पहिले नमन शाहिराला !
संयुक्त महाराष्ट्राचा लढा लढताना एस एम जोशी , आचार्य अञे यांनी सभा गाजवून महाराष्ट्राच्या एकी करणाची हाक दिली . त्या बरोबर शाहीर अमर शेख , अण्णाभाऊ साठे , शाहिर गवाणकर यांची ढोलकी , हालगी आणि वाणी यांनी या लढ्याला बळ दिले . महाराष्ट्राच्या लोकधारेत शाहिरांच्या लेखनीला आणि वाणिला महत्व आहे . किर्तनाने मराठी माणूस सुधारला नाही आणि तमाशाने बिघडला नाही . तरी तमाशाने राबणा-या माणसाची भूक भागविली असे म्हणता येते . संतानी महाराष्ट्राच्या थंड गोळयाला जागविण्याचे काम केले तर शाहिरांनी मराठी मनाला विरंगुळा दिला . स्वातंञ्य आंदोलनाच्या काळात पठ्ठे बापूराव लावण्या करीत तर पवळा त्याला चाली लावून गात असे . पठ्ठे बापूरावांच्या शाहिरीची भूरळ त्यावेळी स्वातंञ्य आंदोलनातील नेत्यांवरही पडली होती . १९१८ मध्ये मुंबईला हसन इमान यांचे अध्यक्षतेखाली काॅग्रेसचे अधिवेशन भरले आहे . अधिवेशनानंतर अमरावतीचे बाबासाहेब खापर्डे आपल्या मिञांसह तमाशा पहायला गेले . दोन तास लावण्यांचा रंग लुटल्यानंतर मालकाने चौघांना पान सुपारी दिली . त्यावेळी पठ्ठे बापूरावांना बाबासाहेब खापर्डेंयांनी ओळखले नव्हते . पठ्ठे बापूराव बाबासाहेंबांकडेच विद्यार्थी म्हणून वावरलेले होते . बाबासाहेबांनीच लिहून ठेवले आहे , हे जोडपे तमाशावर नुसते जगत नव्हते तर संपन्न झाले होते . अशी ही संपन्न शाहिरी परंपरा महाराष्ट्राला लाभली आहे . अमर भूपाळी लिहीणारे होनाजी बाळा यांचे शब्द आजही ऊठी ऊठी गोपाळा म्हणत मराठी मनाला जागवित असतात .
माझी मैना गावावर राहीली ही लावणी आणि रत्नाची खाण असणा-या मैनेचे वर्णन शाहिरांनी चिञदर्शी शैलीने केले आहे . या लावणीलाच त्यांनी छक्कड असेही म्हटले आहे . छक्कड हा खास रचना प्रकारही शाहिरांचाच . एकदा काळू बाळू यांची तमाशाच्या मध्यंतरात भेट झाली तेंव्हा ते म्हणाले होते , आजही लावणी , छक्कड असे प्रकार गायला आम्हाला आवडेल .पण पब्लिक बदलली आहे . त्यांची मागणी सिनेमाच्या गाण्याची असते . चिञपट संगिताच्या जमान्यातही शाहिरी टिकली . कारण भाऊ फक्कड , सगनभाऊ , पठ्ठे बापूराव आणि अण्णाभाऊ , अमर शेख असे पालक शाहिरीला लाभले .
गावागावात लहान मोठे हौशी तमासगीर होते . जञेत तमासगीर हजेरी लावत असे . असे गावागावातील कितीतरी शाहीर उपासमार सहन करुन शाहिरी परंपरेचे जतन करीत होते . सिन्नर शिर्डी रस्त्यावर वावी नावाचे गाव आहे . शाहिर परशराम हे तिथले . ते जातीने शिंपी होते आणि वृत्तीने शाहिर होते . शाहिर परशरामाच्या लावण्या आजही नगर , नाशिक जिल्हययात प्रसिध्द आहेत . त्यावर गंगाधर मोरजे यांनी संशोधनही केले आहे . सुरी सोन्याची झाली म्हणून काय उरीच मारावी असे आपल्या फटक्यातून सांगणारे अनंत फंदी हे संगममेरचे . कष्टाची बरी भाजी भाकरी तुप साखरेची चोरी नको , असे जीवनविषयक तत्वज्ञानही या शाहिराने सांगितले आहे . शाहिरांनी मराठी माणसांना ईष्काचे रंगही दाखविले आणि जीवन विषयक संपन्न जगण्याचे तत्वज्ञानही दिले . सर्वच शाहिरांना लौकीक जीवनात स्थैर्य लाभले असे नाही . तरी याञेत , गणेश उत्सवात तमाशे , मेळे , कलापथके सादर करुन या शाहिरांनी लोकरंजनातून लोकप्रबोधन केले . जातीच्या भिंतीना तडे देण्याचे कामही शाहिरांनी केले .
सामाजिक चळवळींचे प्रबोधनाचे माध्यम शाहिरी परंपरा होती . सत्यशोधक , ब्राह्मणेतर चळवळीचे मेळे , आंबेडकरी चळवळीचे जलसे प्रसिध्द होते . आंबेडकरी चळवळीत वामनदादा कर्डक यांनी बाबासाहेब आंबेडकरांचा विचार घराघरात पोहचविला . शिवशाहिरांनी पोवड्यातून पराक्रमाचे पोवाडे गायले . छञपती शिवाजी महाराजांच्या काळात शाहिरीला चालना मिळाली . पेशवाईच्या काळात शाहिरी कलेला राजाश्रय मिळाला . लहरी हैदर या कवीला छञपती शाहूंनी मदत केली . पुढे शाहिरांचा राजाश्रय संपल्याने शाहिरांचे वैभव संपले . तरी शाहिरांचा बुलंद आवाज घुमत राहिला . आज आधुनिकतेचा साज घेवून फडातली लावणी नाटयगृहात पोहचली आहे . तिचे रिमिक्सही झाले आहे . तिचा मराठी बाणा कायम आहे . गावागावात शाहिरी जपणारी माणसं आहेत . म्हणून पहिले नमन शाहिराला करुनच पुढचा प्रवास करणे मला महत्वाचे वाटते .
डाॅ शंकर बो-हाडे
९२२६५७३७९१