Wednesday, 15 July 2015

प्रिय मित्रानो

सारे रोजचे तरीही हा माझा blog तुम्ही जरूर वाचवा व मला प्रतिक्रिया द्याव्यात हि विनंती.

आपला
डॉ  शंकर बोऱ्हाडे 

सारे रोजचे तरीही

नमस्कार
खूप खूप दिवसापूर्वी ब्लाॅग लिहावा , असे मनात आले .  आज उद्या करता करता किती तरी दिवस गेले . राञी गेल्या . दुपाव काही संपेना . आता लिहावं म्हणतोय . मनात खूप गाळ साचतो . त्यावर नितळ पाणीही असतं . गाळ काढून टाकून पाण्याचा झरा झरझरू द्यावा असे वाटते . माझी कितीतरी निरिक्षणाने वेगळी असतात . मला ती मांडाविशी वाटतात . कुंभपर्वाची तयारी पाहण्यासाठी मी गंगा घाटावर , तपोवणात जातो . मला तिथे साधुंपेक्षा भिकारीच जास्त भेटतात . आता गोदामाई पुरोहितांची आणि भिका-याची पोशिंदी होणार असं वाटू लागतं . मी गंगेवरच्या भिका-यांचे फोटो काढत बसतो . एक चोळी न घातलेली भिकारीण पाहून मला संस्कृतीचा सत्वहीन सामर्थ्य दिसतं .
     शाळेत पहिल्या क्रमांकाने पास होणा-या मुलात मला सौंदर्य दिसत नाही . नापास मुलाच्या अंतरंगात डोकवावसं वाटतं . शिकणा-या मुलीची लग्नपञिका उगीच तिच्या फाशीगेटचा प्रवास वाटते . पाऊस पडल्यावर मला सर्वांना होणारा आनंद होतोच पण पावसानं काळं तोंड केल्यावर मी अस्वस्थ होतो . ज्याला सातबाराच नाही तो मी स्वतःला कृषक समजून पावसला शिव्या देतो . बापजाद्यांची शेती दुष्काळानं गेली हे मला एव्हाना कळतं .
       मी स्वतःला असं विस्कटलेल्या तकड्यात शोधत बसतो .आराश्याच्या तडकलेल्या काचात एकसंध प्रतिमा मिळणार नाही , हे मला माहित असूनही एखाद्या काचेच्या तुकडयात मी माझी एकसंध प्रतिमा पहात बसतो . सत्य मला अभासी वाटते . माणसाचे प्रत्येक वर्तन मला सत्याचाच अविष्कार वाटतो . मी माणसाचे असे तुकडे वेचणारा भिकारी ठरेन याची मला भिती वाटत नाही . तोच सत्य सुंदर मंगलाचा अविष्कार वाटतो .




                                             शंकर बो-हाडे
                                             9226573791