण ठरु शकते . कादंबरीकार काही मिथकांचा वापर करुन आपले कथन करीत असतो . वानखेडे ढेगो मेघोला पराक्रमी पूर्वज म्हणून पेश करीत आहेत आणि ते सार्थ वाटते .

डाॅ शंकर बो-हाडे

९२२६५७३७९१

लोकसंस्कृतीतले लोकभ्रम

   लोकसंस्कृतीतले लोकभ्रम

     लहान बाळाला टीक का लावतात ? कुणाची दृष्ट लागू नये म्हणून . खुदूखुदू हसणारे बाळ किरकिर करायला लागले की आयाबाया म्हणतात , “ दृष्ट काढ “ . मग एखादी आज्जी बाळावरुन मिठ मोह-या उतरवून टाकते . एखादी आज्जी बाळावरुन तुटलेली चामडयाची चप्पल उतरवून जोरात आपटते .एखादी आज्जी बाळावरुन हंडा उतरवून पाणी असलेल्या परातीत उलटा ठेवते . हंड्यात विस्तव असल्याने पाणी चर्रर्र करते . बाळाची दृष्ट उतरते . काही बायका बाळाला दृष्ट झाल्यावर करंडयातील कुंकू उतरुन त्याची तीन , पाच किंवा सात बोटे भिंतीवर ओढतात . काही स्ञिया केरसुणी ( लोकभाषेत शिराई , लक्ष्मी असेही म्हणतात ) बाळावरुन तीन वेळा उतरवतात . मातीचे बोळके लाल होई पर्यंत तापवून  तीन वेळा बाळावरुन उतरवतात आणि पाण्याने भरलेल्या परातीत पालथे घालतात . त्यातून बाळाची दृष्ट उतरते असा लोकभ्रम आहे . दृष्ट काही बाळालाच होते असे नाही . इमारतीला दृष्ट लागू नये म्हणून दरवाज्याला काळया बाहुल्या , त्याला लिंबू , बिबवे टोचून बांधतात . काही लोक घराला घोडयाची नाल ठोकतात . दूर प्रवासाला निघालेला चालकही आता आपल्या चारचाकी वाहनात काळया बाहुल्या अडकवतात . गाडीचा प्रवास अपघाताविना व्हावा याची ही काळजी .आपल्याकडे असे अनेक लोकभ्रम जन्मापासून मृत्यूपर्यंत जपले जातात . राञी अपराञी कुञे विव्हळते , भुंकण्यापेक्षा त्याचा सूर रडल्यासारखा असला तर तो एखाद्याच्या मृत्यूचे सूचन समजला जातो . दोनतीन वर्षापूर्वी माझे वडील गेले . शेजारच्या ताई म्हणाल्या , दोन दिवसापासून राञी , मध्यराञी तुमच्या घराजवळ कुञे विव्हळत होते . तेंव्हाच मला बाबा जातील याची चाहुल लागली होती . मी विज्ञाननिष्ठ असल्याने दुर्लक्ष केले पण कधीतरी राञी अपराञी कुञे विव्हळू लागते . बायको एवढ्याराञीही कुञ्याला हाडहाड करते . आपला लोकभ्रम कायम रहातो . कधी कधी वृध्दापकाळाने एखादा वृध्द अखेरचा श्वास घेतो . कुणीतरी म्हणते , राञी कुञे खूप वेळ विव्हळत होते .

     संत ज्ञानेश्वरांची एक विराणी आहे ,

पैल तो गे काऊ कोकताहे

शकुन गे माये सांगताहे

लहानपणी कावळा ओरडला की आज पाहुणे नक्की येतील हा शकून मानला जायचा . तेंव्हा प्रवासाला आपली लालपरी ( एस टी ) होती . ग्रामीण भागात दिवसभरात एखादी एसटी येई . मुक्कामी गाडीतून चारदोन पाहुणेही येत . कावळयाचे ओरडणे हा वयात आलेल्या मुलींसाठी खास संदेश मानला जायचा . कावळा शिवला असाही एक शब्दप्रयोग होता . घरातील स्ञिया कावळा शिवला म्हणून चार दिवस कशालाही स्पर्श करत नसत . बालपणात हे संकेत काही कळत नसत . कुणी सांगतही नसत . मला आठवते , शाळेतून घरी येताना माझ्या डोक्यावर कावळयाने चोच मारली . मी घरी आलो . सरळ कोप-यात बसलो . आई म्हणाली , का रे कोप-यात बसला ? मी , म्हणालो , कावळा शिवला . मग पाठीत जोराचा रपाटा बसला आणि शिवलेल्या कावळयाचा मला राग आला .

    बालमनावर लोकभ्रमाचे गारुड असते . तीन तिघाडा काम बिघाडा हा लोकसंकेत मानला जातो . तीन व्यक्तींनी एखाद्या चांगल्या कामाला जावू नये . तीन माणसे एखादे काम करायला गेली की ते काम होणार नाही , अडेल , बिघडेल हे मनावर ठसलेले . यावर तोडगाही होताच . तीन जण एकञ चालले तर चौथा व्यक्ती म्हणून एखादा दगड ( खरे तर खडाच ) खिशात घेऊन जायचा . दगड माणसाचे प्रतिनिधित्व करायचा . आजकाल माणसे दगडांचे प्रतिनिधित्व करतात , त्याचे कारण आपण त्या चौथ्याचे प्रतिनिधी असल्याचे मान्य असावे . आपल्याकडे मांजर आडवे जाणे हा अशुभ संकेत आहे . आम्ही तर मांजर आडवे गेल्यावर दुस-या रस्त्याने जात असू किंवा थांबून घेत असू  किंवा मागून येणारा पुढे गेल्यावर जात असू . मांजर मारणे हे पाप समजले जाते . मांजर मारली तर त्या पातकाचे क्षालन करायला काशीला जावे लागत असे . मांजराची शिकार करणारी आणि मांजराचे मटणाचा आहारात समावेश करणारी जमात आजही भटक्या विमुक्तांमद्ये आहे . टीटवीचे ओरडणे अपशकून मानले जाते . घुबडाचे तोंड पाहू नये हा आपला लोकभ्रम . एकदा राञी एक घुबड एका इमारतीला अडकले . चांदीचा वर्ख असणारे ते घुबड , त्याचा स्पर्श आम्ही अनुभवला . पक्षीमिञाला फोन करुन बोलवले आणि त्याची व्यवस्था केली . मी घुबडाचे तोंड पाहिले म्हटल्यावर मिञाची प्रतिक्रीया होती , ‘ यडा हे ‘ एकदा एका घुबडाचा सुंदर फोटो एका वृत्तपञ छायाचिञकाराला मिळाला , ते सुंदर घुबड चंदेरी वर्ख असणारेच होते . खूप लोकांना ते आवडले . लोकांनी फोटो घेतले . बातमीदाराने फोटो कॅप्शनसह बातमी पाठवली . संपादक म्हणाले , सकाळी सकाळी आपल्या वाचकांना घुबडाचे तोंड पहाणे आवडणार नाही . बिच्चारा गप्प बसून राहीला . लोकभ्रम विविध व्यवसायातही असतात . पहिली विक्री म्हणजे भवानी . पहिल्या ग्राहकाने उधार मागू नये हे व्यवसायाचे सूञ व्यापारी पाळतात . माझे केस कापणारा नाभिक सकाळी सकाळी दुकान पाण्याने धुवत होता . मला जरा आश्चर्य वाटले . नाभिक म्हणाला , भवानी पूर्वी कुणी ग्राहक केस विंचरुन गेला की दिवसभर धंदा होत नाही . पहिल्या ग्राहकापूर्वी एखाद्याने नाभिकाच्या सलून मध्ये केस विंचरणे अशुभ हा लोकभ्रम त्याला दुकान स्वच्छ करायला लावतो . कुञा , मांजर , कावळा हे पशूपक्षी पण माणसांच्या कृती , दर्शन हे लोकभ्रम ठरते . मी एक फ्लॅट खरेदी केला . छान फ्लॅट होता पण विकला जात नव्हता .  बिल्डर म्हणाला , आप ले लो . डिस्काऊंट देता हू ! मला आश्चर्य वाटले , नंतर सोसायटीचा सभासद म्हणाला , सकाळी उठल्यावर मांगाचं तोड कोण पहाणार ? तुम्हाला ते कळणार नाही . मी रोज सकाळी या सख्ख्या शेजा-याशी गप्पा मारायचो . माझा शेजारी मला लकी होता . मातंग स्ञीशी आमवस्येला संबध केला तर लक्ष्मी पावते . घरात समृध्दी येते हा लोकभ्रम प्रमाण मानून एका महाशयाने मातंगस्ञीला वश करण्याचा चंग बांधला . या कामी यश न आल्याने आपण श्रीमंत होवू शकलो नाही असे म्हणून त्याने आपले कर्तृत्व लोकभ्रमाकडे गहाण ठेवले . आम्ही जातीवरुन लोकभ्रम जन्माला घालतो आणि लोकभ्रमापाई स्ञीचं आणि उपेक्षित जातीचं शोषणही करतो . या लोकभ्रमाला काही आधारही नसतो .

स्ञियांच्या हातातली बांगडे फोडताना जर बांगडीच्या तुकडयाबरोबर काचेचा चुरा झाला तर समजायचे नव-याचे बायकोवर प्रेम आहे.  चुरा झाला नाही तर…. तुमचं माझ्यावर प्रेम नाही म्हणून बाईसाहेब रुसून बसणार . एखाद्याने केस कोवळे असतील तर तो माणूस प्रेमळ समजला जातो अन् राठ केसांचा माणूस मायाळू नसतो . मग त्याच्या वाट्याला उपेक्षा ठरलेली .

      स्मशानाला देवताही मानतात . अमावस्येला भूते निघतात . भूत उलट्यापायाचे असते हा आपला लोकभ्रम . आमच्याकडे स्मशानसेवा करणा-या सुनिता पाटील या भगिनी आहे . त्या प्रेताचा अंतिम संस्कार अतिशय मनोभावे करतात . त्यांचे आई वडीलही अंतिम संस्कारासाठी लाकडे आणि इतर साहित्य पुरवित . हे कुटुंब स्मशानातच रहाते . त्यांची भावंडेही इथेच वाढली . त्यांचे संसारही फुलले . स्मशानात रहाताना तुम्हाला भूताखेताची भिती नाही वाटतं ? असा मी सरळच प्रश्न सुनिता पाटील यांना विचारला . त्या म्हणाल्या , भूतखेत माणसाच्या मनात असते . राञी उशीरा अंतिम संस्कारासाठी लोक प्रेत घेवून येतात . आम्ही यथासांग अग्निडाग देतो . कधी कधी राञी बाॅडी  व्यवस्थित अनंतात विलीन झाली का पहावी लागते . लाकडे कमी पडली तर टाकावी लागतात . पण मला कधीच भूताखेताची भिती वाटली नाही . आपल्याकडे एखाद्या स्ञीला भूतबाधा झाली असा संशय आला तरी तिला दत्ताच्या मंदिरात टाकतात किंवा एखाद्या देवॠषाकडे नेतात . तो वेताच्या काठीने त्या झाडाला ( स्ञीला ) बडवतो आणि भूत उतरविल्याचे सांगतो . भूतबाधा हा आपला लोकभ्रम आजही ग्रामीण भागात कायम आहे . भूतबाधा स्ञीलाच का होते ? पुरुषांना का होत नाही ? असे प्रश्न न विचारता आपण आपले लोकभ्रम जपत बसतो .

      जून पासून पावसाला सुरुवात होईल . मे महिन्यात आकाशात चांदणे लखलखत राहील . आकाशातले तारे पहाण्यात मौज असते . त्यात एखादा तारा तुटताना आपण पाहिला तर …. अशुभाने मन चिंतीत होते . पाऊस पडू लागल्यावर आपल्याला आनंद होतो . मेघ गर्जना होवू लागली , विजा चमकू लागल्या तर आपण विजेपासून संरक्षण व्हावे म्हणून दरवाज्यात लोखंडाची वस्तू टाकतो . विजेपासून संरक्षण करणारा हा लोकभ्रम . काही माणसे पायाळू असतात . त्यांना विजेचे फार भय असते . शंकर पाटलांची वळीव ही कथा पायाळू म्हाता-याच्या लोकभ्रमावरच बेतलेली आहे . पाठीत चमक निघाली तर या पायाळू माणसाचे पाय पाठीवरुन उतरवतात किंवा लहान बाळाचे कोवळे पाय पाठीवरुन  उतरवल्याने पाठीतली चमक जाते . लोकभ्रमाची अशी कितीतरी उदाहरणे आपण पहात असतो .संत गाडगेबाबांपासून तर डाॅ नरेंद्र दाभोळकरांपर्यंत अनेकांनी हे लोकभ्रम मिथ्या असल्याचे सांगितले पण लोकसंस्कृतीतले हे भाग आपण त्याज्य मानले नाही .

डाॅ शंकर बो-हाडे

९२२६५७३७९१

काकस्पर्श आणि समृध्द जगणे

काकस्पर्श  आणि समृध्द जगणे

प्रसंग १

मालेगाव तालुक्यातील वडनेर खाकुर्डी जवळचे वळवाडी  नावाचे गाव . मिञाचे वडीलांच्या अंत्य संस्कारासाठी पोहचलेलो . गावात पोहचताच फटाक्याचे आवाज येवू लागलेले . बॅडही वाजत होता . म्हटले , हे काय ? मिञ म्हणाले , ही अंत्ययाञा निघाली आहे . अंत्ययाञेत फटाके , बॅड म्हणजे भलतच काहीतरी . निधन तर दुःखद असते . नंतर या परंपरेविषयी माहिती मिळाली . ज्यांचे निधन झाले ते वृध्द होते . या आजोबांनी नातवंडे , पतवंडे पाहिली . वेल गगनाला गेला . अशा माणसाचा मृत्यू आनंददायी म्हणून हा अंतिम निरोप वाजत गाजत देण्याची प्रथा .  नातवंडे पतवंडे नंतरची पिढी काळतोंडे समजली जाते . याचा अर्थ या पिढीपर्यंत माणसाने जगू नये . तत्पूर्वी म्हातारा गेलेला म्हणूनही आनंद व्यक्त करण्याची प्रथा पडली असावी .

        अंत्ययाञा स्मशानात पोहचली . आजोबांना अग्निडाग देताच स्मशानात प्रत्येकाच्या हातावर वृत्तपञाच्या कागदाचे तुकडे देण्यात आले . पाठीमागून शेव मुरमु-याचे पोते आले . प्रत्येकाला कागदावर मुठ दोनमुठ शेवमुरमुरे दिले गेले . स्मशानात प्रेत जळत असताना इकडे लोक शेव मुरमुरे खात होते . त्याला सुकडा असे म्हणतात . मला ते काही खाता आले नाही . पण बाकीच्या मंडळींना त्यात काही न्यून दिसले नाही . गावात जेंव्हा मृत्यू होतो तेंव्हा सर्व गाव दुःखात सहभागी होते . चूल पेटत नाही . दूरदूरुन माणसे यायला वेळ लागतो . तसेच स्मशानभूमी गावाच्या बाहेर असते . जमलेली माणसे पायी चालत आलेली असतात . अंत्यसंस्कार होईपर्यंत बारा पंधरा तास उलटून गेलेले असतात . त्यावर उपाय म्हणून सुकडा  हा प्रकार सुरु झालेला . प्रथा परंपरा समुहाच्या गरजेतून निर्माण होतात , त्याचा सुकडा हा आविष्कार !

प्रसंग २

मिञाची आई वारली म्हणून त्यांना भेटायला गेलो . त्याला दारावर जाणे असा वाक्प्रचार रुढ आहे. दुःखी कुटुंबाच्या मागे उभे रहाणे , असा या कृतीचा अर्थ आहे . विचारपूस , चौकशी करुन दुःखी कुटुंबाला आधार देण्याची पध्दत आहे . त्यातून मृत व्यक्तीचे स्मरणही होते आणि दुःख हलके होते असे म्हटले जाते . मिञाच्या आईची नव्वदी उलटली होती . नातवंडे , पतवंडेही पाहिली होती . तिच्या सर्व इच्छा पूर्ण झाल्याने अंत्यसंस्कार डीजे लावून करण्यात आले . आई गेली म्हणून रडणे कुढणे नाही . दशक्रिया विधीचे नियोजनाला सगळे लागले . दशक्रियेला भटजीला कपडे  ,आंथरुण, पांघरुण , भांडे , छञी , काठी देण्याची पध्दत आहे . काळ बदलला . तरी घोंगडी आहे . पावसाळा नसला तरी छञी आहे . आंथरुण पांघरुणही आहेच . शिवाय काठी . त्या काळात भटजी दूरवरुन श्राध्दविधी करण्यासाठी येत असल्याने त्याची एवढी काळजी घेत असल्याचे हे प्रतिक आज गमतीचे वाटत असले तरी परंपरा पाळण्याची समुहाची वृत्ती त्यातून ध्वनीत होते .मृतात्म्यास चिरशांती लाभावी ही त्यामागची कल्पना .

       बाबा आमटे गेले तेंव्हा त्यांच्या मागे आरती प्रभूंच्या कवितेतील शब्द होते , सप्रेम द्या निरोप बहरुन जात आहे ! अशी बहरुन जाणारी माणसं समृध्द आयुष्य जगलेली असतात .मधु दंडवते हे माजी केंद्रीय मंञी . दीर्घकाळ संसदेत असणा-या मधु दंडवते यांना कर्करोगाने गाठले तेंव्हा त्यांचे वय झालेले होते . मुलगा अमेरिकेत जावून उपचार करु म्हणत होता . दंडवते म्हणाले , मी सर्व अनुभवले . मला सर्व मिळाले . मला नैसर्गिक मृत्यू येवू दे . उपचाराची आता गरज नाही . दंडवते नानांनी हसत मृत्यला सामोरे जाणे स्वीकारले . त्यांनी देहदान केले . शहाणी माणसं किती समजदारपणे आपले मृत शरीरही अभ्यासाला देतात याचे हे बोलके उदाहरण .

जन्म शाश्वत नाही . गर्भपाताचा आधिकार आणि वंशाला दिवा हवा म्हणून अनेक जीव जन्माला येवू शकत नाही . पण मृत्यू माञ शाश्वत आहे . फार थोडे लोक मृत्यूला सामोरे जाण्याची तयारी करतात . स्व भगीरथीबाई निवृत्ती पवार  वयाच्या ९३व्या वर्षी गेल्या . बाईंचे जगणे समृध्द होते . पवार कुटुंबाने या मातेलाही असाच सप्रेम निरोप दिला . जन्माचा सोहळा करता येत नाही . आपण वाढदिवस करत बसतो . पाश्चात्यांचे अनुकरणातून केक कापले जातात . औक्षण ही आपली देशी परंपरा . आपण दैशीविदेशीचे कोलॅबरोशन करुन जन्मदिवस साजरा करतो . मृत्यूचा माञ सोहळा होतो . चारचौघासोबत अखेरचा निरोप दिला जातो . कारण मृत्यूचे अस्तित्व आपण मान्य करतो . पण तो अवेळी आला तर त्याला अपघात म्हटले जाते . आज एकल कुटुंबाची पध्दत आहे . हम दो हमारा / री एक . अशा कुटुंबातला तरुण वयात ओढवलेला मृत्यू म्हणजे स्वप्न उजाड होणे . सुर्योदयापूर्वीच काळोख दाटणे . शोले सिनेमातल्या बापाच्या तोंडी उद्गार आहे , बाप के कंदोपर बेटे का जनाजा ! प्रगत दळणवळणाची साधने , आधुनिक तंञज्ञान , ताशी १००-१५० किलोमीटर वेगाने धावणा-या गाडया आणि पालकांच्या हाती खेळणारा पैसा यातून अपघाती मृत्यू ओढावल्याची उदाहरणे काही कमी नाही .त्या मृत्यूचा सोहळा कसा होईल . दुःखाचा डोंगर कोसळल्याचा अनुभव असे मृत्यू देतात .

     मृतात्म्यास शांती लाभावी म्हणून आपल्याकडे क्रियाकर्म करण्याची पध्दत आहे . जैनधर्मीयात तीन दिवसाचा दुखवटा असतो . त्याला उठावणा म्हणतात . काही ठिकाणी पंचक्रिया करुन लोक कामाला लागतात . दशक्रिया करण्याचा प्रघात आहे . १९५६ मध्ये डाॅ बाबासाहेब आंबेडकरांबरोबर बौध्द धम्म स्वीकारलेला बौध्द समाज जलदान विधी करतो . त्यासाठी सुटीचा दिवस रविवार निवडला जातो . बुध्द वंदना घेवून मृत व्यक्तीचे गुणसंकीर्तन करण्याची पध्दत रुढ आहे . मुस्लीम समाज चाळीस दिवस दुखवटा पाळतो . हिंदू परंपरेत पिंडदान आणि काकस्पर्शाला महत्व आहे .  आता कावळे कमी झाल्याने काकस्पर्श झाला नाही तर गाईला पान देण्याची पध्दत आहे . काकस्पर्शाशिवाय मृत आत्म्यास मुक्ती मिळत नाही असे मानले जाते . काकस्पर्श होण्यासाठी सकाळी लवकर पूजा करुन पिंडदान करण्याचा प्रयत्न अनेकांचा असतो . यावर काकस्पर्श नावाचा मराठी चिञपटही येवून गेला . मध्यंतरी काकस्पर्शासाठी कावळा पाळावा अशी कल्पना एकाने मांडली होती . परंपरेतले न्यूनत्व दाखविण्याची ही कल्पना हास्यास्पद असली तरी पर्यावरणाच्या -हासाचे सूचन त्यातून होते . काही माणसे आपली इच्छापञे लिहून ठेवतात . कोणतेच धार्मिक संस्कार आपल्या अपरोक्ष करु नये असे अनेकांनी लिहून ठेवलेले असते . कवी कुसुमाग्रज तथा वि. वा. शिरवाडकर हे या परंपरेतले . भाई वैद्य हे त्याच परंपरेतले . तरी काकस्पर्श महत्वाचा मानणारे लाखो लोक आहेत आणि या परंपरेतले न्यूनच दाखवून देणारेही आहेत . गाडगेबाबांनी हेच सांगण्याचा प्रयत्नही केला .

प्रसंग ३

निरा या गावात एकाने जीवंतपणी दशक्रिया घातली . निरा नदीच्या किनारी सकाळी यथासांग पूजेची नक्कल करून पिंडदान केले गेले . जीवंतपणी पिंड ठेवले आणि तेथे पिंडाला कावळयाने स्पर्शही केला . हा सोहळा पहायला अनेक लोक हजर होते . हेतू अंधश्रध्देविषयी प्रबोधन करण्याचा होता .

     माणसाला समृध्द जीवन मिळावे . त्याच्या इच्छा पूर्ण व्हाव्या . त्यानंतर आलेल्या मृत्यूला त्याने हसत हसत सामोरे जावे हेच खरे जगणे असते . तरी परंपरेचे पाईक आपण असतोच .

डाॅ शंकर बो-हाडे

९२२६५७३७९१

आरसा समाजमनाचा
प्रवाह - रविवार काॅलम
नाशिक सायक्लिस्टची सायकल वारी

पंढरपूरला वारकरी पायी चालत जातात . एकवीस दिवसापासून तर महिनाभर वारकरी हरिनामाचा गजर करीत चालत असतात . वारीत अनेक दिंड्या सहभागी होतात . वृक्ष दिंडी काढून पर्यावरण रक्षणाचा संदेश दिला जातो . साहित्य संमेलनात ग्रंथदिंडी निघते . वारीची काही आधुनिक रुपे काळानुसार पाहायला मिळतात. नाशिकच्या सायक्लिस्ट मंडळींची सायकल वारी हा उपक्रम २०१२ पासून सुरु आहे . नाशिकचे तत्कालीन पोलिस उपायुक्त हरिष बैजल यांनी आपली आई लज्जावती बैजल यांना श्रद्धांजली म्हणून अवघ्या सात आठ मिञांसह पहिल्यांदाच नाशिक पंढरपूर असा प्रवास केला . पुढे ही संख्या वाढत गेली.  आता चारशेच्या आसपास गेली आहे . सायक्लिस्ट या वारीत सहभागी होतात. आरोग्यासाठी सायकल वारी हा उपक्रम दिवसेंदिवस वाढत चालला आहे . प्रदुषण मुक्ती आणि आरोग्याचा मंञ देणारी ही वारी लोकांचा कुतुहलाचा विषय झाली आहे.
      पुणे हे सायकलचे शहर अशी पुण्याची ओळख होती . स्कूटर,  मोटारसायकल यांनी पुण्याचे रस्ते गजबजून गेले आणि प्रदूषणाचा विळख्यात पुणे सापडले . गावागावात सायकल चालवणारी मंडळी होती . सायकल हे प्रवासाचे साधन होते. कुणाला विश्वासही वाटणार नाही . तीस पस्तीस वर्षापूर्वी नव-या मुलाला हुंडा म्हणून सायकल दिली जात असायची . सायकल हुंडयात मिळाली असे गौरवाने सांगितले जायचे . काळ  बदलला आणि सायकलची जागा मोटारसायकल, स्कूटर, स्कुटी यांनी घेतली . दुचाकीची जागा आता चारचाकी उंची गाडयांनी घेतली आहे. त्याचा परीणाम मेध , मधुमेह असे आजार वाढवण्यात झाला . त्यातून मग आहार विहाराविषयी माणूस सजग झाला. तो माॅर्निंग वाॅक करु लागला. कामासाठी, प्रवासासाठी असणारी सायकल हे व्यायामाचे सर्वोत्तम साधन झाले.  डाॅक्टर आज डाएटचा सल्ला देतात पण त्याच बरोबर सायकल चालवण्याचा उपाय ही सुचवतात .
     नाशिक सायक्लिस्ट ही हौशी लोकांची संस्था आहे . नाशिकचे तत्कालीन पोलिस उपायुक्त हरिष बैजल यांनी आपली आई लज्जावती बैजल यांना श्रद्धांजली म्हणून नाशिक पंढरपूर सायकल वारी केली. नियमितपणे सायकल चालविण्याने आरोग्य उत्तम रहाते हा मंञ मिळाला.  आता नाशिकमध्ये सकाळी माॅर्निंग वाॅकला जाणारे भेटतात तसेच सायकल चालविणारेही भेटतात. आपली जुनी सायकल वजनदार होती . तिचा लुक जुनाट होता . रंगही अनाकर्षक होता. सायकलमध्ये काळानुरुप खूपच बदल झाला आहे. वजनाने हलकी, दिसायला सुंदर , गियर असणा-या सायकल विविध कंपन्यांनी बाजारात आणल्या आहेत. त्यांच्या किमतींनी गगन भरारी घेतली आहे . सात लक्ष रुपये किमतीची सायकल शोरुममध्ये आणि रस्त्यावरही आहे . त्याचा परिणाम सायकलची क्रेझ वाढवण्यात झाला आहे . माणूस आधुनिक होत जातो पण परंपरा त्याला सोडत नाही . नाशिक सायक्लिस्ट या संस्थेने अनेक  स्पर्धात्मक उपक्रम राबविले . नाशिकचे स्पर्धक जागतिक पातळीवरील स्पर्धेत सहभागी झाले . महाजन बंधूनी अमेरिकेतील सायकल स्पर्धा जिंकून झेंडा रोवला . त्याची दखल थेट पंतप्रधानांनी घेतली. आता तर सायक्लिस्ट कुटुंब पहायला मिळतात . डाॅ नितिन रौंदळ , डाॅ मनिषा रौंदळ आणि त्यांची कन्या अपूर्वा हे याचे उदाहरण . नाशिकमध्ये बालसायक्लिस्टची संख्याही वाढते आहे . अजय राहूदे यांनी बाल सायक्लिस्टचा क्लब सुरु केला आहे . पंढरपूर सायकल वारीत अनेक लहान मुलेमुली पालकांसह सहभागी होतात . अगदी पतीपत्नीही सायकल वारीत भाग घेतात . सायकल वारीत डाॅक्टर,  वकील, इंजिनियर, उद्योजकांपासून तर प्राचार्य, शिक्षकही सहभागी असतात . प्राचार्य डाॅ संपतराव काळे हे या वारीतले वारकरी. पंढरपूर सायकल वारी हा उपक्रम दिवसेंदिवस वाढत आहे. जसपालसिंग बिर्दी हा तरुण या उपक्रमात स्वतःला झोकून देत असे . जसपालसिंग हा नाशिक सायक्लिस्टचा अध्यक्ष असताना या उपक्रमाची क्रेझ वाजली. त्याला नाशिक हे सायकलची राजधानी व्हावी असे वाटत होते . त्यासाठी त्याने विविध उपक्रम राबविले. सायक्लिटच्या उपक्रमाला शहरातील उपक्रमांशी जोडले . पण सायकल चालवता चालवता जसपालसिंग बिर्दी अनंतात विलीन झाला . आता उद्योजक छाब्रीया अध्यक्ष आहेत .
 तेरा जुलैला नाशिक मधून सायक्लिस्ट पंढरपूरकडे रवाना होतील . पहिला मुक्काम नगरला असेल . नाशिक नगर हा एकशे साठ किलोमीटरचा प्रवास सायक्लिस्ट सहज पार करतील . कारण या मार्गावर अवघड वळणे,  चढउतार कमी आहेत . नगर ते टेंभुर्णी हे एकशे चाळीस किलोमीटरचे अंतर कापतांना सायक्लिस्टची कसोटी लागत असते . कारण हा रस्ता चढउताराचा आहे. अवजड वाहने येत जात असतात . मिरजगावपासून पंढरपूरकडे निघालेल्या दिंड्या  भेटतात . पावसाची रिपरिप चालू असते. त्यात टेंभुर्णीत निवासाची व्यवस्था परीक्षा पहाणारी असते . आयोजकांची कसोटी टेंभुर्णीतच लागते . तिसरा दिवस आनंदाचा असतो . अवघे पन्नास किलोमीटरचे अंतर दोनअडीच तासात पार पडते . मागिलवर्षी सायकलचे रिंगण असा उपक्रम राबविला गेला. या वर्षी डाॅक्टर मनिषा रौंदळ दोन चाकाची टॅडम या प्रकाराची सायकल घेऊन वारी करणार आहे . मागच्या चाकावर दिव्यांग व्यक्तीला नेणार आहे. आपल्या बरोबर सायकल वारीचा आनंद दिव्यांगाना मिळावा हा त्यांचा उद्देश . सायकल वारीचे वैशिष्ट्य म्हणजे ही वारी भजन पुजन , कीर्तन यासाठी नसते . कर्मकांडे टाळून आरोग्याचा संदेश वारीतून दिला जातो . सायक्लिस्ट असोसिएशन ही हौशी लोकांची संस्था असली तरी कितीतरी सामाजिक उपक्रमात सहभागी होत असतात. रस्ता सुरक्षा , पर्यावरण रक्षण,  आरोग्य या विषयी जागृती करणारी ही वारी फक्त नाशिकचीच नाही . नाशिकहून निघणा-या वारीत धुळे. मुंबई. नांदेड अशा दुरदूरुन लोक सहभागी होत असतात. त्यासाठी ऑनलाईन रजिस्ट्रेशन केले जाते . नाशिक सायक्लिस्टच्या संकेतस्थळावर ही माहिती उपलब्ध आहे.
   वारी , दिंडी हे आपले सांस्कृतिक मापदंड . वारकरी विठ्ठलाचे भेटीसाठी वारी करतो . वृक्ष दिंडी काढून पर्यावरण रक्षणाचा  संदेश दिला जातो आणि सायक्लिस्ट वारीतून आरोग्याचा संदेश वारीतून देत असतात . वारी एकच पण तिची विविध रुपे काळानुसार पाहायला मिळतात.

डाॅ शंकर बो-हाडे
९२२६५७३